चौदावे आयपीएल सुरू होऊन जेमतेम दोन दिवस झाले नाही तोच स्पर्धेत रंग भरायला सुरुवात झाली. उदघाटनच्या दिवशी आरसीबीने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला नमवून धक्कादायक निकाल नोंदविला, परंतु मुंबईनेही शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिल्याने मुंबईसाठी विशेष असे मानहानीकारक काहीही नव्हते. मात्र दुसऱ्या दिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर दिल्लीने चेन्नईला हरविले यात मोठे आश्चर्यजनक काम होते. कारण भारतीय क्रिकेटला उंचावर पोहविचणारा शांत व संयमी डोक्याचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अश्या कर्णधाराकडून पराभूत झाला की, जो रिषभ पंत क्रिकेटचे बारकावे, यष्टीरक्षणाचे धडे धोनीकडून शिकला. शिवाय रिषभ पंतचा आयपीएलमधील हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. तसेच दुसरे असे की चेन्नईच्या संघाने या सामन्यात मजबूत अशा १८८ धावा करूनही त्यांना एकतर्फी झालेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला.
सामन्याच्या सुरुवातीला आयपीएलमध्ये प्रथमच दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करताना रिषभ पंतने नाणेफेक जिंकून दिल्लीला सामन्यात सकारात्मक सुरूवात करून दिली. तसेच स्वतःचा संघ निवडताना नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर, हुकमी जलदगती गोलंदाज कागिसो रबाडा, एनरिच नॉर्खिया, फिरकीपटू अक्षर पटेल संघात निवडीसाठी उपलब्ध नसताना शिवाय ईशांत शर्मा व उमेश यादव हे अनुभवी वेगवान गोलंदाज संघात असूनही अननुभवी आवेश खानला संघात घेतले व त्याच्याकडून सर्वात्तम कामगिरी करून घेतली. वास्तविक हे सगळं काम मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटींग, सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद कैफ व प्रविण आमरे यांचे आहे.
चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात फलंदाजी मजबूत केली खरी परंतु त्या गडबडीत गोलंदाजी कमकुवत करून घेतली. त्यांच्या संघात भन्नाट वेगाचा जलदगती गोलंदाजच नव्हता. शार्दूल ठाकूर, दिपक चहार, व सॅम करन हे सारखेच मध्यमगतीचे गोलंदाज संघात होते. फिरकीपटू रविंद्र जडेजा व मोईन अली आपला प्रभाव टाकू शकले नाहीत. शेवटी शार्दूलने दोन तर ड्वेन ब्राव्होने एक गडी बाद केला खरा परंतु तो पर्यंत वेळ निघून गेली होती.
दिल्लीचे सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवनने या सत्रातील कोणत्याही विकेटसाठीची पहिली शतकी भागीदारी करताना दिल्लीला १३८ धावांची तुफानी सलामी देत चेन्नईच्या गोलंदाजांचे कंबरडेच मोडून टाकले. खास करून पृथ्वी शॉने भारतीय संघातून वगळल्यानंतर स्वतःच्या खेळात अमूलाग्र बदल केला व देशांतर्गत स्पर्धेत धावांचं रतीब घालून निवड समितीलाही इशारा दिला. धवनने ८५ धावा करताना शानदार तीन झेल टिपून चेन्नईला आणखी मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.
चेन्नईकडून फाफ ड्यू फ्लेसिस व कर्णधार धोनी खाते उघडण्यापूर्वीच डग आऊटमध्ये परतले. सुरेश रैनाने आपला जुना दमखम दाखविला, मोईन अली, रविंद्र जडेजा, अंबाती रायडू चांगले खेळले पण सॅम करनने छोटीसी पण लक्षवेधी खेळी केली. चेन्नईचे गोलंदाज शॉ व धवनला काबूत ठेवू शकले नाहीत शिवाय क्षेत्ररक्षणही दर्जाहिन केले. पृथ्वी शॉचे राखीव खेळाडू मिचेल सँटनर व ऋतूराज गायकवाडने झेल सोडून दिल्लीला मजबूती मिळवून देण्यात मदतच केली. चेन्नईलाच नव्हे तर स्पर्धेतील प्रत्येक संघाला क्षेत्ररक्षणात लक्षणीय सुधारणा कराव्या लागतील. मुंबई व आरसीबी सामन्यातही क्षेत्ररक्षणाने खालची पातळी गाठली होती हे आपण पहिल्या सामन्यात बघितलेच आहे.
या सामन्यात दिल्लीकडून टॉम करन व चेन्नई कडून सॅम करन हे इंग्लंडचे दोन खेळाडू खेळले. विशेष म्हणजे ते दोघे सख्खे भाऊ आहेत. या सामन्यात सॅमने टॉमच्या चेंडूवर षटकार व त्यापाठोपाठ चौकारही मारला.
रविवारी चेन्नई येथे कोलकाता नाईट रायडर्स व सन रायझर्स हैद्राबाद या दोन संघात लढत होणार आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

