shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजधानीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी..!


माहिती संकलन-शिवा‌‌ म्हस्के:

नवी दिल्ली, दि. 20: आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी  करण्यात आली.

कोपर्निकसमार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त निधी पांडे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहायक निवासी आयुक्त डॉ.राजेश अडपावार यांच्यासह यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही  आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी
मराठी वृत्तपत्रव्यवसायाचे जनक आणि पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची ओळख आहे. २० फेब्रुवारी १८१२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले गावी त्यांचा जन्म झाला. इंग्रजी, संस्कृत विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. अनेक भारतीय व परदेशी भाषांचा त्यांनी परिचय करून घेतला. ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्‌फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफेसर, शाळा तपासनीस, अध्यापन शाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले.

लोकशिक्षण व ज्ञानप्रसाराच्या हेतूने त्यांनी १८३२ मध्ये ‘दर्पण’ हे वृत्तपत्र काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा पाया घातला. १८४० मध्ये त्यांनीच ‘दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिक काढले. १८४० मध्ये त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ करण्यात आले होते. भूगोल, व्याकरण, गणित, इतिहासादी विषयांवर त्यांनी ग्रंथरचना केली. काही पाठांतरे नोंदवून त्यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन केले. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय विद्वान होत.  ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या त्रैमासिकात भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी त्यांचे संशोधनात्मक निबंध येत असत.
close