आयपीएल म्हंटलं की सर्वांच्या जीभेवर पहिलं नाव येतं ते मुंबई इंडियन्सचं. त्याचं कारणही तसंच आहे. मुंबई इंडियन्स या संघाने गेल्या १३ वर्षात सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. त्यातही विशेष म्हणजे मागील ८ वर्षातच त्यांनी हा पराक्रम केला असून सन २०१९ व २०२० मध्ये सलग दोनदा आयपीएल करंडक मुंबई इंडियन्सने पटकविला आहे. त्यामुळे यंदाच्या सत्रात त्यांनाच विजेतेपदाची पहिली पसंती त्यांचे समर्थकच नव्हे तर विरोधकही दबक्या आवाजात देत आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स आपली विजेतेपदाची हॅट्रीक खरोखर साधणार का ? हा आगळाच कुतुहलाचा विषय सर्वत्र चर्चिला जात आहे.
सन २०२० हे वर्ष संपूर्ण जगभर कोविड -१९ या महाभयंकर आजाराने व्यापले असताना आयपीएलचे तेरावे सत्र भारताऐवजी संयुक्त अरब अमिराती ( युएई ) मध्ये खेळविण्यात आले. तरी मुंबई इंडियन्सने आपली करंडकावरील पकड ढिली होऊ न देता सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळविले.
आश्चर्याची बाब म्हणजे मुंबईने मिळविलेल्या पाचही विजेतेपदाच्या वेळी रोहीत शर्मा हाच त्यांचा कर्णधार होता. त्यामुळे रोहीत शर्मा आयपीएल मधील सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून गणला जाणे साहजिकच आहे.
मुंबईच्या संघाच्या विजयाचे रहस्य म्हणजे त्यांची मजबूत फलंदाजी, जोरदार टोलेबाजी करणारे आक्रमक फलंदाज, खमके अष्टपैलू खेळाडू, व प्रभावशाली वेगवान गोलंदाजी हे आहेत. काही जाणकार मंडळीच्या मते मुंबईची फिरकी गोलंदाजी स्पर्धेत सहभागी संघांच्या तुलनेत कमजोर आहे. परंतु मला तरी तसे वाटत नाही. कारण या संघात पियुष चावला, राहुल चहर, कृणाल पांडया, जयंत यादव व अनुकूल रॉय असे कसलेले फिरकी गोलंदाज असल्याने भारतातल्या कुठल्याही खेळपट्टीवर कोणत्याही संघासमोर ते यशस्वी ठरू शकतील एवढी गुणवत्ता त्यांच्या जवळ नक्कीच आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स ९ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या १४ व्या आयपीएल सत्राला चेन्नई येथे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बरोबर खेळून आपल्या अभियानाला सुरुवात करणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाचं खास वैशिष्टये म्हणजे त्यांनी आपल्या प्रमुख खेळाडूंना गेल्या अनेक सत्रांपासून संघात सांभाळून ठेवले आहे. त्यामुळे त्या खेळाडूंना स्वतःला सुरक्षित वाटत असल्याने त्यांची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. त्यांच्याकडे कर्णधार रोहीत शर्मा व दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डिकॉक या सारखे मजबूत सलामीवीर आहेत शिवाय गरज भासल्यास ऑस्ट्रेलियाचा खिस लिन देखील जोरदार खेळ करण्यासाठी सज्ज आहे.
नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या टि २० मालिकेद्वारे भारतीय संघात पदार्पण केलेले सुर्यकमार यादव व ईशान किशनसारखे विश्वसनीय फलंदाज मुंबईच्या ताफ्यात समाविष्ठ आहेत. मधल्या फळीला धारदार बनविणारे अष्टपैलू खेळाडू हार्दिक व कृणाल पांड्या हे बंधू तर विंडीजचा कर्णधार किरॉन पोलॉर्ड आक्रमक फलंदाजीचे सर्व हत्यारे घेऊन संघासोबत आहेत. विशेष म्हणजे चेन्नई व बंगलोर येथे धावांचा पाठलाग करताना या तिघांची भूमिका महत्वाची सिद्ध होऊ शकते.
न्यूझिलंडचा जलदगती गोलंदाज अॅडम मिल्ने, जिमि निशम व पॉवर प्ले स्पेशालिस्ट ट्रेंट बोल्ट, ऑस्ट्रेलियाचा नाथन कुल्टर नाईल व भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराहा हे वेगवान आक्रमणाची धुरा सांभाळणार आहे. ही गोलंदाजांची फळी कोणत्याही संघाला धडा शिकविण्यास पुरेशी आहे. फिरकी गोलंदाजही त्यांच्या कडे चांगले आहेत. परंतु त्यांना पकडून गोलंदाजी करावी लागेल. त्यातही खास करून कृणाल पांड्याला आपल्या बळी घेण्याच्या क्षमतेत धार आणावी लागणार आहे.
ऑफस्पिनर जयंत यादवने मागच्या सत्रात केवळ दोन सामने खेळले आहेत. त्यामध्ये अंतिम सामन्याचा समावेश असून त्या सामन्यात त्याची कामगिरी चांगली झाल्याने त्याला या वेळी किती संधी मिळते हे बघावे लागेल. पियुष चावलाला यंदा नव्याने संघात घेतले असून राहुल चहर व कृणाल पांडयाच्या उपस्थितीत त्याला किती संधी मिळते ? हा ही एक प्रश्न आहे. पियुष चावलाने आयपीएलमध्ये १५६ बळी मिळविले असून सर्वाधिक बळी घेणाऱ्यात त्याचा तिसरा क्रमांक लागतो. शिवाय किरॉन पोलॉर्ड व हार्दिक पांड्या हे देखील गोलंदाजी चांगल्या प्रकारे टाकू शकतात. हा देखील मुंबईसाठी बोनस पाँईट ठरू शकतो.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज प्रथमच मुंबई संघात दाखल झाला असून त्याला प्रत्यक्षात संघात संधी मिळते का हे बघणे मनोरंजक ठरेल. प्रत्येक सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा अंतिम अकरा जणांचा संघ हा खालील खेळाडूंमधून निवडला जाईल.
रोहित शर्मा (कप्तान), एडम मिल्ने, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, अर्जुन तेंडुलकर, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), जिमी निशम, जसप्रित बुमराहा, जयंत यादव, किरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मार्को जॉनसन, मोहसिन खान, नाथन कुल्टर नाईल, पियुष चावला, क्विंटन डीकॉक (विकेट कीपर), राहुल चाहर, सौरभ तिवारी, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, व युधवीर सिंग.

