बाळ गंगाधर जांभेकर, बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर, बाळासाहेब ठाकरे, विजय तेंडुलकर, अरूण साधू, अरूण टिकेकर अशा अनेक पत्रकारांनी आजचे वृत्रपत्राचे क्षेत्र प्रकाशित केले आहे. त्यांच्याच लेखनीतून कठीण, आव्हानांतून, चढ उतारांतून पत्रकारिता क्षेत्र उजळून निघाले आहे. महान पत्रकारांचा वारसा पुढे चालविण्याचे काम आजच्या पिढीवर आहे. पत्रकारितेला दिवसेंदिवस नवी उंची देण्याचे काम आजच्या पिढीवर आहे. परंतू खरच तसे होत आहे का ? राजकारणाच्या "पेड न्यूज व जाहिरातींच्या" अर्थकारणाच्या विषारी विळख्यात वृत्तपत्र व्यवसाय अडकला आहे. दिवसेंदिवस तो विळखा अधिकच घट्ट होत चालला आहे. अनेक नामवंत वृत्तपत्रांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्व गमावले आहे.
आजही समाजात जावून विचारले की, ....... नाव असणारा पेपर कोणाचा ? तर तो लगेचच मोठ्या राजकीय पक्षांची नावे घेतो. पक्ष आधारीत वृत्तपत्र किंवा दत्तक गेलेली अनेक लहान मोठी वृत्तपत्रांची संख्या वाढत चालली आहे. "स्वअस्तित्व टिकविण्यासाठी तात्पुरती केलेली तडजोड" म्हणजे "एकच प्याला, राजकीय पेड न्यूज व जाहिराती, दारू दुकाने, बार, परमिटरूमच्या जाहिराती, समाजात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या जाहिरातींतून मिळणारी मोठी रक्कम म्हणजे मायाजाल".
समाजाला दिशा देणारी वृत्तपत्रे "मटका निकाल प्रसिध्दीचे माध्यम केव्हा बनले आणि ते कोणी बनविले ?". आजच्या संघर्षमय आणि तणावपूर्ण वृत्तपत्र व्यवसायासाठी कोठे तरी आपण जबाबदार आहोत का ? वृत्तसंकलन, कागद, जाहिरातींसाठी पायपीट, छपाई, व वितरण ई. मोठी आर्थिक, शारिरीक श्रमाची कसरत करत वृत्तपत्र चालविणे म्हणजे हत्ती संभाळण्या सारखे आहे. ग्रामिण-शहरी पत्रकारांना आज करावा लागणारा आर्थिक संघर्ष म्हणजे केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेवून वृत्तसंकलन व अंक छपाई, पेड न्यूज, नको त्या प्रकरणाला दिलेले विघातक वळण अशी आपल्याच काही बांधवांनी पूर्वी केलेल्या कर्माची फळे आहेत. असो, कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच आजच्या परिस्थितीला जबाबदार आहोत.
2005 नंतर आलेल्या मोबाईल युगाने वृत्तपत्र क्षेत्राची समीकरणेच बदलून टाकली आहेत. टेलिव्हिजन व मोबाईलच्या रूपाने अगदी प्रत्येकाच्या खिशातच आता अपडेट, अगदी मिनटाला अपडेट न्यूज देणारी माध्यमे आली. याचाच फार मोठा परिणाम पत्रकारितेवर झाला आहे. सोशल मिडियामूळे जाहिरातींचे दर अगदी दोन अकड्या पर्यंत आले आहेत. मोठ्या वृत्तपत्रांनी लगेचच काळानुसार बदल करत तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. स्वतःचे युट्यूब चॅनेल, त्यासाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य, प्रिंटींग जाहिरातीचे डिजीटल जाहिरातीत रूपांतर, ई. बदलात आर्थिक गुंतवणूक त्यांना सहज शक्य होती. परंतू ग्रामिण-शहरी साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांना हे बदल तुटपुंज्या खर्चात करूनही योग्य आऊटपुट मिळत नाही.
भांडवला पेक्षाही मार्गदर्शनाचा आभाव असल्याने अनेक साप्ताहिके, लोकल दैनिके हे केवळ अपात्र सधन व्यक्तींच्या जाहिरातींसाठी मांडलिक झाली आहेत. मोठ्या पत्रकारांमध्ये क्षमता आहेत परंतू आता त्यापैकी काही "साहेबांची माणसे" झाली आहेत. "रोख ठोक मांडण्याची शैली संपूण त्यांची जागा प्रश्नचिन्ह, उदगारवाचक चिन्हांनी घेतली आहे". अपात्र धनशक्तीच्या जाहिरातींमूळे जनसामान्यांतील पत नक्कीच कमी होते. परंतू वृत्तपत्र चालवायचे तरी कसे ? हे देखील समीकरण न सुटणारे आहे. बरीच वृत्तपत्रे "चाळीस चोरांच्या गुहेत" अडकली आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी शक्ती नव्हे तर युक्ती लागेल.
राज्य शासनाने पत्रकारांना मदत व्हावी म्हणून काही योजना सुरू केल्या परंतू त्याला मर्यादा आहेत. जाहिरात, पुरस्कार, आर्थिक मदत, यासाठी मोठी वेटींग लिस्ट आहे. काही संघटना देखील आहेत. पत्रकार संघाद्वारे विचारांची देवाण-घेवाण होते. काही प्रमाणात आर्थिक मदतही होते परंतू या पलीकडे जाऊन वृत्तपत्र, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके कशी टिकतील; त्यांचा खप, जाहिरात, डिजीटल व्यवस्थापन, सोशल मिडिया व्यवस्थापन, शासकीय योजनांचा लाभ ई. बाबींचे प्रत्यक्ष ट्रेनिंग देणे, आर्थिक व्यवस्थापन आणि वृत्तपत्र टिकविण्यासाठीच्या युक्त्या, बारकावे सांगावे लागतील. यासाठी मोठ्या प्रमाणात जाणकारांचे संघटन, संकलन व प्रशिक्षण करून पत्रकारिता क्षेत्र टिकवावे लागेल.
कोरोना काळात अनेक पत्रकार बांधवांनी, छायाचित्रकारांनी दाखविलेले धाडस व मांडलेले सत्य हे कौतुकास्पद आहे. परंतू कौतुकाची थाप ही मानसिक बळ देईल, "त्याने एक वेळ पत्रकाराचे पोट भरेल परंतू घरच्यांचे काय ?" अनेक चांगल्या व नामांकित वृत्तपत्रांचा देखील खप कोरोना काळात कमी झाला. अनेक साप्ताहिके या संकटामुळे अखेरचा श्वास घेत आहेत. अनेकांनी पत्रकारीतेतून निवृत्ती घेतली. परिणामी येणारी पिढी अनुभवाने मागास राहायला नको म्हणून ज्येष्ठ व सेटल पत्रकारांनी त्यांचे अनुभव व तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करणे गरजेचे आहे. "स्थानिक पत्रकार संघांनी वर्गणीतून डिजीटल रूम तयार करून त्याचा लाभ भाडे तत्वाने देणे गरजेचे आहे". याचा लाभ धडपडणा-या नवोदित वृत्तपत्रांना, पत्रकारांना होईल.
दिपक सदाशिव पुरी
माहिती प्रवाह पब्लिकेशन,पाथर्डी
जिल्हा अहमदनगर

