shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंग्लंडच्या फलंदाजांची पुन्हा एकदा तारांबळ..!!


इंग्लंडने भारताचा दौरा सुरू केल्यानंतर चेन्नईच्या पहिल्या कसोटीत अनपेक्षित विजय मिळविल्यानंतर त्यांच्या खेळाचा आलेख उंचावण्याऐवजी खालावत गेला. त्याच पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने ५७८ धावा ठोकल्या. त्यांनतर मात्र त्यांच्या फलंदाजीला ओहोटी लागली. दुसऱ्या डावात १७८, नंतरच्या चेन्नई कसोटीतच १३४ व १६४ धावा, अहमदाबादच्या तिसऱ्या कसोटीत ११२ व ८१ अशी घसरती कामगिरी झाली. 
                     

अहमदाबादची डे नाईट कसोटी पावणेदोन दिवसात संपल्यानंतर खेळपट्टीच्या दर्जावरून मोठ रणकंदन झालं. त्या खेळपट्टीमुळे तिचे समर्थन करणारे व विरोध करणारे दोन गट पडल्याचे सर्वांनी अनुभवले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉने तर खेळपट्टी संदर्भात अतिशय खालच्या दर्जाचे ट्वीट व व्हीडीओ प्रसिद्ध केले. भारतावर दबाव आणून त्यांच्या सोयीची खेळपट्टी मिळण्यासाठी इंग्रजांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले. त्यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाले. 
                      
आज चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात इंग्लंडसाठी आनंददायक ठरली. नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागल्याने त्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे प्रथम फलंदाजी घेता आली. मागील तीनही सामन्यांच्या तुलनेत या वेळची खेळपट्टी सपाट, काहीसं गवत असलेली व दमदमीत होती.
                     
भारतीय फिरकीचं भूत इंग्लंडच्या मनात चांगलंच घर करून बसल्याचं या डावातही जाणवलं. अक्षर पटेलच्या फिरकी गोलंदाजी पुढे पुन्हा एकदा त्यांच्या फलंदाजांनी मान टाकली. सलामीवीर सिबली, क्राऊली व कर्णधार रूट अवघ्या ३० धावा फलकावर असताना परतल्याने इंग्लिश संघ पुन्हा एकदा स्वस्तात बाद होईल असे वाटत होते. परंतु बेन स्टोक्स, लॉरेन्स व ऑली पोप यांच्या छोटेखानी खेळामुळे त्यांना पाच कसोटी डावानंतर प्रथमच दोनशेचा पट्टा ओलांडता आला. 
                        
बेन स्टोक्स चांगल्यापैकी स्थिर झाल्यानंतर बाद झाला. त्याचं शतक होईल असे वाटत असताना तो बाद झाला. तीच गत पोप व लॉरेन्सची. या दोघांनाही चांगली लय सापडली असताना बाद झाले. त्यामुळे इंग्लंडचे मोठी धावसंख्या रचण्याचे स्वप्न मातीमोल झाले. या डावातील त्यांच्या २०५ धावा कमी दिसत असल्या तरी खेळपट्टी काय रंग दाखवेल हे सांगणं कठीण आहे. आश्वीन ३, अक्षर पटेल ४, सिराज २ व सुंदरने एक बळी मिळविला.
                      
 
भारताचा डाव सुरू होताच जिमी अँडरसनच्या तिसऱ्याच चेंडूवर सलामीवीर शुभमन गिल पायचित झाला. या मालिकेत शुन्यावर बाद होण्याची गिलची हि दुसरी वेळ आहे. गिल सलामीवीर जरी असला तरी पहिला चेंडू खेळण्याचा आज त्याचा पहिलाच प्रसंग होता. नेहमी त्याचा वरिष्ठ सहकारी रोहीत शर्मा डावाचा पहिला चेंडू खेळत असतो. परंतु रोहीतने तो मान गिलला दिला. मात्र तो निर्णय भारताच्या चांगलाच अंगलट आला.
                         
गिल बाद झाल्यावर आलेला चेतेश्वर पुजारा आज जरा वेगळ्याच मुडमध्ये दिसत होता. फिरकी गोलंदाजांना पुढे सरसावत तो फटके मारत होता. तर आक्रमक वृत्तीचा रोहीत शर्मा संयमी खेळ करत होता. आश्चर्याची बाब म्हणजे आज चेतेश्वर पुजाराच्या कमी चेंडूत जास्त तर रोहीतच्या जास्त चेंडूत कमी धावा होत्या. आजचे बारा षटके नाबाद खेळून काढत या जोडीने उदयासाठी भारताच्या आशा जिवंत ठेवल्या.
                         
आपल्या लग्नासाठी या सामन्यातून सुट्टी घेतलेल्या जसप्रित बुमराहा ऐवजी मोहम्मद सिराज संघात आला. तर इंग्लंडने डॉम बेस या फिरकी पटूला स्थान देताना लॉरेन्सला संघात घेऊन फलंदाजी बळकट केली. अपेक्षेप्रमाणे स्टुअर्ट ब्रॉडला संघाबाहेर ठेवले पण जोफ्रा आर्चरला वगळून आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लंडकडे अँडरसन, लीच व बेस हे तीनच पूर्णवेळ गोलंदाज असून रूट व स्टोक्सच्या कामचलाऊ गोलंदाजीची त्यांना मदत घ्यावी लागणार आहे. भारताची कागदावरची भक्कम फलंदाजी जर मैदानात धावा करण्यात यशस्वी झाली तर इंग्लंडची " दे माय धरणी ठाय " अशी अवस्था होईल.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close