महात्मा फुलेंच्या त्यागामुळेच बहुजन समाजात परिवर्तन - माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरेंचे प्रतिपादन
( डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महात्मा फुलेंना अभिवादन !!)
इंदापूर: प्रतिनिधी ( दि.११) महात्मा फुलेंच्या समर्पण व त्यागातून बहुजन समाजात शैक्षणिक, आरोग्यविषक आणि सामाजिक परिवर्तन झाले , अशा शब्दांत इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रत्नाकर मखरे यांनी राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या १९४ व्या जयंती दिनी अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुल (जिजाऊनगर) इंदापूर येथील भिमाई आश्रमशाळेत राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर मखरे यांनी राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
"रत्नाकर मखरे म्हणाले की, समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, विषमता, गुलामगिरी यासारख्या समाज विघातक चालीरीतींना विरोध करून सामाजिक न्यायाची आणि सामाजिक पुनर्रचनेची मागणी करण्यासाठी महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे अविरतपणे समाजकार्य फुलेंनी केले. प्रस्थापित शोषणवादी व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करून बहुजन समाजात अंधारातून शिक्षणाची / प्रकाशाची ज्योत महात्मा फुलेंनी पेटवली. मुलींसाठी पहिली शाळा पुण्यात फुलेंनीच काढली. फुलेंनी सन.१८६९ साली छत्रपती शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवरायांच्या जीवनावर पोवाडा रचला. शिवरायांचे कार्य बहुजनांच्या घराघरापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य फुलेंनी केले. सन. १८७० साली पहिली शिवजयंती फुलेंनी साजरी केली. फुलेंमुळे खऱ्या अर्थाने बहुजन समाजाला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या खरा इतिहास माहित झाला.म्हणूनच बहुजन समाजाने महात्मा फुलेंच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे मखरेंनी यावेळी नमूद केले.
मुख्याध्यापक साहेबराव पवार म्हणाले की, महात्मा फुलेंच्या कार्यातून धडा घेत शिक्षण हाच यशाचा मूलमंत्र आहे. असे सांगितले.
मनिषा मखरे मॅडम म्हणाल्या की, महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे आपल्या राज्याला फुले,शाहू,आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. असे मत मनिषा मखरेंनी मांडले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे- मखरे व संस्थेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमस्थळी कोविड - १९ चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली.

