shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्यूझिलंडची कसोटीत अव्वल स्थानासह विश्वविजेतेपदाकडे आगेकूच..!


येत्या १८ जून पासून सुरू होणारी कसोटी विश्व अजिंक्यपदाची बहुप्रतिक्षित अंतिम लढत अगदी निकट आली आहे. या मेगा फायनलसाठी पात्र असलेले न्यूझिलंड व भारताचे संघ तटस्थ ठिकाणी म्हणजे इंग्लंडमध्ये पोहचून चांगल्या प्रकारे स्थिरस्थावरही झाले आहेत. भारताच्या अगोदर पोहोचलेल्या न्यूझिलंडने यजमान इंग्लंडविरूध्द दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळून प्रत्यक्ष सामना खेळण्याचा अनुभव घेऊन या दोन सामन्यात आपल्या १८ खेळाडूंना अजमावून पाहीले असून त्या प्रयोगात त्यांच्या हाती बराच मोठा खजिना तर लागलाच शिवाय यजमान बलाढय इंग्लंडला दोन्ही सामन्यात दडपणात ठेवले. याचा लाभ त्यांना मालिका विजय मिळण्यात झाला. तसेच आयसीसीच्या कसोटी मानांकनात विद्यमान विजेत्या भारताला पदच्युत करून न्यूझिलंडने अव्वल स्थानावर झेप घेत अंतिम सामन्यापूर्वी आपले मनोबल उंच करुन ठेवले आहे.
                              

तर दुसरीकडे भारत इंग्लंडमध्ये दाखल झाला तेंव्हा वर्ल्ड टेस्ट चॅंपीयनशीपच्या गुणतालिकेत व आयसीसीच्या मानांकनात प्रथम क्रमांकावर होते. तेथे पोहोचल्यानंतर भारताला आपलेच दोन संघ करून सराव सामना खेळावा लागला. प्रत्यक्ष या सामन्यात खेळाडूंचा काय कस लागला व संघाला काय हासिल झाले हे देवालाच माहीती ? मात्र इंग्लंडमध्ये गेल्या नंतर कोणताही अधिकृत सामना न खेळता, न हारता भारताला आपले कसोटीचे अव्वल मानांकन गमवावे लागले. कसोटीच्या विश्व अजिंक्यपदाच्या जंगी मेजवानीपूर्वीचा हा " प्रथम ग्रासे मक्षीपःत तर नाही ना ? "
                              
न्यूझिलंडने इंग्लंडमध्ये गेले २२ वर्ष अधुरे असलेले इंग्लंडला मालिकेत हरविण्याचे स्वप्न नियमित कर्णधार केन विल्यमसन व ६ नियमीत खेळाडूंच्या गैरहजेरीत पूर्ण केले. या खणखणीत विजयाने भारताच्या विजयाचे तुणतुणे वाजविणाऱ्यांना एकाएकी भानावर यावे लागले. न्यूझिलंडच्या या एका विजयाने जसे एका दगडात दोन पक्षी मारतात तसे भारताचे आयसीसीच्या कसोटी मानांकनातील अव्वल स्थान गेले व इंग्लंडला मायदेशातच पराभवाचे तोंड बघावे लागले. यामुळे आगामी अंतिम सामन्यापूर्वी न्यूझिलंडचा टीआरपी चांगलाच वधारला आहे.
                                
न्यूझिलंडने या मालिकेत नवा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला संधी देऊन मोठा जुगार खेळला,  परंतु हा जुगार त्यांच्यासाठी ट्रंप कार्ड सिद्ध झाला. कॉनवेने ऐतिहासीक पराक्रम करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तसेच नवोदित विली यंग, अनुभवी रॉस टेलरचा फॉर्म किवीजसाठी आल्हाददायक ठरला आहे. शिवाय त्यांचे जलदगती गोलंदाज टिम साऊदी, काईल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर व मॅट हेनरी यांचे फॉर्मात येणे न्यूझिलंडसाठी आनंददायक बातमी आहे. विशेष म्हणजे न्यूझिलंडच्या अंतिम सामन्याच्या प्लॅनमध्ये मॅट हेनरी नव्हता परंतु इंग्लंडविरूध्दच्या दुसऱ्या कसोटीत सहा बळी घेऊन सामनावीर पुरस्कार मिळविल्याने त्यांच्या पुढे त्याला निवडावे का वगळावे ? हा मोठा पेच पडला आहे. कारण टिम साऊदी, काईल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, नील वॅगनर हे त्यांचे अंतिम सामन्यात तोफा डागणार हे पक्के आहे. 
                           
न्यूझिलंडकडे उच्च दर्जाचा फिरकी गोलंदाज नाही त्यामुळे ते अडचणीत येतील असे भाकीत अनेक तज्ञ मंडळी वर्तवित असताना इजाज पटेलने इंग्लंडविरूध्द अचूक गोलंदाजी करून सामन्यात ४ महत्वाचे फलंदाज बाद केल्याने न्यूझिलंडच्या फिरकीचा प्रश्नही सुटल्या सारखा वाटतो.
                             
इंग्लंडविरुद्धच्या या एका विजयाने न्यूझिलंडच्या बाजूने विश्वकरंडकाचे पारडे झुकल्याने भारतीय संघ दबावात येणार हे मात्र नक्की. कारण अंतिम व निर्णायक सामना न्यूझिलंड विरूध्द हरण्याचे बरेचसे तोटके आपण माझ्या मागील लेखात वाचले आहेतच,  परंतु १८ तारखेला सुरू झालेला सामना भारत हरतो या नव्या तोटक्याची त्यात भर पडल्याने भारताच्या विजयाविषयी क्रिकेटप्रेमींच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली असणार हे मात्र नक्की !
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close