shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सद्गुरु श्री देवेंद्रनाथ लघुकथा-१७' 'दोष कोणाचा, शिक्षा कोणाला..!'

'सद्गुरु श्री देवेंद्रनाथ लघुकथा-१७'

दोष कोणाचा
शिक्षा कोणाला..!


सारा परिसर व्याकूळ झाला होता!
त्या आर्त स्वरानं निसर्गावरहि रोमांच उभे राहिले.
एका बालकाचे हात पाय तोडले गेले!
राजदंड होता तो!

चौरंगावर हात पाय तोडून ठेवलेल शरीर हे शशांगर राजाच्या मुलाचे होते!
युवराज कृष्णागर बेशुद्ध अवस्थेतून अर्धवट जागे होत होते आणि पुनः वेदनेने विव्हळत बेशुद्ध होत होते!
शुद्धीवर येताच तोंडातून काही शब्द बाहेर यायचे पण ते स्पष्ट नव्हते.
अशा अवस्थेत शुद्धीवर आले व डोळे उघडून त्यांनी समोर पाहिलं तर राजमाता दिसू लागल्या!
त्यांनी पुन्हां डोळे मिटले व म्हठलं 'माते, का हा असा प्रसंग माझ्यावर ओढवलास!
त्या ग्लानीतच त्यांना तो प्रसंग समोर दिसू लागला.

 -राजमाता, खास शृंगार करुन महालात बसली होती!
राजमातेने बोलविलं आहे असा संदेश देऊन दासी युवराजांना रात्री महालात घेऊन आली.
युवराज राज महालात येताच त्यांनी मातेला प्रणाम केला व म्हटलं-
  माते!
आपल्याला अशी अचानक का आठवण व्हावी ?

'बसा मग सांगेन!'
असं म्हणून राजमातेन युवराजांचा हात धरून झोपाळ्यावर बसवल व युवराजांच्या शेजारी बसून दासींना बाहेर जाण्याचा इशारा केला!
राजमाता युवराजांकडे पहात होती!
युवराजांच्या नजरेला नजर लावीत राजमाता म्हणाली,
'किती मोहक डोळे आहेत आपले ?'

 -'आपले ?'

हो आपले हे दोन डोळे!
असं म्हणत राज मातेने दोन्ही दंड स्व हाताने धरून जवळ घेऊन म्हटलं ह्या दोन्ही डोळ्यांनी मोहून टाकल आहे!
वेड लावलं आहे!

काय म्हणता माता हे!

अगदी खरं तेच सांगते!
डोळ्याला डोळा लावत राजमाता म्हणाली.
सारखी माझी नजर ह्या नजरेसाठी शोधत असते!
बेचैन करते!
दोन दोन दिवस आपण दिसला नाही तर छाती धडधडते!
वाटतं असं धांवत जाव आणि आपले असं दंड धरून असं जवळ घेऊन विचार का हे वेड लावलं ?

मी वेड लावलं ?
घाबरत कृष्णागर युवराज म्हणाले.

मातेने त्यांना आणखीनच जवळ ओढून घेतलं.
मातेच्या छातीवरचा पदर पूर्ण ढळला होता!
मातेने युवराजांना जवळ ओढून घेतलं व त्यांच्या नजरेत नजर मिसळवित म्हटले,
हो आपणच वेड लावलत मी ह्या राजघराण्यात येणार होते ते तुमच्यासाठी तुमच्या पित्यासाठी नव्हे!
पण उलट झाले!

हे नशिबानं झालं!

नशिबानच घात केला माझा पण आतां तुम्ही माझा घात करू नका ?

असं काय म्हणता माते ?
जरा बाजूला होण्याचा प्रयत्न करीत युवराज म्हणाले!

आपण माझे आहात!
ह्या डोळ्यांना मोहून टाकणारे ?
अगदी जवळ घेत माता म्हणाली!
क्षणात मातेने दोन्ही हातात धरलेले दंड जवळ खेचून घेतले.
आपल्या हाताची मिठी युवराजांना मारली व नजरेला नजर मिळवत जवळ जवळ जाऊ लागल्या!
युवराज चटकन झोपाळ्यावरून उठले व मातेला दूर करीत म्हणाले माते हे काय ?

आपण असे घाबरलात ?

'मी घाबरलेलो नाही. सावध झालो आहे.'
रागाने युवराज म्हणाले!

