*शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या हितासाठी तहयात कार्य केले*.:- *प्रा. डी. आर. ओहोळ सर*
*इंदापूर* :- दि.२६( प्रतिनिधी)
राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजातील अनेक गरीब, वंचित, मागासलेल्या लोकांसाठी लोककल्याणकारी राज्य उभे करुन भारतीय जनतेसमोर एक आदर्श ठेवला.जे कार्य महाराजांनी केले,त्या कार्याला जगात तोड नाही. असे गौरोद्गार बामसेफचे राष्ट्रीय महासचिव प्रा. डी. आर. ओहोळ सर यांनी काढले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीदिनी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात (जिजाऊ नगर) बामसेफचे राष्ट्रीय महासचिव प्रा. डी. आर. ओहोळ सर व संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहूल मखरे यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
पुढे प्रा.डी.आर.ओहोळ सर म्हणाले की, काळाच्या पुढे पाहण्याची दृष्टी लाभलेल्या या महामानवाने समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही, हे अचूकपणे जाणले. त्यामधूनच शिक्षण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचविण्यासाठी धोरणे आखून आंमलात आणली. समाजातील शोषित, मागासवर्गाला आरक्षण देण्याची कल्पना सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांची होती. व प्रत्यक्षात ती त्यांनीच आंमलात आणली.बहुजन समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांमध्ये शाहू महाराजांना तत्कालीन उच्चवर्णीयांचा कडवा विरोध सहन करावा लागला. पण त्यांनी या विरोधाला न जुमानता आपले कार्य पूर्णत्वास नेले.छत्रपती शाहू महाराज हे एक अग्रगण्य समाजसुधारक होते. शाहू महाराजांना बहुजनांचा कैवारी या नावाने ओळखले जाते. बहुजन समाजात असणाऱ्या रूढी, प्रथा व परंपरा ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समाजाच्या सर्वांगीण विकासाठी शाहू महाराजांनी अविरत कार्य केले. बहुजन महापुरुषांच्या जयंत्या व स्मृतिदिन हे सर्व लोकांनी मिळून मिसळून करावे.महापुरुषांचे आचार व विचार आचरणात आणल्यानेचं त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल अशा शब्दात प्रा. ओहोळ सरांनी शाहू महाराजांच्या जयंती दिनी फुले, शाहू,आंबेडकर ह्या महापुरुषांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.राहुल मखरे, उपप्राचार्या सविता गोफणे, भिमाई आश्रमशाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास इंदापूर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा आयु. शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) ॲड. बनसुडे मुंबई, दिपक मगर, आकाश देवकाते तसेच संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, प्राचार्या अनिता साळवे व संस्थेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नानासाहेब सानप यांनी केले.
कार्यक्रम स्थळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दक्षता घेण्यात आली.

