जगातील सर्वात मोठी व लोकप्रिय क्रिकेट लिग म्हणून गणली जाणारी आयपीएल स्पर्धा या वर्षी कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकली व स्पर्धा मध्यावरच सोडून देण्यात आली. कोलकाता नाईट रायडर्सचे दोन, दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैद्राबादचा प्रत्येकी एक तर चेन्नई सुपर किंग्जच्या सपोर्ट स्टाफचे काही सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेत सहभागी होणारे संघ, खेळाडू, पंच व इतर तत्सम व्यक्तींसाठी स्पर्धा काळात एक अतिविशेष जैव सुरक्षा कवच बनविले जाते की, त्याला बायो बबल असे संबोधले जाते. हे बायो बबल इतके सुरक्षित असते की, त्यामध्ये बाहेरचा कोणीही व्यक्ती जाऊ शकत नाही. मग एवढे सगळे असताना ह्या बायो बबलला छेद कसा काय गेला ? प्रस्तुत लेखात आपण हे जैव सुरक्षा कवच ( बायो बबल ) काय असते व ते नेमके कसे तुटले ? या विषयी थोडक्यात जाणून घेऊया.
तीन मे रोजी कोलकाता नाईट रायडर्सचे दोन खेळाडू फिरकीपटू वरूण चक्रवर्ती व जलदगती गोलंदाज संदिप वॉरीयर कोरोना पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे त्याच दिवशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणारा केकेआर व आरसीबी यांच्यातील सामना स्थगित करण्यात आला. त्याच दरम्यान चेन्नई सुपर किंग्जचे स्टाफ मेंबर्सही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांनतर सनरायझर्स हैद्राबाद व दिल्ली कॅपिटल्सच्या संघालाही कोरोनाने घेरले. सनरायझर्सचा यष्टीरक्षक वृद्धीमान साहा व दिल्लीचा लेगस्पिनर अमित मिश्रा कोरोना संक्रमित असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मात्र बीसीसीआय समोर चालू असलेले चौदावे आयपीएल सत्र स्थगित करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
बायो बबलचे जैव सुरक्षित वातावरण असे क्षेत्र असते की, या मध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांचा बाहेरील लोकांशी काडीचाही संबंध येत नाही. आयपीएलसाठी बनविलेल्या बायो बबलमध्ये खेळाडू, पंच व आयपीएलशी निगडीत सर्व लोकांचा समावेश होता. या सर्व लोकांना या सुरक्षा कवचातून बाहेर निघण्यास पूर्णपणे निर्बंध घातले होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे हा एक काल्पनिक फुगा असतो. या मध्ये बाहेरचा व्यक्ती आत जाऊ शकत नाही तर आतील कोणीही बाहेर येऊ शकत नाही. हे यासाठी की, बायो बबलमध्ये कोणत्याही प्रकारचा व्हायरस येऊ नये व आतील सर्व लोक सुरक्षित राहावे.
बीसीसीआयच्या धोरणानुसार बायो बबलचे नियम तोडणे संबंधितास सजा पात्र होते.खांद्याला दुखापत झाल्यामुळे केकेआरचा खेळाडू वरूण चक्रवर्ती सिटी स्कॅन करण्यासाठी बायो बबल बाहेरील रुग्णालयात गेला. बीसीसीआयच्या नियमानुसार अशा आपत्कालीन परिस्थितीत खेळाडू पीपीई किट घालून बाहेरच्या दवाखान्यात जाऊ शकतो. बीसीसीआयच्या सुत्रांनुसार नेमके त्याच कालावधीत वरूण चक्रवर्ती कोरोना बाधीत झाला व बायो बबलला छेद गेला. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी व सीएसकेच्या बसचा क्लिनर कोरोनाने बाधीत झाले. शेवटी एक प्रश्न उपस्थित होतो की देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना व बाहेर अतिशय बिकट परिस्थिती असताना सावधानता का बाळगली गेली नाही ?
काही विश्वसनीय सुत्रांच्या माहितीनुसार आयपीएलमध्ये सहभाग घेतलेल्या एका संघाने बीसीसीआयकडे एक तक्रार केली होती की, बायो बबल टिकूण राहण्यासाठी खेळाडूंच्या मनगटात घालण्यासाठी जे ट्रॅकींग डिव्हाईस दिले होते ते सुमार दर्जाचे आहे. खेळाडू बायो बबल मध्ये असताना या ट्रॅकींग डिव्हाईसद्वारे खेळाडूंच्या हालचालींकडे लक्ष दिले जाते. एखादया खेळाडूने जर बायो बबलचे निर्धारीत क्षेत्र ओलांडले तर ते मनगटात घातलेले ट्रॅकींग डिव्हाईस संबंधीतास सुचित करते. सन २०२० चे आयपीएल युएईत झाले होते. त्यावेळी ही तंत्रप्रणाली बाबो बबलचे नियंत्रण करणाऱ्या ब्रिटीश कंपनीने वापरली होती. परंतु या वेळी हे काम चेन्नईस्थित एका कंपनीला दिले असून त्यांच्या कामात अनेक त्रुटी असल्याने बायो बबल लिक झाले.
वास्तविक बघता देशात कोरोनाने हाहाकार माजविला असताना आयपीएलचे आयोजन खरंच आवश्यक होते का ? जर आयोजन केलेच होते तर ते युएईत का नाही केले ? तसेच बायो बबलचे युएईत यशस्वी कर्तव्य बजावणाऱ्या अनुभवी ब्रिटीश कंपनी ऐवजी अनुभवहिन चेन्नईतील कंपनीला का दिले ? याशिवाय अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. आयपीएल स्थगित झाल्याने येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भारतात होऊ घातलेल्या टि-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाला आयसीसी मज्जाव करू शकते. त्यामुळे आयपीएल स्थगित होणे भारतासाठी मानहानीकारक घटना ठरली आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

