आतापर्यंत भारतीय क्रिकेट रसिकांनी कधी न अनुभवलेला प्रसंग येत्या काही दिवसात अनुभवण्याची संधी मिळणार आहे. येत्या १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपदचा अंतिम सामना होणार असून त्यामध्ये न्यूझिलंड विरूध्द विद्यमान कसोटी विश्वविजेता भारत दोन हात करणार आहे.
त्याकरीता येत्या २ जून रोजी भारतीय संघ प्रस्थान करणार आहे. कारण सध्या सर्व जगभर कोरोनाचा हाहाकार सुरू असल्याने भारतीय संघाला दहा दिवसांचा सक्तीचा कॉरंटाईन इंग्लंडमध्ये गेल्यावर करावा लागणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला न्यूझिलंडविरुद्ध लढण्यापूर्वी सात दिवस सरावासाठी मिळणार आहे. तत्पूर्वी न्यूझिलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळून तेथे रूळलेला असेल.
कसोटी विश्व अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यानंतर भारताला इंग्लंडमध्येच इंग्लंडविरूध्द पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका ४ ऑगष्ट पासून सुरू होणार असून या दरम्यान ४२ दिवसांचे मोठे अंतर आहे. परंतु कोरोनापासून करावयाचा बचाव व कॉरंटाईनचे कडक नियम यामुळे भारताचा संघ मायदेशी न परतता इंग्लंडमध्येच राहून तेथील कौंटी संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. जेणे करून येण्या जाण्याचा त्रास वाचेल व इंग्लंडविरुद्धच्या जंबो मालिकेपूर्वी भारतीय संघाला सराव करून तेथील वातावरणाशी जुळवून घेता येईल.
इंग्लंड दौऱ्यात वनडे व टि २० सामने होणार नसल्याने येत्या हिवाळ्यात भारतात होऊ घातलेल्या टि २० विश्वचषकाच्या दृष्टीने इंग्लंड दौऱ्यावर निवड न झालेल्या खेळाडूंना प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव मिळावा व नवीन खेळाडूनांही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अभ्यास व्हावा म्हणून (भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ) बीसीसीआयने श्रीलंकेचा दौरा आयोजित केला आहे. तसे बघाल तर क्रिकेट हा एक खेळ असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर कसोटी, वनडे व टि -२० असे तीन वेगवेगळे प्रकार आहेत. वास्तविक या तिनही प्रकारात बऱ्याच देशांच्या संघात काही कॉमन खेळाडू खेळत असल्याने जवळजवळ सर्वच संघ एकाच वेळी तीनही प्रकारचे सामने खेळत नाहीत. परंतु इंग्लंडहून भारताचे काही सफेद चेंडूच्या संघात असलेले खेळाडू येऊन परत जाऊ शकत नसल्याने बीसीसीआयने यावेळी तीनही प्रारूपांसाठी वेगवेगळे संघ निवडण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
भारताचा संघ इंग्लंडविरुध्द ४ ते ८ ऑगष्ट २०२१ दरम्यान नॉटींगहॅम येथे पहिला कसोटी, १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान लॉर्डसवर दुसरी , २५ ते २९ ऑगष्ट दरम्यान लिडस् येथे तिसरी, २ ते ६ सप्टेंबर दरम्यान ओव्हलवर चौथी तर १० ते १४ सप्टेंबर या कालावधीत मॅनचेस्टर येथे पाचवा कसोटी सामना खेळेल.
श्रीलंकेविरुद्ध पाच टि-२० व ३ वनडे सामन्यांचा अंतिम कार्यक्रम अजून जाहीर व्हायचा असून जुलैच्या पहिल्या आठवडयात भारतीय संघ श्रीलंकेला जाईल. तसेच तेथील सरकारच्या नियमानुसार कॉरंटईनही करेल.
भारताच्या सफेद चेंडूच्या संघातील नियमीत खेळाडू कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहीत शर्मा, रिषभ पंत, के.एल. राहुल, जसप्रित बुमराहा, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा या वेळी श्रीलंका दौऱ्यावर नसल्याने त्यांच्या ऐवजी नवोदित खेळाडूंना आपले कौशल्य निवड समितीला दाखवून प्रभावित करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आयपीएल व भारताच्या देशांतर्गत स्पर्धात नेत्रदिपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आपले भाग्य या दौऱ्या निमित्ताने अजमविताना येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध पुण्यात पहिल्या वनडे सामन्यात जखमी झाल्यामुळे संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यर फिट झाल्यास नेतृत्वाची माळ त्याच्याच गळयात पडू शकेल. तर पृथ्वी शॉ उपकर्णधार म्हणून निवडला जाऊ शकेल. श्रीलंका दौऱ्यासाठी संभावित संघ असा असेल.
शिखर धवन, पृथ्वी शॉ, सुर्यकुमार यादव, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दीक पांड्या, कृणाल पांड्या, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, दिपक हुडा, दिपक चहार, भूवनेश्वर कुमार, चेतन सकारीया, हर्षल पटेल, अर्शदिपसिंग, राहुल चहार, यजुवेंद्र चहल, जयंत यादव, राहुल तेवतीया व वरुण चक्रवर्ती.
वरूण चक्रवर्ती आयपीएल दरम्यान कोरोना बाधीत झाल्याने त्याचे संघासोबत जाणे तंदुरुस्ती सिध्द करण्यावर अवलंबून असेल तर जलदगती गोलंदाज टि नटराजन शस्त्रक्रिया झाल्यामुळे या दौऱ्यावर आपल्याला दिसणार नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

