मुरूड। प्रतिनिधी(विकास मेहेतर):
मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागातील एकमेव दुवा असलेली काकळघर - रोहा एस.टी. पूर्ववत सुरु करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील प्रवासी व नागरिकांमधून जोर धरत आहे.
कोरोना महामारीमुळे 22 मार्च 2020 पासून एस.टी. सेवा बंद करण्यात आली. तेव्हापासून दुर्गम ग्रामीण भागातील जनतेला प्रचंड त्रास व हाल सहन करावे लागत आहेत. वाहतुकीचे मुख्य माध्यम बंद असल्याने, सकाळच्या वेळेत फळ-भाजीपाला, दूध व्यवसाय करणार्यांना बोर्ली, रेवदंडा, मुरुडकडे येण्यासाठी पायपीट करावी लागते आहे.
ज्येष्ठ नागरिक, महिलांना एस.टी. सुविधा नसल्याने त्रास होतो आहे. अनलॉकनंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना एसटीने अनेक फेर्या सुरू केल्या आहेत. मात्र अद्याप काकळघर-रोहा एसटी अद्याप सुरु करण्यात आलेली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
तरी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकारीवर्गाने दुर्गम ग्रामीण भागातील काकळघर-रोहा, अलिबाग-काकळघर व मुरुड साळावमार्गे महाड ही एसटी सेवा सुरु करावी, अशी मागणी प्रवासी, जनतेकडून केली जात आहे.

