shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विराट कोहलीला गिऱ्हाईक बनविणारे आंतरराष्ट्रीय गोलंदाज..!

भारताचा कर्णधार विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील काही चांगल्या फलंदाजात गणला जातो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन त्याला तेरा वर्ष झाली आहेत. या कालावधीत त्याने फलंदाजीत अनेक पराक्रम केले, विक्रम रचले. परंतु या दरम्यान त्याचे काही कमकुवत दुवेही उघड झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक होत नाही. याचे कारण म्हणजे त्याचा फॉर्म हरपला असे नाही तर त्याचे अनेक कमकुवत दुवे जगभरातल्या कर्णधार व गोलंदाजांनी हेरले असून अद्यावत व प्रगत तंत्रज्ञानाच्या साह्याने कोहलीच्या खेळण्यातील त्रुटी शोधून त्याच्यावर काम करून कोहलीची नाकाबंदी करत त्याच्या धावा बंद करण्याचे काम जगभरातील अनेक गोलंदाजांनी केले आहे. मागील काही सामन्यात त्याचे अनेकदा शुन्यावर बाद होणे हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.

                     भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकतीच बारा सामने असलेली कसोटी, टि २० व एकदिवसीय सामन्यांची मालिका संपन्न झाली. या मालिकेत भारताने इंग्लंडवर वर्चस्व गाजवून तिनही मालिका जिंकल्या. यापैकी होळीच्या दिवशी महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या स्टेडियमवर पुणे येथे या दौऱ्यातील वनडे मालिकेतला तिसरा व निर्णायक सामना झाला. या सामन्यात जिंकणारा संघ एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकणार होता. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु त्याचा मागील अनेक निर्णायक सामन्यातील खेळाचा रेकॉर्ड उघडून बघितला तर आपल्या लक्षात येईल की तो अशा अनेक महत्वपूर्ण सामन्यात अपयशी झाला आहे. हाच त्याचा कच्चा दुवा तिसऱ्या व निर्णायक वनडे सामन्यात सर्वांना बघायला मिळाला. या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस गेला. जेंव्हा तो ७ धावा काढून खेळत होता तेंव्हा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अलीने त्याला बाद केले. मोईन अलीने कोहलीला आतापर्यंत ९ वेळा बाद केले आहे. आज आपण आंतरराष्ट्रीय सामन्यात कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करून त्यांचं गिऱ्हाईक बनविणाऱ्या गोलंदाजांविषयी जाणून घेऊ या. 

                       न्यूझिलंडचा जलदगती गोलंदाज टीम साऊदीने कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक म्हणजे दहा वेळा बाद केले आहे. कोहली साऊदी समोर अनेक वेळा असह्य झाल्याचे समस्त क्रिकेट जगताने बघितले आहे.
                        इंग्लंडविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेत कोहली फिरकी गोलंदाजी खेळताना अनेकदा बाद झाला. इंग्लंडचा दुसरा फिरकी गोलंदाज आदिल रशीद समोर धावा काढताना मोताज होताना दिसला. कोहलीच्या लेगस्पीन खेळण्याच्या कमजोरपणाचा आदिल रशिदने जोरदार लाभ उठवला व कोहलीला या मालिकेत त्याने अनेकदा मामा बनविले. आदिल रशिदनेही त्याला ९ वेळा तंबूत पाठविले आहे.

                       इंग्लंडचाच माजी अदभूत फिरकी गोलंदाज ग्रॅहम स्वानच्या फिरकी गोलंदाजी पुढे कोहलीची बॅट अनेकदा मौन राहायची. विराटला स्वानची फिरकी खेळण्याचा कोणताही तोडगा सापडला नव्हता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वानने आठ वेळा कोहलीला शिकार बनविले आहे.इंग्लंडच्याच जीमी अँडरसनचे स्विंग होणारे चेंडू कोहलीसाठी नेहमी डोकेदुखी ठरले आहेत. खास करून हिरव्यागार खेळपट्टीवर त्याने अँडरसन समोर अनेकदा गुडघे टेकले आहेत. जीमी अँडरसनने एकूण आठ वेळा कोहलीला बाद करण्यात यश मिळविले आहे.

                        इंग्लंडचाच अष्टपैलू खेळाडू व जलदगती गोलंदाज बेन स्टोक्सच्या जाळ्यातही कोहली चांगल्या प्रकारे अडकला आहे. स्टोक्सने एकूण आठ वेळा कोहलीला आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले गिऱ्हाईक बनविले आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close