६ ग्रामपंचायत सदस्यांची केजच्या
गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी..!!
प्रकाश मुंडे । बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज तालुक्यातील होळ येथील कोरोना परिस्थिती हाताळण्यात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्रीकांत कांबळे हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी मंजूर असलेल्या रिक्त पदी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ६ ग्रामपंचायत सदस्यांनी केजचे गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे यांच्याकडे शुक्रवारी (दि.२१) निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या ग्रामपंचायतींपैकी होळ एक आहे. याठिकाणी दरदिवशी कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ग्रामपंचायतीकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी न केल्याने प्रादुर्भाव वाढला आहे. महिनाभरात ६ जणांना प्राण गमवावे लागले. अशा परिस्थितीतही ग्रामसेवक श्रीकांत कांबळे हे गैरहजर राहतात. सदस्यांच्या सूचनांची दखल न घेता मनमानी कारभार करतात. परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याने आता त्यांच्या जागी मंजूर असलेल्या रिक्त पदी अनुभवी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ६ ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे, सत्यभामा राख, आश्रूबाई राख, शशिकला शिंदे, लता घुगे, मच्छिंद्र कसबे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सध्याचे ग्रामसेवक हे अनुभवी नाहीत. ते कोरोना परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार सूचना करूनही त्यांचा मनमानी कारभार थांबत नाही. ग्रामपंचायतीकडून कोरोनाबाधितांसाठी संस्थात्मक अलगीकरण, विलगीकरणाची सोय न करता घरी राहण्यास परवानगी देणे, जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन न करणे अशा अक्षम्य चुकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले. तरी देखील कारभारात बदल होत नाही. त्यामुळे निष्क्रीय ग्रामसेवकाची बदली व्हावी, अनुभवी ग्रामविकास अधिकारी द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही सर्वजण आंदोलन करणार आहोत.
–योगेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तथा गटनेता, ग्रामपंचायत होळ

