shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना व्हायरस संदर्भात बीसीसीआयची कडक नियमावली..!


                       दुधाला पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो. ही जुनी म्हण सध्या बीसीसीआय म्हणजे भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या बाबत तंतोतंत लागू पडत आहे. भारताचीच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगताची लाडकी असलेली इंडियन प्रिमियर लिग अर्थात आयपीएल - २०२१ कोरोनाच्या आक्रमणानंतर अर्ध्यावरच सोडून द्यावी लागल्यानंतर बीसीसीआयला मोठया नाचक्कीला तोंड द्यावे लागले. त्यानंतर बीसीसीआयने अशी नामुष्की पुन्हा पत्करावी लागू नये म्हणून कडक नियमावली बनवली आहे.
     डाॅ.दत्ता विघावे

येत्या २ जून पासून भारताचा संघ तीन महीन्याच्या भल्या मोठया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत विश्व कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध लढणार आहे. तर यजमान इंग्लंडविरूध्द पाच कसोटी सामन्यांची जंबो मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारताने आपला मूळ २० + ४ राखीव = २४ अशा खेळाडूंचा संघ घोषित केला असून सदर दौऱ्यात खेळाडूंना आपल्या पत्नीला सोबत घेवून जाण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंनी स्वतःचे व आपल्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी खेळाडूंसाठी कडक नियमावली बनवली असून त्या अंतर्गत एखादा खेळाडू दौरा सुरु असताना कोरोना पॉझिटीव्ह आढळला तर त्याला संघातून सरळ बाहेरचा रस्ता दाखविला जाईल.

इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचा संघ मुंबईत बनविलेल्या खास बायो बबलमध्ये कॉरंटाईन असणार आहे. शिवाय संंघ इंग्लंडला पोहोचल्या नंतरही तेथील सरकारच्या नियमानुसार दहा दिवसांचा कॉरंटाईन करावा लागेल. बायो बबलमध्ये पोहोचल्यानंतर संघातील सर्व सदस्य, सपोर्ट स्टाफ व खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांना सर्वात अगोदर कोरोना टेस्ट करून घ्यावीच लागेल.

बीसीसीआयच्या वतीने खेळाडूंना अगोदरच सूचित करण्यात आले आहे की, मुंबईला आल्यानंतर जर कोणी खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह सापडला तर त्या संबंधीत खेळाडूसाठी स्वतंत्र चार्टर्ड विमानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही. मुंबईहून इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी संघातील प्रत्येक सदस्य व सोबत असलेल्या व्यक्तींना कोरोना निगेटिव्ह असल्याचे दोन रिपोर्ट असणे बंधनकारक केले आहे.

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या संघातील सर्वच सदस्यांना कोरानाची लस घेणे बंधनकारक करण्यात आले असून " कोविशिल्ड " हीच लस घेण्याच्या सुचनाही संबंधीतांना देण्यात आल्या आहेत. " कोविशिल्ड " या लसीचा दुसरा डोस इंग्लंडमध्ये घेण्याची व्यवस्थाही बीसीसीआयकडून केली जाणार आहे. आतापर्यंत संघातील बऱ्याचशा खेळाडूंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

इंग्लंड दौरा भारतासाठी अतिशय महत्वाचा असून या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात भारताला न्यूझिलंड विरुद्ध कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळायची असून आयसीसीने आयोजित केलेल्या कसोटी विश्वचषक जिंकायचा आहे. शिवाय सन २००७ नंतर कोणत्याही भारतीय संघाला न जमलेली इंग्लंडला इंग्लंडमध्ये हरविण्याची अवघड कामगिरीही पार पाडायची आहे. तसेच संपूर्ण दौरा संपेपर्यंत संघातील प्रत्येक घटकाला तंदुरुस्त राहून कोरोना सारख्या महाभयंकर आजारालाही शह द्यायचा आहे.

यासाठी बीसीसीआयने उचललेल्या प्रत्येक पावलाला यश मिळावे हिच सदिच्छा समस्त भारतीय क्रिकेट समर्थकांची नक्कीच आहे !!
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close