shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विश्व कसोटी अंतिम सामन्यात भारतासाठी डोकेदुखी ठरू पाहणारे न्युझिलंडचे खेळाडू..!

येत्या १८ जून पासून कसोटी विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील साऊथॅम्पटन येथील रोझ बाऊल स्टेडियमवर खेळविला जाणार असून या सामन्यात खेळणारे दोन्ही संघ न्यूझिलंड व भारत यांची तयारी जवळ जवळ पूर्ण होत आली आहे.

या तयारीचा भाग म्हणून न्यूझिलंडने इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळली. त्या मालिकेत किवीज संघाने यजमान इंग्लंडला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. लॉर्डसवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पावसाचा व्यत्यय, इंग्लंडचा डरपोक आणि कातडी बचाव खेळ न्यूझिलंडला विजय मिळवण्यात अडसर ठरला. मात्र दुसऱ्या कसोटीत नियमीत कर्णधार व भरवशाचा फलंदाज केन विल्यमसनसह ७ महत्वाच्या खेळाडूंविना खेळूनही न्यूझिलंडने विजय मिळविला. इंग्लंडविरूद्ध न्यूझिलंडचा खेळ सर्वच क्षेत्रात सफाईदार झाल्याने भारताविरूध्दच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझिलंड यशस्वी होण्याची शक्यता वाढली आहे. न्यूझिलंडला यशाची आशा दाखविणारे काही खेळाडू भारताला रोखू शकतात. अशा काही लक्षवेधी खेळाडूंवर आज आपण एक प्रकाश झोत टाकणार आहोत.

अवघ्या तेरा दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात करणारा व जेमतेम दोन कसोटींचा अनुभव पाठीशी असणारा डावखुरा सलामीवीर डेव्हॉन कॉनवे अचानक न्यूझिलंडच्या फलंदाजीचा अधारस्तंभ बनला आहे. मुळतः आक्रमक फलंदाज असलेला कॉनवे खेळपट्टीवर नांगर टाकण्यातही वाकबगार असल्याचे इंग्लंडविरुद्ध पदार्पणातील द्विशतकी डाव व दुसऱ्या कसोटीतील ८० धावांच्या खेळावरून लक्षात येते. दोन कसोट्यातील ३०३ धावा भारताविरूध्द महत्वाच्या सामन्यात त्याचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या असून तो भारताला सुरुवातीलाच त्रासदायक ठरू शकतो.

केन विल्यमसन हा न्यूझिलंडचा कर्णधार इंग्लंडविरुद्ध लॉर्डस कसोटीत दोन्ही डावात अपयशी ठरला व दुसऱ्या कसोटीत दुखापतीमुळे खेळू शकला नाही. परंतु आता तो पूर्णपणे फिट होऊन नेहमी प्रमाणे भारताच्या मार्गात अडसर ठरण्यास सज्ज झाला असून महत्वाच्या सामन्यात त्याची बॅट आपला जलवा दाखविण्यात मागे राहात नाही. त्यामुळे विल्यमसन भारताला विजेतेपदासाठी झुंजायला लावणार एवढे निश्चित !

 न्यूझिलंडच्या वेगवान गोलंदाजीचा महामेरू असलेला टिम साऊदी भारताविरूद्ध नेहमी यशस्वी झाला असून विराट कोहलीला त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक वेळा त्याने बाद केले आहे. भारताविरूध्द तो आठ कसोटी खेळला असून ३९ फलंदाज त्याने बाद केले आहेत. साऊदीचा भन्नाट वेग व दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची खासीयत भारताला महागात पडू शकते. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे इंग्लंडमधील वातावरण त्याच्या गोलंदाजीला पोषक आहे.
                         
 जगातील सर्वात धोकादायक असलेला डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आपल्या धारदार वेगाने व सर्वच प्रकारच्या स्विंगने भारतीय फलंदाजांपुढे अडचण निर्माण करण्यात सक्षम आहे. इंग्लंडमध्ये नेहमी असणाऱ्या ढगाळ वातावरणात तो कहर करू शकतो. भारताविरूध्द ९ कसोटयात ३६ बळी ही त्याची कामगिरी बरेच काही बोलून जाते. त्यामुळे भारतीय फलंदाजांसाठी बोल्ट घातक ठरू शकतो.
                             
जेमतेम दिड वर्षापूर्वी भारताविरूध्दच मायदेशात कसोटी पदार्पण करणारा ६ फूट ८ इंच अशी ताडमाड उंची लाभलेला डावखुरा जलदगती गोलंदाज काईल जेमीसन वेगवान उसळते चेंडू टाकण्यात वाकबगार आहे. भारताविरूध्द दोन कसोटयात घेतलेले ९ बळी हे त्याच्या या कौशल्याची झलक पेश करण्यास पुरेशे असून जेमीसनपासून भारताला मोठा धोका होऊ शकतो.
                            
मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज रॉस टेलर, टॉम लॅथम, डावखुरा वेगवान गोलंदाज निल वॅगनर, इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीत हिरो बनलेला जलदगती गोलंदाज मॅट हेन्री, नवोदित फिरकीपटू एजाज पटेल, मधल्या फळीतील फलंदाज विली यंग यांना दुर्लक्षित करून चालणार नाहीत, कारण हे सर्वच जण छुपे रुस्तुम आहेत.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close