संगमनेर । प्रतिनिधी (ऋषिकेश जगताप):-
मकाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दोन तरुणांवर हल्ला केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात घडली. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.
या हल्ल्यात दोघेही तरुण जखमी झाले असून नान्नज दुमाला परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला शिवारात चत्तर वस्ती व पाटोळे वस्ती येथे काही लोकांना बिबट्या दिसला. परिसरात सर्वत्र ही बातमी पोहोचली. त्यामुळे बिबट्याला हुसकावून लावण्यासाठी स्थानिक नागरिक मोठ्या संखेने एकत्र येत शेताकडे गेले होते.
यामध्ये ऋषिकेश रावसाहेब पाटोळे वय २२ व ओंकार विलास पाटोळे वय १७ या तरुणांचाही समावेश होता. मकाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या दोघा तरुणांवर हल्ला चढविला. ऋषिकेश पाटोळे या तरुणाच्या तोंडाला व डाव्या हाताला. खांद्याला पंजा मारत व चावा घेत जखमी केले.
ओंकार पाटोळे या तरुणाच्या डाव्या हाताच्या हाताला बिबट्याने चावा घेतला व पाठीवर पंजा मारला. या तरुणांवर तळेगाव दिघे येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.
बिबट्या जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा अशी मागणी उपसरपंच सोमनाथ चत्तर व नागरिकांनी केली आहे.

