प्रतिनिधीः संतोष वायकर
शेटफळ : (दि.३१) : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये अनेकजण कोरोनाच्या दशहतीने भिती बाळगून मरत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकजण कोरोना झाला की घाबरतात आणि उपचारापूर्वीच हार मानत असल्याचे दिसून येते परंतु २४ स्कोर असताना ऑक्सिजन लेवल ७०च्या खाली येऊनही केवळ धाडसाच्या जोरावर शेटफळ ता. करमाळा येथील दुध डेअरीचे चेअरमन मनोहर दत्तात्रय पोळ हे कोरोना सह म्युकरमायकोसिस वर मात करून घरी सुखरूप आले आहेत .
श्री .पोळ यांना मधुमेहाचा थोडा त्रास होता त्यामुळे त्यांना त्रास सुरु झाल्यावर त्यांनी मधुमेहाचा त्रास आहे, हे समजून उपचार घेतले स्वतः मोटारसायकल वर जाऊन जेऊर, करमाळा येथे उपचार घेतले परंतु फरक काही पडेना. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली त्यावेळी ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांचा स्कोर २४ वर गेला व ऑक्सिजन पातळी ७० पर्यंत गेली होती.
आता जेवणही जात नव्हते आणि श्वासही घ्यायला त्रास होत होता. दुर्देवाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी दाखल होण्याचे प्रयत्न केले, परंतू त्यांना कोठेही बेड मिळाला नाही. त्यावेळी गावातील डॉ. सुहास लबडे (शेटफळ )यांनी आपण नक्की काहीतरी प्रयत्न करू, त्यांना घेऊन येण्यास सांगितले .
त्यानंतर बारामती येथील डॉ. भोईटे यांच्या कोविड सेंटरमध्ये पोळ यांना दाखल करण्यात आले. त्यांची स्थिति पाहून त्यांना तात्काळ व्हेंटीलेटर वर ठेवण्यात आले. सहा दिवस व्हेंटीलेटर वर ठेवल्या
नंतर त्यांच्यात सुधारणा होऊ लागली . सुदैवाची एकच गोष्ट श्री .पोळ यांच्यामध्ये जबरदस्त आत्मविश्वास होता व मला काहीच होणार नाही, याची त्यांना खात्री होती.
दहा दिवसानंतर त्यांचा कोरोना ठिक झाला आणि त्यांना घरी पाठविण्याचे ठरले. दरम्यान अचानक त्यांच्या नाकामध्ये बुरशी आली. डॉक्टरांच्या टिमने म्युकर मायकोसिस वर तातडीने उपचार सुरु केले. आवश्यक ती शस्त्रक्रिया केली आणि योग्य ते औषधोपचार सुरु केले. त्यामुळे म्युकरमायकोसिस पण आटोक्यात आला आणि प्रकृती उत्तम झाल्यावर श्री .पोळ काल घरी आले .
आत्मविश्वास आणि धाडसाच्या जोरावर , डॉ . लबडे यांच्या सहकार्याने श्री. पोळ यांचा पुनर्जन्म झाला असून परिवाराने त्यांचे उत्साहात स्वागत केले आहे.