सावध झालात ?
शुद्ध हरवली का ?
हसत माता म्हणाली व पुनः युवराजांचा दंड धरून त्यांना झोपाळ्यावर जवळ बसवलं व मिठी मारून म्हणाली, 'नाथा, माझ्या भावनांचा विचार करा.'

नाथ ?

हो, मी तुम्हाला माझा नाथ मानते!

मानतेस ? पण मी तुझा नाथ नाही!

मी तुम्हाला मनानं वरलं आहे!

पण शरीरानं तू माझी नाहीस!

मनांनं वरलं असता शरीरही आपलचं नाही का!

मनानं वरलेल शरीर पंचमहाभूतांनी साक्षी देऊन आपलं करावं लागत हा आपल्या संस्कृतीचा आचार आहे!

पण आचार अन्यायाने घडला असेल तर ?

तो अन्याय न्याय समजून आचरण न्यायानंच व्हायला हवं!
नाही तर प्रतारणा होईल!

माझं मन आपल्या जवळ आहे नाथा!

पण शरीराच्या आचारानं मी नाथ नाही तुझा!
अशा प्रवृत्तीनं पाप घडतं माते!

शरीराचा उपभोग कोणी घेत असता त्या उपभोगांत मन एक होत नसेल तर ते पाप नाही का होत ?

कोणाकडून माते ?

ज्याच्या शरीर भोगाची तृषा नाही अशा शरीराने भोग घेतला तर ते पापच नाही का ?

तो भोग पंचमहाभूतांना साक्ष ठेवून घेतला असेल तर ते पाप कसलं ?
ते कर्मच हे धर्माचं!

'कर्माच रुप जसं हवं तसं युक्तिवादाने बदलता येतं'
रागानं माता म्हणाली!

पण अग्नि साक्ष पाणिग्रहण केलेल्या दोन्ही मनांना आपलं रूप एकच ठेवावं लागलं!
त्यालाच धर्म म्हणतात!

हा धर्म अधर्म आहे असं मनाला वाटत नसेल तर ?

तरीहि धर्माचं सहाय्य घ्यावयास हवं!
युवराज मातेपासून दूर जात म्हणाले.

त्यावेळी मातेने जरा धावत जवळ जाऊन युवराजांचा उजवा हात हातात धरीत म्हटलं 'असं जाऊ नका!'
माझं मन सतत तुमच्या भोवतीच आहे!
असे जवळ या ना!
असं म्हणून मातेने एकदम मिठी मारली!
आणि तत् क्षणी मातेला जोराने दूर लोटीत युवराज रागाने म्हणाले, 
'माते हा अधर्म आहे तू धर्मानं भाभी माता आहेस!
माझ्या पितानं तुझं पाणिग्रहण पंचमहाभूतांना साक्ष ठेवून केलं आहे!
मी तुझा पुत्र आहे!
कामांध न होता व्यवहारी हो!
असं म्हणून युवराज भराभर पाऊल टाकीत त्या महालांतून निघून गेले!
राजमाता धांवत महालाच्या मुख्य दरवाजापर्यंत आली पण युवराज थांबलेच नाहीत.
त्यावेळी राजमातेने मुख्य दरवाजा बंद केला!
त्या आवाजाशीची स्मृती होताच युवराज पुनः भानावर आले व डोळे अर्धवट उघडत म्हणाले
'हा अपराध मी केला नाही तरी ही शिक्षा मी भोगली!
 -मी मनानं कायेनं निर्दोष आहे!

'खरच तु निर्दोष आहेस!'
असं म्हणत कमंडलूतलं पाणी त्याच्या तोंडावर  एका जतीने फेकलं व कपाळी भस्म फासल!
क्षणार्धात युवराज पूर्ण भानावर आले व डोळे उघडून पाहतात तो दोन जति समोर उभे!

नमस्कार जति!

नमस्कार!
कोण तुम्ही!

मी युवराज कृष्णागर!

शशांगर राजाचा पुत्र!
कृष्णातीरी मिळालेला' असं हसत दुसरा साधु म्हणा
ला!

आपण कोण ?
 -युवराजानं विचारलं.

मी गोरक्षनाथ व हे माझे परमसद्गुरू श्री चैतन्य मच्छिंद्रनाथ!

दैववान आहे मी-आपलं दर्शन झालं.
प्राण जाण्यापूर्वी आपल्या महात्म्यांच्या दर्शनानं वेदनाहि आता जाणवणार नाहीत!

