shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जगावं की मरावं, नागरिकांचा प्रश्न....! गॅस कनेक्शन असेल तर शिधापत्रिका रद्द..?


जनतेतील संभ्रम :
ही माहिती नेमकी कशासाठी? ती मागविण्याचा उद्देश काय? खरच शिधापत्रिका रद्द होतील काय?
आणि सर्व माहिती भरून देताना गॅस कनेक्शन असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. असा उल्लेख हमीपत्रात कशासाठी? याविषयी जनतेमध्ये संभ्रम, भीतीचे वातावरण निर्माण झाला असून शासनाकडून व्यापक स्तरावर याचा खुलासा करून संबंधित प्रश्नांसंबधाने जनतेचा संभ्रम दूर करण्यात यावा.
प्रा.श्रीकांत मुद्दे सामाजिक कार्यकर्ते
-----------------------------------------------------------------

लातूर । प्रतिनिधी :
केंद्र शासनाकडून अर्जाद्वारे शिधापत्रिकाधारकांची माहिती गोळा करण्याच्या अनुषंगाने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र या अर्जातील मागील पानावर असलेल्या हमीपत्रात नमूद गॅस कनेक्शन जोडणी असल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल यामुळे येथील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून, आम्ही जगावं की मरावं, असा प्रश्न येथील संतप्त नागरिकांनी केंद्र शासनाला केला आहे. असे भटक्या- विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे केले आहे.

शासनाच्या सुधारित धोरणानुसार प्रत्येक शिधापत्रिका धारकास शिधापत्रिका धारक व कुटुंबातील सदस्यांच्या संदर्भात संपूर्ण इत्थंभुत माहिती एका अर्जाच्या माध्यमातून सादर करण्याबाबत कळविले आहे. या अर्जाच्या नमुन्यात अर्जदार व त्याच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती भरल्यानंतर अर्ज नमुन्याच्या मागील बाजूस असलेले हमीपत्र व त्यामध्ये नमूद केलेले माझ्या नावे किंवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी केलेली असल्यास सदर शिधापत्रिका रद्द करण्यात येईल. ही बाब गरिबांच्या दृष्टीने तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अडचणीची ठरणारी आहे. तेव्हा शासनाने जनतेच्या विशेषत: सर्वसामान्य व गरीब जनतेच्या हितापोटी सदर अट रद्द करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे. 

शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येकच कुटुंबात आज गॅस कनेक्शन जोडणी केलेली असून ती काळाची गरज आहे. केरोसीन आजघडीला दृष्टीआड झालेले असून अंत्यविधीच्या प्रसंगीसुद्धा रॉकेल उपलब्ध होत नाही. तर सरपणाचा पर्याय ग्रामीण भागात मोजक्याच घरी असतो. मातीच्या चुली कधीच्याच कालबाह्य झाल्या असून शासनाने चुलीच्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम लक्षात घेता ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही अशा गरीब गरजू कुटुंबाला गॅस कनेक्शन जोडणी उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्वांच्या कुटुंबात महिला वर्गासाठी सुगीचे दिवस आले असे वाटत असता अचानक गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले.

यामध्ये मिळणारी सबसिडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. आजघडीला गॅस सिलिंडरचे दर ९५० रूपयांच्या घरात असून यामागे मिळणारी सबसिडी मात्र ३० ते ६० रूपयांवर येऊन ठेपली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबात गॅस कनेक्शन ही शोभनीय वस्तू म्हणून प्रदर्शनीय असल्याची भयावह वास्तविकता आहे. हातावर आणून खाणाऱ्या कुटुंबासाठी ९०० ते १००० रूपयांच्या घरातील गॅस सिलिंडर भरून आणणे आवाक्याबाहेरचे आहे. 

अशा हलाखीच्या परिस्थितीत शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या अर्जातील हमीपत्रात नमूद शिधापत्रिका रद्द करण्यात येण्याच्या संदर्भाने जनतेच्या मनातील भितीचे सावट दूर करावे असे भटक्या-विमुक्त समूहाचे अभ्यासक तथा वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य लातूरचे जिल्हा अध्यक्ष प्रा.श्रीकांत मुद्दे यांनी निवेदनाद्वारे केले आहे. 

लातूर येथील नागरिकांनी तहसीलदारांना व त्यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदन देताना प्रा.श्रीकांत मुद्दे, बालाजी भांडेकर, रमाकांत मुद्दे, सचिन वाडीकर, विनोद गायकवाड, अनिल भांडेकर, अहमदपूर तालुकाध्यक्ष अंकुश तांदुळे, औसा तालुकाध्यक्ष भिमाशंकर बंडगर, कार्याध्यक्ष आकाश सूर्यवंशी, उदगीर तालुकाध्यक्ष अशोक शेल्हाळे आदी उपस्थित होते.
close