संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):
गुरुवारी दुपारी संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे गावाजवळील चिंचोली रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलास अचानक आग लागल्याने हजारो वृक्षरोप जळून बेचिराख झाली आहेत.
सुमारे पाच एकर क्षेत्रातील नवीन लागवडीतील रोपे भक्षस्थानी पडले आहेत. थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशमक बंबने पाणी मारून आग विझविण्यात आली. मात्र हजारो वृक्ष व छोटे सरपटणारे सरडा,घोरपड,सर्प व लहान सहान प्राणि व काही वृक्षावरील पक्षांची लहान पिले जळून राख झाली होती.त्यामुळे भयंकर नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष दिसते आहे.
तळेगाव दिघे या गावाच्या पश्चिमेला सुमारे पाच एकराहून अधिक क्षेत्रात विविध वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली होती. ह्या पावसाळ्यात चांगला पाउस झाल्याने रोपे बहरू लागली होती. मात्र गुरुवारी दुपारी जंगलास अचानक आग लागल्याने वाळलेल्या गवताने आगीने चांगलाच जोर घेत काही वेळातच जंगलाचा मोठा परिसर भक्ष स्थानी पडला होता. याबाबत माहिती समजताच सरपंच बाबासाहेब कांदळकर व युवक कार्यकर्ते यांनी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.
ही आग जंगलास कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. खरे पाहता यासाठी देखरेख करण्यासाठी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणात शासनाकडून पगार दिला जातो. पण वन अधिकारी व कर्मचारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात यामुळे अशा घटना वारंवार घडतात. त्यामुळे अनेक जंगलाचे -हास होत आहेत. याला जबाबदार कोण? यावर शासन वचक ठेवणार की नाही? हा सर्व सामान्यांना प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

