इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत झालेला नामुष्कीजन्य पराभव अनपेक्षीत असा होता. कारण भारताच्या कमजोर संघाने तीन आठवडयापूर्वी बलाढय ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्यांच्याच मायभूमीत हरविले होते. भारताच्या त्या मालिका विजयाने अनेक क्रिकेट पंडितांनी इंग्लंडविरूध्द भारत ब्लॅकवॉश करेल असे भाकीत केले होते. परंतु चेन्नई कसोटीत भारतीय संघाने केलेल्या गचाळ कामगिरीमुळे इंग्लंडने भारतावर २२७ धावांनी विजय मिळवून मालिकेत आघाडी घेतली. भारताच्या या पराभवाने भारतातच नव्हे तर संपूर्ण क्रिडा विश्वात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. भारताच्या पराभवानंतर देश विदेशातल्या सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये भारताच्याच पराभवाचे गुऱ्हाळ चालू होते.
भारताच्या पराभवा मागचे कारणं शोधताना तज्ञही थकत नव्हते. संघ निवड करताना कर्णधार कोहलीची मनमानी, मोहम्मद सिराज व कुलदिप यादवला संघाबाहेर ठेवणे, नाणेफेकीत नशिबाची न मिळालेली साथ, उपलब्ध गोलंदाजांचा न केलेला योग्य उपयोग, वॉशिंग्टन सुंदर व शाहबाज नदीमची प्रभावहीन गोलंदाजी, इंग्लिश फलंदाजांची चिवट फलंदाजी, भारताचे अनुभवी गोलंदाज जसप्रित बुमराहा, इशांत शर्मा यांची पहिल्या डावातील निष्प्रभ गोलंदाजी, कर्णधार कोहलीने आश्विनचा पहिल्या डावात योग्य वापर न करणे, डिआरएस घेताना कर्णधार म्हणून कोहलीचा होत असलेला गोंधळ, नवा चेंडू घेण्यात कर्णधार म्हणून कोहलीने केलेली दिरंगाई, ज्यो रूटची सामन्याला कलाटणी देणारी द्विशतकी खेळी, भारताच्या दोन्ही डावात न मिळालेली भक्कम सलामी, रोहीत शर्मा , अजिंक्य राहाणेचे फलंदाजीतील अपयश, भारताच्या पहिल्या डावात कोहली व शुभमन गिलचे बाद होणे, पुजाराचे दुर्देवी झेलबाद होणे,
भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलचे जम बसल्यानंतर बाद होणे, पुजारा जास्त वेळ न टिकणे, इंग्लिश गोलंदाज जॅक लिच, जेम्स अँडरसन, डॉम बेस, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्सची धारदार गोलंदाजी, हे सर्व कारणं चर्चा करून झाल्यानंतर खेळपट्टी बनविणाऱ्या क्यूरेटरला सोडलं नाही. इतकेच नाही तर वर्षानुवर्ष भारतात आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या " मेड इन इंडिया " एसजी टेस्ट या बॉलच्या दर्जा विषयी शंका उपस्थित करून पराभवाच्या कारणांना शोधण्याचा प्रयत्न झाला.
काही तज्ञांच्या संशोधनातून आणखी एक बाब पुढे आली, ती म्हणजे स्लेजिंग ! स्लेजिंग म्हणजे टिका टिपण्णी !! वास्तविक मैदानात खेळाडूंकडून विरोधी खेळाडूंचं मनोधैर्य खच्ची व एकाग्रता भंग करण्यासाठी खोडसळ शब्दांचा उपयोग केला जातो. परंतु सध्या बीसीसीआयची जागतिक क्रिकेट मध्ये मोठी चलती असल्याने भारताबाहेरील कोणत्याही देशाचा आजी - माजी क्रिकेटपटू भारतीय संघातील खेळाडूंना व्यक्तीशः दुखावण्याचा प्रयत्न करत नाहीत तर भारताच्या प्रमुख खेळाडूंची, त्यांच्या स्वभावाची, खेळाची वारेमाप स्तुती करत आहेत. जेणे करून भारतीय खेळाडूंमध्ये " ग " ची बाधा व्हावी. या नवीन स्लेजिंग पद्धतीचा वापर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मोठया प्रमाणवर झाला. परंतु त्याचा म्हणावा इतका परिणाम झाला नाही.
परंतु त्या दौऱ्यानंतर भारतात आलेल्या इंग्लंडच्या संघातील सर्वच खेळाडू,तसेच अनेक माजी खेळाडूंनीही भारतीय खेळाडू इंग्लंडच्या खेळाडूंपेक्षा कसे सरस आहेत. भारतीय संघ मायदेशात हरूच शकत नाही. इंग्लंड पेक्षा भारताचा संघ सर्वच बाबीत भक्कम आहे. भारत इंग्लंडला ४-० हरविल, भारताचे फिरकी गोलंदाज खूपच प्रभावी आहेत. इंग्लिश फलंदाजांना भारतात फिरकी गोलंदाजी खेळताच येणार नाही. कोहलीला बाद करणे मुश्किल आहे. असे भारतीय खेळाडूंना गाफिल करणारे वक्तव्य करून भारतीयांना हरभऱ्याच्या झाडावर चढविण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात इंग्लिश रणनितीकार पहिल्या कसोटीचा विचार करता शंभर टक्के यशस्वी झाले आहे.
भारतीय संघाबाबत बोलायचं म्हटलं तर सध्या भारतीय संघात आलबेल नसल्याचं जाणवत आहे. मागील काही दौऱ्यांपासून संघात असलेला गुणवान फिरकी गोलंदाज कुलदिप यादवला खच्ची करून त्याला संघात जागा व गरज असताना डावलले जात आहे. मुळ संघात नसलेले गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज नदीम, शार्दूल ठाकूर, टि नटराजन यांना मागील काही सामन्यात संधी मिळाली. परंतु कुलदिपचं आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड चांगलं असूनही त्याला का खेळवत नाहीत ? या मागे नेमके कोण व काय राजकारण चालू आहे ?
कोहलीने नेतृत्व केलेल्या मागील चार सलग कसोटयात भारत पराभूत झाले आहे. तर ऑस्ट्रेलियात कमकुवत भारतीय संघाने कोहलीच्या गैरहजेरीत ऐतिहासिक मालिका विजय मिळविला. त्यानंतर भारतात अजेय असलेला भारतीय संघ मायदेशात एकाएकी कसा मार खातो ? या व अनेक प्रश्नांनी जन्म घेतला असून या प्रकारचे गलिच्छ राजकारण भारतीय क्रिकेटला रसातळाला घेऊन जाईल. त्यामुळे बीसीसीआयने युध्दपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

