कोरोना परिस्थितीला केंद्र जबाबदार आहे. केंद्राने सर्वतोपरी मदत दिलेली आहे. राज्याला परिस्थिती हाताळता आलेली नाही. असे बोलून एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे नाटकी प्रयोग जनतेने पाहिले. कोरोना परिस्थितही चिखल फेकीचे राजकारण काही थांबले नाही. वाद- प्रतिवाद करत मेडीया समोर येवून काहीतरी भूकत राहायचे, याचा देखील आता जनतेला कंटाळा आला आहे. आम्ही कसे क्लिन आहोत, याचे दाखले देण्या ऐवजी, जर आपली बाजू एवढीच सत्याची वाटत असेल तर, मग हे राजकारणी आपले म्हणणे सिध्द करण्यासाठी एकमेकांच्या विरोधात मा. न्यायालयात का जात नाही? असा प्रश्न आता जनतेला पडत आहे. त्यामूळे यांच्या बोलण्याला केवळ भूकणे असाच शब्दप्रयोग आता जनभावनेतून येत आहे.
मध्यंतरी तर प्राण वाचविण्यासाठी केवळ योग्य उपचारांची गाईडलाईन नसल्यामूळे अनेक रूग्णांच्या शरिरात भरमसाठ केमीकलचा मारा करण्यात आला. त्याचे दुष्परीणाम आता पुढे येत आहेत. हे अपयश ना केंद्र सरकार घेण्यास तयार आहे. ना राज्य सरकार. आपल्या प्रियजनांसाठी रेमडिसीवीर इंजेक्शनासाठी लाखो खर्च केलेले कुटुंब आज आहेत. त्या इंजेक्शनसाठी प्रसंगी अनेक स्त्रीयांनी आपले मंगळसुत्र मोडली, काहीनी मुलीच्या लग्नासाठी साठवलेले पैसे संपविले हे सगळ झाल्यावर कोविड टास्कफोर्स म्हणते की, रेमडिसीवीरचा उपयोग होत नाही. म्हणून ते यापुढे देवू नये. कोविड टास्कफोर्स जर उपचारांची साधी गाइर्डलाईन देवू शकत नसेल, तर इतक्या महागडया व प्रतिष्ठेच्या पदावर राहून हे काय दीड वर्षा पासून ............. करीत होते का?
तीकडे अमेरीकेतील डाॅ. रविजी गोडसे यांनी त्यांच्या अनुभवांचा केंद्र व राज्य सरकारला विधायक सूचनांचा व कोविड परिस्थितीतून बाहेर येण्याचा मार्ग दाखविला. परंतू तो स्विकारल्यास केवळ आमचा कमी पणा होईल या अहंकारातून कोविड टास्कफोर्स बाहेर आली नाही. आज कधी नव्हे तो सरकारी दवाखाने इतके ऍक्टीव झाले आहे. सरकारी दवाखान्यांनी विश्वास निर्माण केला आहे. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे. आता त्यांचे आधुनिकीकरण, विस्तरीकरण थांबायला नको.
आजही अनेक गल्ली बोळातील डॅाक्टरांनी त्यांच्या परिने सेवा देवू केली. असे अनेक दुर्लक्षित डाॅक्टर आहेत की ज्यांनी अगदी 1 ते 2 हजारात कोविड सदृश्य प्रथम लक्षणे असणा-या व इतर आजार असणा-या गोरगरीबांवर उपचार केले. त्यातून अनेक रूग्ण बरे झाले. कोणत्याही प्रसिध्दीची अपेक्षा न ठेवता त्यांनी केलेली सेवा नव्हे तर उपकार आहेत. परंतू या केंद्र व राज्य वादात त्यांची सेवा उपेक्षितच राहिली.
लसीकरणावरून पेटलेले राजकारण हे अर्थव्यवस्था नष्ट करण्याच्या मार्गावर आहे.
लॅाकडाउन वाढविले तरी मात्र दुकाणाचे घराचे भाडे चूकत नाही, व्यवसायासाठी काढलेले कर्ज हप्ते थांबत नाहीत. लाईट बील, पालिकेचे कर यात सवलत मिळत नाही. दिलासा तेवढा एकच की, कोणे एकेकाळी बाईंच राज्य होत. त्यांनी गरीबाला घरकुल दिली होती. त्यामूळे निदान छप्पर तरी आहे. आणि अन्न सुरक्षा विधयकामूळे कस बस दोन घास पोटात पडतात. नुसती दाढी वाढून बाबा होता येत नाही. किंवा मला तुमची काळजी आहे. त्यासाठी मला व्हिलन म्हटल तरी चालेल लॅाकडाउन लावावा लागेल. असे बोलकी काळजी करून काही होत नाही. प्रत्यक्षात कृतीशुन्यता आता जनमानसाच्या लक्षात आली आहे. तुम्ही सगळे सारखेच अशी तुमची ओळख तुम्ही करून दिली आहे. लोकांनी तुमच्या पैकी कोणाचीही निवड करू नये इतपर्यत आता राजकारण नको.
श्री. दिपक सदाशिव पुरी
माहिती प्रवाह ट्रस्ट, पाथर्डी जिल्हा- अहमदनगर.