प्राणच आता जाणार नाही!
हसत मच्छिंद्रनाथ म्हणाले!

ते कसे ?
श्री गोरक्षानं मुद्दाम विचारले!

ह्याला राजाकडून दान म्हणुन मागून घेऊ व सज्ञान करू!

विना हात पायानी सज्ञान करायचं!
हसत गोरक्षनाथ म्हणाले!

अनुभूती शिवाय ज्ञानाला हात पाय नसतात!
ते स्वयंचलित नसतं.
फक्त डोळस असतं.
तसंच ह्याच होईल!
हा अनुभूतीचे ज्ञान मिळविले की ज्यामुळे ह्या देहाला हातापायाची जरूरच लागणार नाही!
मच्छिंद्रनाथ गंभीर होत म्हणाले.

तरी पण शारीरिक व्यवहाराला हातापायांची जरुरी आहे! श्री गोरक्ष म्हणाले.

ती तो स्वयंबळे मिळविल!
श्री मच्छिंद्रनाथ निर्धाराने म्हणाले.

ती कशी ?

तपबळाने!
स्वतःच्या तपबळाने निसर्गाचे हात पाय मिळवेल!
 -श्री मच्छिंद्रनाथांनी भविष्यवाणी केली!

नाथा! मी धन्य झालो!
आपली कृपा झाल्यावर काय हवय या देहाला!
देहाला हातपाय नसले तरी चालतील पण आपण कृपा करून सनाथ करा!

बेटा, घाबरू नकोस!
अन्यायाला एक दिवस न्याय पराभूत करतोच!
तुझ्यावर घडलेला अन्याय तपबळे दूर होईल!

नमस्कार नाथा!
असं म्हणून युवराजांनं मान वाकवली व ढळढळा अश्रू दोन्ही डोळ्यातून वाहू लागले!
सारं वातावरण गंभीर झालं!
श्री गोरक्षनाथ जरा जवळ जाऊन म्हणाले, बेटा, आता दुःख करायचं नाही!
दुःखाचा शेवट करायचा!
म्हणजे पुन्हा दुःख आपल्याकडे येणारच नाही!

ते कसं ?
 -शांत होत युवराजानं म्हटल!

सद्गुरूच्या चरणी दुःख वहायचं व आपण निर्धास्त व्हायचं!
असं म्हणत श्री गोरक्षनाथांनी श्री मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले व म्हटलं, 'सद्गुरु ह्या बालकावर कृपा करा!'

गोरक्षा, तसेच राजाकडे जाऊन राजाकडून ह्या बालकाला आपल्याला मागून घेऊ व नंतर ह्याला तुझ्या इच्छेप्रमाणे सनाथ करू.

ठिक आहे गुरुदेव!
असं म्हणत भक्तीनं श्री गोरक्षानं नमस्कार केला.

गोरक्षा, दोष कोणाचा आहे हे मलाहि समजल आहे पण ह्याला मिळालेली शिक्षा योग्य वेळी त्या व्यभिचारिणीस देऊ!
 -असे म्हणत श्री मच्छिंद्रनाथांनी पुढे राजवाड्याकडे जाण्यास सुरुवात केली.
श्री गोरक्षनाथ, युवराजाला म्हणाले 'युवराज आम्ही आपल्या पित्याला भेटून येतो!
आपण निश्चिंत रहा!

श्री गोरक्षनाथहि झप झप पावलं टाकत आपल्या गुरूच्या पाठोपाठ जाऊ लागले व युवराज दोघांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत मनात त्यांनाच भजू लागला!
त्यांच्या मुर्त्यांचं ध्यान लावू लागला!
ध्यानात त्यांचा नामजप करू लागला!
वातावरणात क्षणाक्षणाला बदल होता होता!
गंभीर झालेला निसर्गही पुनः प्रसन्न झाला.
वारा प्रसन्नतेने जोराने वाहू लागला व निसर्गाला सांगू लागला
'युवराज सनाथ होणार! युवराज सनाथ होणार!!

लेखक-सद्गुरु श्री देवेंद्रनाथ
संदर्भ- "सद्गुरु श्री देवेंद्रनाथ" यांच्या "अलख निरंजन १९७७" मधून
श्री देवेंद्रनाथ शिष्य- ९८२२२५४१९०
 जय सद्गुरू श्री देवेंद्रनाथ'💐🙏🏻
close