आयपीएलचे तेरावे सत्र युएईमध्ये झाले होते. त्यामध्ये आरसीबीने धडाकेबाज सुरुवात करत विजेतेपद मिळविण्याच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र त्यांचा संघ अंतिम रेषेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच उध्वस्त झाला होता. सन २००८ च्या पहिल्या सत्रापासून या संघात अनेक नावाजलेले खेळाडू होते आणि आहेत. शिवाय तीन वेळा ते अंतिम फेरीही खेळले तरीही ते विजेतेपदाच्या करंडकाला हात लावू शकले नाहीत. विराट कोहली सारखा अनुभवी विश्वस्तरीय कर्णधार व फलंदाज विराट कोहली व धडाकेबाज एबी डिव्हीलर्स सारखे खेळाडू संघात असताना देखील संघ अद्याप एकदाही विजेतेपद मिळवू शकला नाही. हिच खरी चिंतेची बाब आहे.
मागच्या सत्रात सुरुवात चांगली झाल्यानंतर सलग ५ सामने गमावल्यानंतर प्ले ऑफ मधून बाद झाले. त्यानंतर आरसीबीने त्या संघातील १० खेळाडू वगळले. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल व न्यूझिलंडचा काईल जेमिसन यांना संघात घेवून संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टि-२० सामन्यात सलामीला जाऊन यशस्वी ठरलेल्या कर्णधार कोहलीने आयपीएलमध्ये सलामीलाच खेळण्याचे सुतोवाच केल्यानंतर मागच्या सत्रात यशस्वी आयपीएल पदार्पण करणाऱ्या देवदत्त पडीक़्कलच्या साथीने सलामी देण्याचा त्याचा मानस होता. परंतु नियतीच्या मनात काही वेगळच दिसतेय. आरसीबीचा संकटमोचक बनू पाहणाऱ्या देवदत्त पडिक्कला कोरोना व्हायरसने आपल्या जाळ्यात ओढले. त्यामुळे आरसीबी वेगळ्याच संकटात सापडले आहे. आता तर देवदत्त पडीक्कलचा पर्याय शोधण्याचे अवघड काम त्यांच्यावर आले आहे. केरळचा धडाकेबाज फलंदाज मोहम्मद अझहरूद्दीनच्या रूपात ते सलामीचा प्रयोग करू शकतात. त्यानंतर न्युझिलंडचा फिन अँलेेन जोरदार फटकेबाजी साठी सक्षम आहे. तर त्यानंतर येणारा एबी डिव्हीलर्स कोणत्याही कोनात व वेगात खेळू शकतो. त्यानंतर नंबर लागतो बेभरवशाच्या ग्लेन मॅक्सवेलचा. सचिन बेबी, डॅनिएल ख्रिश्चन व वॉशिंग्टन सुंदर चांगल्या प्रकारे धावफलक हलवू शकतात.
आरसीबीचे बरेचसे सामने चेन्नई व अहमदाबाद मध्येच होणार असल्याने तेथील खेळपट्टया फिरकीला धार्जीण्या असल्याचे सर्वश्रूत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल, ग्लेन मॅक्सवेल व अँडम झांपा प्रतिस्पर्ध्याला भारी पडू शकतात हीच काय त्यांची तेवढी जमेची बाजू आहे.
आरसीबीची वेगवान गोलंदाजीची बाजू कागदोपत्री मजबूत दिसत असली तरी परिस्थिती तशी नाही. न्यूझिलंडचा काईल जेमिसन जरी त्यांच्या ताफ्यात असला तरी तो टि २० मध्ये फारसा यशस्वी नाही, तसेच त्याला भारतात खेळण्याचा अनुभवही नाही. शिवाय नवदीप सैनी व मोहम्मद सिराज टि-२० मध्ये अजून विश्वास ठेवण्यायोग्य यशस्वी झालेले नाहीत. धावांची खिरापत वाटण्यात मात्र त्यांचा हातखंडा आहे. हर्षल पटेल व ऑस्ट्रेलियाचे डॅनिएल सॅम्स व केन रिचर्डसन हे देखील संघात आहेत. परंतु त्यांच्याही कामगिरीबाबत खात्री देता येत नाही. त्यामुळे आरसीबीचे घोडे पुन्हा एकदा मध्येच अडकण्याची शक्यता आहे.
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असून त्याला आयसीसीची तसेच आयपीएल स्पर्धा एकदाही जिंकता न आल्याने त्याच्या नेतृत्वगुणांविषयी शंका घेतली जाते. त्याचे प्रमुख आणि खरं कारण म्हणजे कोहलीचा मनमानी स्वभाव. संघाची गरज न ओळखता संघ न निवडणे, सहकारी खेळाडूंना स्थिर होऊ न देणे. हिच बाब आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सच्या बाबत उलट आहे. रोहीत शर्मा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याचे कारण तो संघाची गरज ओळखून संघ निवडतो. सहकाऱ्यांना विश्वासात घेतो व थंड डोक्याने प्रत्येक निर्णय घेतो. शिवाय मुंबई इंडियन्सचे सात खेळाडू आजमितीला भारताच्या वन डे व टि २० संघात असल्याने ते भारतासाठी खेळत असल्याचे भान ठेवून देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करतात. आरसीबीचे परदेशी व भारतीय खेळाडू स्वतःचं स्थान संघात फिक्स नसल्याने कोहलीला मनापासून सहकार्य करताना दिसत नाही. हि बाब कोहलीला आयपीएल करंडक हातात घेण्यापासून वंचित ठेवत आहे.
आरसीबीचा पूर्ण संघ असा आहे ---
विराट कोहली (कप्तान), एबी डीविलियर्स, देवदत्त पडीक्कल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वाशिंगटन सुंदर, पवन देशपांडे, फिन अँलन, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, एडम झांपा, काइल जेमीसन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, सचिन बेबी, मोहम्मद अजहरुद्दीन, डॅनियल क्रिश्चियन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डैनियल सैम्स, हर्षल पटेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

