आयपीएलचे चौदावे सत्र २९ सामन्यानंतर २४ एप्रिल २०२१ रोजी स्थगित करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट जगताला हादरा बसला. त्याचे कारण म्हणजे आयपीएलचे संचलन करणाऱ्या बीसीसीआयने आयपीएल मधील खेळाडू, पंच व सर्वच निगडीत लोकांसाठी अतिशय सुरक्षित असे जैव सुरक्षा कवच (बायो बबल) बनविले होते. नेमके त्याच बायो बबलला छेद गेला व बीसीसीआयच्या विश्वसनियतेलाही ! केकेआर, दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद या फ्रँचाईजीचें काही खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यानंतर बीसीसीआयने सर्वांची सुरक्षा लक्षात घेता आयपीएल स्पर्धा तातडीने अनिश्चित काळासाठी स्थगित केली.
या घटनेनंतर संपूर्ण जगातीलच क्रिकेट थांबलं. या सर्व घटनांपासून बोध घेत बीसीसीआयसह जगभरातील सर्वच क्रिकेट खेळणाऱ्या देशांनी आपल्या खेळाडूंच्या जीवाच्या सुरक्षेला प्राधान्य देत गंभीरतेने उपाययोजना आखल्या. या सर्व घडामोडी घडत असताना भारताला कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध इंग्लंडमधील साऊथॅम्प्टनस्थित रोझ बाऊल स्टेडियमवर १८ जून पासून खेळायचा आहे. तसेच या अंतिम सामन्यानंतर भारत इंग्लंड विरूध्द पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. या तीन महिन्यांच्या मोठ्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारताचे सर्व खेळाडू १९ मे पासून १४ दिवस सक्तीचा क्वॉरंटाईन करण्यास मुंबईत जमा झाले. पूर्वीच्या नियोजना नुसार ते २५ मे पासून मुंबईत क्वॉरंटाईन होणार होते. परंतु इंग्लंडमध्ये गेल्या नंतर तेथील सरकारच्या नियमानुसार तेथेही दहा दिवस क्वॉरंटाईन करणे सक्तीचे होते.
मुंबईतील क्वॉरंटाईन कालावधीत दौऱ्यावर जाणाऱ्या सर्वच जणांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. जेणे करून इंग्लंडमध्ये गेल्यानंतर कोणीही पॉझिटिव्ह सापडू नये. विशेष सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार भारताचा संघ इंग्लंडमध्ये गेल्यानंतर तेथे न्यूझिलंडविरूध्द कसोटी विश्व अजिंक्यपदाचा अंतिम सामना खेळायचा आहे त्या साऊथॅम्प्टन शहरातील रोझ बाऊल स्टेडियम जवळील हॉटेलात खेळाडूंसाठी बायो बबल बनविले जाणार असून तेथे फक्त चार दिवसांचा कडक क्वॉरंटाईन करावा लागणार आहे. कमी झालेल्या या क्वॉरंटाईन अवधीमुळे भारताच्या संघाला महत्त्वाच्या अंतिम सामन्यापूर्वी तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यास व सराव करण्यास जास्त वेळ मिळणार आहे.
भारताच्या पुरुष संघा सोबतच महिलांचा संघही कसोटी मालिका खेळण्यासाठी एकत्ररित्या जाणार आहे. भारताचे महिला व पुरूष संघ एकाच वेळी एकाच देशाच्या दौऱ्यावर जाण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरणार. त्याचबरोबर आगामी टि-२० विश्वचषक स्पर्धेचा विचार करता सफेद चेंडूच्या संघातील खेळाडूंना सराव मिळण्यासाठी येत्या १३ जुलैपासून भारताचा वनडे व टि २० चा संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्या दौऱ्यात भारत प्रत्येकी ३ टि-२० व वनडे सामने खेळणार आहे. एकाच वेळी दोन देशांच्या दौऱ्यावर स्वतंत्र संघ पाठविण्याची हि भारताची पहिलीच वेळ असणार आहे. या वरून भारताच्या बेंच स्ट्रेंग्थची ताकद संपूर्ण जगाला दिसणार आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची लवकरच घोषणा होणार असून लोकप्रिय क्रिकेट प्रशिक्षक व एनसीए प्रमुख राहुल द्रविड कोच म्हणून या दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंमध्येही वेगळाच जोष पैदा होणार आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावालाही शह देत जगभरातील क्रिकेटमधील हालचाली वाढल्या असून सध्या श्रीलंकेचा संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. न्यूझिलंड संघही दोन कसोटी इंग्लंड दौऱ्यात खेळून भारताबरोबर डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना खेळणार आहे. तर आगामी काही दिवसात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानचे संघही विंडीज दौऱ्यावर आळीपाळीने जाणार आहेत. तसेच आयपीएलप्रमाणेच कोरोना व्हायरसमुळे स्थगित करावी लागलेली पाकिस्तान सुपर लिग (पीएसएल)चा उर्वरीत भाग येत्या जून महिन्यात युएईमध्ये संपन्न होणार आहे. त्या आशयाची परवानगी नुकतीच पाकिस्तान क्रिकेट मंडळाला संयुक्त अरब अमिरात सरकारने दिली आहे.
कोरोना व्हायरसमुळे वरील सामन्यांना प्रेक्षक उपस्थित राहतील का हे सांगणे जरा घाईचे ठरू शकते. भारतात सध्या कोरोनाने मोठे थैमान घातले असताना येत्या ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये भारतात होणार असलेली टि २० वर्ल्ड कप स्पर्धा संकटात सापडली आहे. त्यासाठी २९ मे रोजी बीसीसीआयची सर्व साधरण ऑनलाईन मिटींग होऊन सकारात्मक तोडगा निघून टि-२० विश्वचषक स्पर्धा भारतातच घेण्याबाबत एकमत होण्याची शक्यता असून संस्थगित असलेल्या चौदाव्या आयपीएल सत्रातील ३१ सामने सप्टेंबर महिन्यात इंग्लंडमध्ये घेण्यावरच इंग्लिश क्रिकेट बोर्ड व बीसीसीआय दरम्यान चर्चा सुरू असून भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील पाच पैकी दोन कसोटी सामने कमी करून आयपीएलला वेळ काढून दिला जाऊ शकतो.
एकंदर सर्व बाबींचा विचार करता कोरोना व्हायरसला शह देत सर्वच क्रिकेट खेळणारे देश आपापल्या परिने प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे क्रिकेट पुन्हा एकदा हिरव्यागार मैदानावर फुलणार एवढे मात्र नक्की !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

