२०२१ :वैद्यकीय शिक्षण विभागाची अवैधरित्या छुप्या पध्दतीने कंत्राटी भरती ;
कोरोनाकाळात आरोग्य सेवांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती सरळसेवेनेच करावी !
- भाऊसाहेब पठाण..
मुंबई (प्रतिनिधी) कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी गृह, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सरळसेवेने भरती करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे आदेश, तसेच राज्य मंत्रीमंडळाची संमती असतानाही, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात छुप्या मार्गाने कंत्राटी व बायस्त्रोताने भरती केली जात आहे. त्याला राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचा तीव्र आक्षेप असून, राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे १००% भरती सरळसेवा मार्गानेच करावी, अशी पत्रान्वये आग्रही मागणी केली आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकांनी दि. ११ जून, २०२० च्या राज्य शासनाच्या निर्णयाचा
संदर्भ देत, संघटनेला लिहिलेल्या पत्रात कुशल व अकुशल संवर्गातील भरती, सरळसेवा पद्धतीने करण्याचे आश्वासन दिले होते. तरी देखील छुप्या मार्गाने ही भरती कंत्राटी आणि बाह्यस्त्रोत मार्गाने सुरु आहे. कोरोना काळात तातडीची आवश्यकता म्हणून आरोग्य विभागातील चतुर्थश्रेणीची १०१२७ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यापैकी सार्वजनिक आरोग्य विभागाने सरळसेवा भरतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग मात्र जाणीवपूर्वक विरोधी भूमिका घेत असल्याने महासंघाचा तीव्र आक्षेप आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, परिचारिका, तदनुषंगिक कर्मचारी व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, कंत्राटी तसेच बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यासाठी मुंबईतील सर ज.जी.समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या दि. १६ एप्रिल, २०२१ च्या आदेशानुसार समिती गठित करण्यात आली आहे, त्यांना मुंबईतील जे.जे., जी.टी., कामा व आल्ब्लेस, सेंट जॉर्जेस या ४ रुग्णालयांतील पदांचा आढावा घेऊन रिक्त पदे कंत्राटी व बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याची विहित प्रक्रिया तात्काळ पार पाडण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्वस्वी शासन निर्णय, तसेच राज्य मंत्रीमंडळाच्या सरळसेवा भरतीच्या निर्णयाविरोधातील कृत्य असल्याचेही भाऊसाहेब पठाण यांनी निदर्शनास आणले आहे.
कोरोना संकटकाळात आरोग्य सेवांमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यामुळे पदे भरली
जावीत, परंतु ती कंत्राटी किंवा बाह्यस्त्रोतांद्वारे नव्हे तर सरळसेवा पध्दतीने भरण्यात यावीत, असे चतुर्थश्रेणी
कर्मचारी महासंघाची आग्रही मागणी आहे. शासनाकडे ही मागणी करतानाच, त्यानुसार प्रक्रिया न झाल्यास मात्र
महासंघाचा त्याला कडाडून विरोध राहील, असेही भाऊसाहेब पठाण यांनी म्हटले आहे. याबाबत राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या वतीने मा.मुख्यमंत्री, मुख्यसचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय आणि आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक यांना महासंघाने लेखी निवेदने देखील दिलेली आहेत.

