पिंपरी चिंचवड:-अभियांत्रिकी शिक्षण आता मराठीतून मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मातृभाषेतून अभियांत्रिकी शिक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून चार इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि ‘सीओईपी’मध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत.
नवीन शिक्षण पद्धतीत आल्यानंतर तंत्रशिक्षण मंडळाने (AICTE) शिक्षणात मातृभाषेचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून देणा-या शिक्षण संस्थांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि ‘सीओईपी’ने मराठीतून इंजिनिअरिंग अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याबाबत AICTE आणि पुणे विद्यापीठाकडे परवानगी मागितली होती. त्याला आता विद्यापीठ आणि मंडळाने हिरावा कंदील दाखवला आहे.
‘सीओईपी’मध्ये सिव्हिल इंजिनिअर, प्रोडक्शन इंजिनिअरिंग, आणि इन्फोरमेशन टेक्नोलॉजी (आयटी) हे अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहेत तर, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी (आयटी) हा अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध होईल.
इंग्रजी भाषेच्या भितीपोटी इंजिनिअरिंगचा पर्याय डावलणा-या विद्यार्थ्यांना आता मराठीतून इंजिनिअरिंगचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे अनेकांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.


