अहमदनगर (प्रतिनिधी ):नगर जिल्ह्यात पत्रकाराच्या खुनानंतर एकच खळबळ उडालेली आहे. जिल्ह्यातील राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्यावरून काल (मंगळवारी) दुपारी सव्वाबारा वाजता अपहरण केलेल्या एका राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष तथा साप्ताहिकाच्या संपादकाला अमानुष बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. काल रात्री पावणे अकरा वाजता राहुरी कॉलेज रस्त्याच्या बाजूला त्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांच्या शरीरावर व हातापायांवर मारहाणीचे व़ण आढळून आले.
सविस्तर वृत्त असे की, रोहिदास राधुजी दातीर (वय ४८, रा. उंडे वस्ती, राहुरी) असे मृत पत्रकाराचे नाव असून रोहिदास दातीर स्कुटीवर (एमएच १२ जेएच ४०६३) घरी चालले असताना सुमारे सव्वा बारा वाजेच्या सुमारास त्यांच्या मागावर येत पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ जीपमधून आलेल्या व्यक्तींनी त्यांना बेदम मारहाण करत बळजबरीने उचलून गाडीत टाकून अपहरण केले.
घटनास्थळी त्यांची दुचाकी व पायातील चपला तशाच पडून होत्या. काल दुपारी तीन वाजता रोहिदास यांच्या पत्नी सविता रोहिदास दातीर (वय ३९) यांना फोनवर पतीच्या अपहरणाची माहीती मिळताच राहुरी पोलिस स्टेशनला फिर्याद दिली.या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रार दाखल होताच पोलीस यंत्रणा सज्ज झाली.,आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज त्वरित तपासण्यात आले. त्यात वाहन (एमएच १७ एझेड ५९९५) मधून अपहरण झाल्याचे दिसून आले. सदर वाहन हे कान्हू गंगाराम मोरे (रा. वांबोरी) यांच्या मालकीचे आढळून आले आहे. त्यानंतर अपहरण झालेले दातीर व वाहनमालक मोरे यांचे मोबाईल स्विचऑफ आढळून आले. काल सायंकाळी दातीर यांच्या पत्नीने पुरवणी जबाबात “मोरे यांनी यापूर्वी दातीर यांना जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली होती. कारभारी, रावसाहेब व बाळासाहेब मांगुडे यांनीही जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.” असे पोलिसांना सांगितले. त्यानुसार मोरे याचा मुलगा व इतर तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
सदर तपास सुरु असतानाच काल रात्री पावणे अकरा वाजता दातीर यांचा मृतदेह राहुरी महाविद्यालय रस्त्यावर रोटरी रक्तपेढी जवळील रामदास पोपळघट यांच्या मालकीच्या मोकळ्या प्लॉटमध्ये आढळला. मृताच्या गळ्याभोवती उपरणे व हाता-पायाला बेदम मारहाण केल्याचे दिसले. पोलीस उपअधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, संगमनेरचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, शनि शिंगणापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, उपनिरीक्षक गणेश शेळके, निलेशकुमार वाघ, निरज बोकील, श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक सानप, नगर येथील श्वान पथक, ठसेतज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते.
घटनास्थळा जवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरणातील वाहन रात्री नऊ वाजता आल्याचे पोलिसांना आढळले. नेमकी कोणत्या कारणासाठी हत्या केली असावी, याचा तपास पोलिस करीत आहेत. मृताचे हाता-पायावर बेदम, जबर मारहाण करून, गळा जोरात आवळून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. मुख्य संशयित कान्हू मोरे पसार आहे. तीन-चार जणांनी अपहरण करून खून केला असण्याची दाट शक्यता आहे. चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपी मोरे याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी सांगितले.
महाराष्ट्र भरातील विविध संघटनांनी सदर घटनेचे तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

