shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दुसऱ्या कसोटीत भारताला सकारात्मकतेची गरज..!!

शनिवारी भारत इंग्लंडविरूध्द पहिली कसोटी खेळलेल्या चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडीयमवरच दुसऱ्या कसोटीत भिडेल. पण यावेळी मात्र खेळपट्टी वेगळी असेल. आपल्याला आठवत असेल चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामन्यात भारत आश्चर्यजनकरित्या पराभूत झाले होते. चेन्नईतच झालेल्या त्या सामन्यात खेळाच्या सर्व विभागात भारतीय संघाने अतिशय गचाळ कामगिरी केली होती. भारत आपल्याच मायभूमीत इंग्लंडविरूध्द खूप मोठया धाव फरकाने हरल्याने विश्व कसोटी क्रमवारीतील अग्रक्रमांकावर संकट आले. भारतीय गोलंदाज प्रतिपक्षाचे वीस गडी बाद करण्याचे काम सातत्याने करत आहे तसे ते त्यांनी पहिल्या कसोटीतही केले. परंतु ते करण्यापूर्वी भारतीय गोलंदाजांनी दिशाहीन गोलंदाजी केल्याने व नोबॉलची खिरापत वाटल्याने इंग्लंडला धावांचा डोंगर उभा करण्यात मदत झाली, आणि मग त्याच धावांच्या डोंगराखाली भारत जो दबला तो शेवटपर्यंत उठूच शकला नाही.

                     



या शिवाय संघ निवडीत झालेला गोंधळ, कर्णधार म्हणून कोहलीचा न पडलेला प्रभाव व फलंदाजांची ठिसूळ फलंदाजी भारताला पराभवाच्या खाईत ढकलण्याचे कारण बनली होती. त्यामुळे भारताच्या विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याच्या अभियानाला खो बसला. वास्तविक भारतीय संघाला या मालिकेत अजून तीन सामने खेळावयाचे असून त्यात एकही पराभव न होऊ देता दोन विजय मिळविले तरी भारत अंतिम फेरी गाठू शकतो. पिछाडीवरून मालिका जिंकण्याची किमया तीन आठवडयापूर्वीच भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात केली असल्याने या मालिकेतही तो चमत्कार भारत करू शकतो. त्यासाठी कर्णधार कोहली व संघ व्यवस्थापताने समतोल संघ निवडण्याची गरज असून त्यानंतर संपूर्ण संघाकडून सकारात्मक धोरण अवलंबण्याची गरज आहे. त्याचबरोबर कोहलीने कर्णधार म्हणून सर्व खेळाडूंना वडिलकीच्या भावनेने हाताळण्याची आवश्यकता आहे. या सर्व गोष्टी योग्यरित्या जुळून आल्यास नाणेफेक विरोधात जावो अथवा खेळपट्टी कशीही असो भारत आपले विजय अभियान पुन्हा सुरू करू शकतो.

                      

भारताच्या संघात टिच्चून गोलंदाजी करणारे व बळी फिरकी गोलंदाज निवडण्याची जबाबदारी संघ व्यवस्थापनाने केली पाहीजे. त्यासाठी अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेला कुलदिप यादव संघात आल्यास भारताची गोलंदाजी भक्कम बनू शकते. शिवाय चांगल्यापैकी फलंदाजी करणारा डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल तंदुरुस्त असल्याने संघासाठी दिलासा देणारी बाब बनेल. हुकमी एक्का असलेला आर. आश्विन उत्तम फॉर्मात असून तो आपले कर्तव्य बॅट व बॉलने योग्यरित्या पार पाडत आहे. वेगवान गोलंदाजांपैकी कोणीही असल्यास तेथे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता कमी आहे.

                     

पहिला कसोटी सामना जिंकला असला तरी इंग्लिश संघ तो विजयी संघ या सामन्यात कायम ठेवणार नसून त्यांचा खास गोलंदाज जोफ्रा आर्चर जखमी झाला असून रोटेशन पॉलिसी नुसार पहिल्या कसोटीचा गेम चेंजर जेम्स अँडरसन संघाबाहेर जाणार असून त्याच्या जागी तेवढाच तोलामोलाच स्टुअर्ट ब्रॉड संघात येईल. तर याच धोरणाखाली अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरची जागा नवोदित यष्टीरक्षक बेन फोक्स घेईल. पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात चार बळी घेऊन भारतीय फलंदाजीचा कणा मोडणारा फिरकी गोलंदाज डॉम बेस संघाबाहेर गेला असून अनुभवी मोईन अली अंतिम बारा जणात आला आहे.

                        

इंग्लंडने आपला बारा खेळाडूंचा संघ जाहीर केला असून प्रत्यक्ष सामन्यापूर्वी त्यातील एक जण वगळला जाईल. इंग्लंडचा बारा खेळाडूंचा अंतिम संघ असा असेल. डॉमिनिक सिबली, रॉरी बर्न्स, डॅन लॉरेन्स, ज्यो रूट ( कर्णधार ), बेन स्टोक्स, बेन फोक्स, ख्रिस वोक्स, ओली स्टोन, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लिच व मोईन अली. कदाचित यातील ओली स्टोन बारावा खेळाडू असू शकतो.

                         

भारताला हा सामना आपल्या अस्तित्वासाठी जिंकणे महत्वाचे असून त्याहीपेक्षा कर्णधार कोहलीसाठी जास्त महत्वाचा असेल. कारण यापूर्वी सलग चार कसोटीत पराभव हाती लागलेल्या कोहलीला हा सामना गमावला तर कर्णधारपदही सोडावे लागू शकते. 

                         

मागील सर्व पराभव बघता कोहली पहिल्या दिवसापासून चेंडू वळणारी खेळपट्टी निवडण्याची शक्यता असून तसे झाल्यास कोणीही आश्चर्य मानू नये. पण त्यासाठी कोहलीला त्याच्या फलंदाजांकडून योग्य साथ मिळणे आवश्यक असून त्यासाठी सर्वात प्रथम कोहलीलाच मोठा डाव खेळावा लागेल. 


लेखक : -  

डॉ.दत्ता विघावे

क्रिकेट समिक्षक. 

इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,

प्रतिनिधी भारत. 

Email:  dattavighave@gmail.com

close