भारताचा प्रमुख अडसर ठरला ज्यो रूट
भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरूवात झाली ती इतिहासाला हात घालूनच ! इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुटची ही शंभरावी कसोटी आहे. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी रूटने श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्यांची मालिका इंग्लंडला २ -० अशी जिंकून दिलीच परंतु त्या दौऱ्यात एक शतक व एक द्विशतक ठोकून त्याने आपल्या फॉर्मची चुणुकही दाखवून दिली होती.
चेन्नईत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागताच रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. उपहाराला दहा मिनिट बाकी असेपर्यंत सर्व काही अलबेल होते. परंतु शेवटच्या दहा मिनिटात दोन बळी गेल्याने इंग्लंड काहीशा बॅकफूटवर गेल्याचे जाणवले. मात्र नंतर रूटने सलामीवीर डॉम सिबलीसह खेळाचा ताबा घेत भक्कम गणल्या जाणाऱ्या भारतीय गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत शंभराव्या कसोटीत शतक ठोकण्याचा ऐतिहासिक कारनामा केला. तीस वर्षीय रूटचे १०० कसोटीतील हे दुसरे शतक होय. भारताविरूध्दचे त्याचे हे एकंदर पाचवे शतक असून भारतातले हे त्याचे दुसरे शतक होय. आश्चर्याची बाब म्हणजे रूटने भारतात खेळलेल्या सातही सामन्यात पन्नास पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रूटने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ८३०० पेक्षा अधिक धावा ठोकल्या असून त्यापैकी भारतात नागपूर येथे ७३ व नाबाद २०, राजकोट येथे १२४ व ४. विशाखापट्टणम येथे ५
व २५, मोहाली १५ व ७८, मुंबई २१ व ७७, चेन्नई ८८ व ६ तर परत यंदा चेन्नईत नाबाद १२७ धावा बनविल्या आहेत. यावरुन एक गोष्ट खास लक्षात येते की त्याचा भारतीय खेळपट्टयांवर खेळण्याचा अनुभव व अभ्यास किती दांडगा आहे ?
या ऐतिहासीक शतकाबरोबरच रूट ने त्याच्या ९८ व्या, ९९ व्या व १०० व्या कसोटीत शतक ठोकण्याचा अद्वितीय पराक्रम केला असून अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव फलंदाज बनला आहे. आपणास आठवत असेलच की त्याने नुकत्याच केलेल्या श्रीलंका दौऱ्यात २२८ व १८६ धावा लगावल्या होत्या.
रूट शंभराव्या कसोटीत शतक ठोकणारा जगातला नववा तर इंग्लंडचा तिसरा खेळाडू आहे. यापूर्वी इंग्लंडकडून कॉलिन कौंड्रे व अलेक स्टुअर्ट अशी कामगिरी करू शकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिगने त्याच्या शंभराव्या कसोटीच्या दोन्ही डावात शतकांचा पराक्रम केला आहे. त्याच्या शिवाय पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद व इंझमाम उल हक यांनी हा कारनामा केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम आमला व ग्रॅहम स्मिथ यांनीही ही कामगिरी साधली आहे.
सन २०१२-१३ मध्ये इंग्लंडने भारताला भारतात २-१ असे हरविले होते. त्याच दौऱ्यात रूटने आपल्या कसोटी पदार्पणाचा श्रीगणेशा केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे सन २०१६ च्या दौऱ्यात ज्यो रूट आपली पन्नासावी कसोटीही विशाखापट्टणम येथे भारताविरूध्द खेळला होता. भारताविरूध्द स्वतःची पहिली, पन्नासावी शंभरावी कसोटी खेळणारा रूट जगातला पहिला खेळाडू बनला आहे. या सामन्यापूर्वी रूटने ९९ कसोटीत १९ शतके व ४९ अर्धधशतकांसह ८२४९ धावा बनविल्या होत्या. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने रूटच्या या खास पराक्रमाबद्दल त्याला विशेष टोपी भेट दिली.
रूट भारत दौऱ्यात असाच खेळत राहीला तर भारताचे विजयाचे सर्व मार्ग ( रूट ) बंद होण्याची शक्यता आहे. कारण तो स्वतः चांगला खेळत आहेच शिवाय इतर नवोदितांपुढे वेगळा आदर्श उभा करत असून त्यांच्या मनात असलेली भारतीय फिरकी गोलंदाजांची भिती तो घालवून देत आहे. त्यामुळे भारतीय संघाने रूटला वेळीच वेसण घालावी लागेल. नाहीतर नाईलाजाने म्हणावे लागेल की, रूटने भारताचे विजयाचे सर्व रूट ( मार्ग ) बंद केले आहेत.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

