वांबोरी । प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील वांबोरी ग्रामपंचायत हे लोकवस्ती बाबत तालुक्यात सर्वाधिक मोठी, उत्पन्नाबाबत महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांकची ग्रामपंचायत आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्वच्छतेचे आवाहन केले जात असले, तरी वांबोरीतील काही भागांत नागरिकांना पाण्याचीच समस्या भेडसावत आहे. मागील आठवड्यापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वांबोरीत काही भागांतील नागरिक सध्या त्रस्त असून स्वच्छता करणार तरी कशी ? असा प्रश्न त्यांना पडला आहे.
वांबोरी गावामध्ये दर आठ दिवसानंतर पाणी सोडले जाते आणि ३६५ दिवसांची पाणीपट्टी सक्तीने वसुली केली जाते. पाण्यासाठी माता भगीनींना कामधंदे सोडुन डोक्यावर हंडे घेऊन पायपीठ करावे लागत आहे. त्यामुळे पाठीचे, मणक्याचे, मानेचे आणि मानसिक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकतर कोरोना महामारीच्या थैमानामुळे नागरिकांचे हाल पहावत नाहीत त्यातच पाणी पुरवठा व्यवस्थित आणि वेळेत होत नसल्याने नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत.
कोरोना महामारीने कहर घातलेले असताना अशा परिस्थितीत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आणखी रोगराई वाढण्याची शक्यता आहे.
गावातील नेत्यांचे या गोष्टीकडे अजिबात लक्ष नसल्यामुळे जनतेतून नाराजीचा सूर ऐकू येत आहे. रोगराईचे प्रमाण जास्त वाढले तर याला वांबोरी ग्रामपंचायत आणि प्रशासन सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल तसेच ग्रामपंचायत ने पाणी पुरवठा ४८ तासांत सुरळीत न केल्यास वांबोरी ग्रामपंचायतीवर लवकरच हंडा मोर्चा काढण्यात येईल असे निवेदनात सामजिक कार्यकर्ते प्रमोद ससाणे यांनी सांगितले आहे.सदर निवेदन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.अहमदगर, वांबोरी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना दिले आहे.
या निवेदनावर प्रमोद ससाणे, राधेश्याम कुसमुडे, राजू शेख, ईश्वर ससाणे आदींच्या सह्या आहेत.

