सोनई। प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई जवळचे वंजारवाडी (ता नेवासा) येथे शुक्रवार २९ जानेवारी ते शुक्रवार ५ फेब्रुवारीपर्यंत संत भगवान बाबा व संत वामनभाऊ प्रतिष्ठान मार्फत अखंड हरिनाम सप्ताह व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे खजिनदार मिठ्ठू डोळे यांनी दिली आली आहे.
दरवर्षी वंजारवाडीत धार्मिक कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात येतात. यंदा हरिनाम सप्ताहाचे हे १८वे वर्ष असून हा सप्ताह वैकुंठवासी बालब्रह्मचारी हभप माधव बाबा लांडेवाडी कर यांना समर्पित करण्यात आलेला आहे. याच कार्यक्रमात दरवर्षी समाज भूषण म्हणून कार्यकर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार सन्मान करण्यात येतो. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना या वर्षी हा पुरस्कार ३० जानेवारी रोजी सायंकाळी महाराष्ट्राचे मंत्री नामदार धनंजय मुंडे व नामदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
२९ जानेवारी हभप रामनाथ महाराज राजगुरू (तरवडी) ३० जानेवारी हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर ३१ जानेवारी हभप विष्णु महाराज केंद्रे १ फेब्रुवारी महंत स्वामी हंसानंदपुरी महाराज २ फेब्रुवारी हभप अर्जुन महाराज जाधव ३ फेब्रुवारी हभप भगवान महाराज मचे ४ फेब्रुवारी हभप रामेश्वर महाराज राऊत शास्रीजी यांची रात्रौ हरिकीर्तने तर शुक्रवार ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते ११ सरला बेटाचे महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
सप्ताह काळात दररोज पहाटे ४ ते ६ काकडाभजन ७ ते ८ विष्णुसहस्रनाम ८ ते ११ व १ ते ५ अखंड रामनाम जप सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ व रात्रौ ६ ते ८ हरिकीर्तन असे कार्यक्रमांचे स्वरूप असून भाविक भक्तगणांनी मास्क वापरून सुरक्षित अंतर ठेवून सॅनीटायझरचा वापर करून या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानचे महादेव दराडे व वंजारवाडीतील तरुण मंडळ तसेच ग्रामस्थांनी केलेले आहे.

