shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चेन्नईचे चिदंबरम स्टेडीयम इंग्लिश फलंदाजांना ठरले धार्जिण...!!

सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर असून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून इंग्लंडने भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व ठेवले आहे. भारताचा गोलंदाजांचा ताफा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांत गणला जातो. त्यातच भारतात भारताचे फिरकी गोलंदाज परदेशी संघांवर अंकुश ठेवून असतात, परंतु सध्या सुरू असलेल्या या कसोटीत भारतीय कर्णधाराने फिरकी गोलंदाज निवडण्यात गल्लत केल्याने पहिल्या दिवसअखेर भारतीय गोलंदाजांना प्रचंड मेहनतीनंतरही अपेक्षीत यश मिळविता आले नाही. अगदी दुसऱ्या दिवशीही तिच गत भारतीय गोलंदाजांची झाली.

सामन्याच्या पहिल्या दिवशी आपल्या वैयक्तीक शंभराव्या कसोटीत नाबाद शतक झळकविणाऱ्या इंग्लिश कर्णधार ज्यो रूटने आपला धावा बनविण्याचा सपाटा सुरूच ठेवला. या दरम्यान तिसऱ्या विकेटसाठी डॉमिनिक सिबलीबरोबर २०० धावा जोडल्या तर दुसऱ्या दिवशी अष्टपैलू बेन स्टोक्ससह दिडशतकी भागिदारी करून संघाला सुस्थिती गाठून दिली. बरोबर दुपारी तीन वाजता डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीमच्या गोलंदाजीवर तो पायचितच्या जाळ्यात अडकला. ३७७ चेंडूच्या शानदार खेळीत त्याने २१८ धावा ठोकल्या. या खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रम मोडले. भारतात एका डावात सर्वाधिक धावा बनविणारा तो इंग्लिश खेळाडू व कर्णधारही बनला. 

आपल्या शंभराव्या कसोटीत शतक बनविणारा दहावा खेळाडू ठरला तर शंभराव्या कसोटीत द्विशतक ठोकणारा तो जगातील एकमेव फलंदाजही बनला. त्याचबरोबर चेन्नईच्या मैदानावर द्विशतक ठोकणारा तो दहावा फलंदाज आहे तर इंग्लंडचा तिसरा ! आश्चर्याची बाब म्हणजे इंग्लंडच्या फलंदाजांनी चेन्नईच्या चेपॉक मैदानावर जेंव्हा जेंव्हा द्विशतक ठोकले तेंव्हा इंग्लंडने विजय मिळविले आहेत. त्यामुळे इंग्लंडसाठी त्यांच्या फलंदाजांने चेपॉकवर केलेले द्विशतक लकी सिध्द झालेले आहे. मात्र या वेळेस तसं काही घडू नये अशी तमाम भारतीय रसिकांची अपेक्षा असणार आहे.

चेन्नईच्या चिंदबरम स्टेडीयमवर रूटने झळकविलेले द्विशतक हे या स्टेडीयमवर कोणत्याही फलंदाजांने ठोकलेले दहावे द्विशतक असून सर्वाधिक द्विशतक लगलेले ते भारतातील पहिले स्टेडियम बनले आहे. त्यामुळे ऐतिहासिक महत्व असलेल्या चेन्नईच्या एम. चिदंबरम स्टेडीयम बद्दल आण थोडक्यात जाणून घेऊ या.

तामिळनाडूच्या चेपॉकस्थित चेन्नई म्हणजे पूर्वाश्रमीचे मद्रास येथे सन १९१६ मध्ये या स्टेडीयमची उभारणी झाली. ३३१०८ एवढी प्रेक्षक क्षमता असलेले हे मैदान तामिळनाडू क्रिकेट असोशिएशनच्या मालकीचे आहे. या मैदानाच्या दोन्ही टोकांचे ( एंडचे ) नावे अनुक्रमे आण्णा पॅव्हेलियन एंड व पट्टाभी रामन गेट एंड असे असून आयपीएल मधील प्रमुख संघ चेन्नई सुपर किंग्जचे ते माहेरघर आहे.

या मैदानावर १० फेब्रुवारी १९३४ रोजी पहिला कसोटी सामना भारत व इंग्लंड यांच्या दरम्यान खेळला गेला. ९ ऑक्टोबर १९८७ रोजी ऑस्ट्रेलियाविरूध्द भारत जो एक दिवशीय सामना या मैदानावर खेळला तो येथील पहिला वनडे सामना होय.

चेन्नईच्या मैदानावर ५ फेब्रुवारी २०२१ अखेर  एकूण ५६ शतके ठोकली असून त्यात दहा द्विशतकांचा समावेश असून त्यामध्ये भारताच्या विरेंद्र सेहवागने ठोकलेल्या ३१९ या वैयक्तिक सर्वोच्च धावा आहेत. या मैदानावर पहिले शतक ठोकण्याचा मान इंग्लंडच्या सिरील वॉल्टर्स याला जातो. त्याने १० फेब्रुवारी  १९३४ रोजी १०२ धांवाची खेळी साकारली होती.
         
चेन्नईमध्ये जे दहा विक्रमी द्विशतके ठोकली आहेत त्यांच्यावर देखील आपण दृष्टीक्षेप टाकणार आहेत.
१३ जानेवारी १९८२ इंग्लंडविरूध्द २२२ धावा फटकावून भारताचा गुंडाप्पा विश्वनाथ येथील पहिला द्विशतकवीर बनला. २४ डिसेंबर १९८३ रोजी नाबाद २३६ धावांची खेळी करून सुनिल गावस्करने विंडीज गोलंदाजांना पाणी पाजले होते. १३ जानेवारी १९८५ रोजी इंग्लंडच्या ग्रॅहम फौलरने २०१ तर माईक गॅटींगने २०७ धावा करून एकाच डावात दोन द्विशतके ठोकण्याचा आगळावेगळा कारनामा केला होता. १८ सप्टेंबर १९८६ रोजी ऑस्ट्रेलियाच्या डिन जोन्सने येथे २१० धावा बनविल्या होत्या. हा सामना टाय झाला होता. १८ मे २००१ रोजी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने २०३ धावा ठोकल्या होत्या.  २६ मार्च २००८ रोजी विरेंद्र सेहवागने द. आफ्रिकेविरूद्ध ३१९ धावांची स्फोटक खेळी केली होती.

२२ फेब्रुवारी २०१३ रोजी महेंद्रसिंग धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२४ धावा फटकविल्या होत्या.  भारताच्याच करूण नायरने १६ डिसेंबर २०१६ रोजी ३०३ धावा ठोकल्या होत्या. याच सामन्यात केएल राहुल १९९ धावांवर बाद झाल्याने तो या क्लबमध्ये सामील होऊ शकला नाही.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close