कुलदिप यादवने सन २०१७ मध्ये धर्मशाळा येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने चार बळी घेत आपले पदार्पण धडाक्यात साजरे केले. परंतु मागील चार वर्षात त्याने खेळलेल्या कसोटींची संख्या आहे मात्र सात ! या काळात भारत बरेचसे सामने मायदेशात खेळले. तरीही दुर्मिळ अशा या डावखुऱ्या लेगस्पिन (चायनामन ) गोलंदाजाला भारतीय संघ व्यवस्थापनाने संधी देण्यास कुचराई केली असून या अवघ्या २६ वर्षाच्या गुणवान खेळाडूची कारकिर्द टांगणीला लागली आहे. हाच कुलदिप यादव एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन हॅट्रीक घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. हा कारनामा त्याने ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडिज विरूध्द केला आहे.
सध्या भारताचा संघ यशाच्या उंच मनोऱ्यावर आहे. भारतीय संघ सध्या सर्वत्र उत्तम कामगिरी करत असून या संघात संधी मिळणारा प्रत्येक खेळाडू आपले कसब दाखवित आहे. परंतु या दरम्यान काही गुणवान खेळाडूंच्या कारकिर्दीशी संघ व्यवस्थापन विचित्र खेळ खेळत असल्याचे दिसत आहे. त्या पैकी असाच एक खेळाडू आहे कुलदिप यादव !
मार्च २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द कसोटी पदार्पण केलेला कुलदिप जुलै २०१७ मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेला. तेथे त्याने टि-२० व एकदिवसीय या दोन्ही प्रकारात आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. याच दरम्यान यजुवेंद्र चहल व यादव या फिरकी जोडगोळीचा चांगलाच जम बसला. या जोडीने जवळ जवळ सर्वच संघांविरूद्ध प्रभावी मारा करत आपला धाक निर्माण केला. हिच जोडी नंतर "कुलचा" नावाने प्रसिद्ध झाली.
कामगिरीचा विचार करता सन २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी कुलदिपकडे मोठया आशेने बघितले जात होते. परंतु इंग्लंडमध्ये कुलदिपच्या गोलंदाजीला ग्रहण लागले आणि त्याच्या संघातील स्थानालाही ! त्या स्पर्धेत सात सामन्यात केवळ सहाच बळी तो घेवू शकला. त्यानंतर मात्र संघ व्यवस्थापनाच्या नजरेतून तो उतरल्या सारखे वाटू लागले.
या चार वर्षात कुलदिप केवळ सात सामने खेळला. त्यातील सहा भारतात तर एक सामना सन २०१८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सिडनीला खेळला. सात कसोटयात २६ बळी, ६३ वनडेत १०५ बळी तसेच २१ टि २० सामन्यात ३९ बळी अशी त्याची कामगिरी चांगल्या पैकी असून त्याचा कमी झालेला आत्मविश्वास उंच करण्यात कर्णधार कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण कमी पडल्याचे सिद्ध होत आहे. कुलदिपच्या बिघडलेल्या मानसिकतेवर योग्य काम केले असते तर हा कोणत्याही खेळपट्टीवर, कुठल्याही संघाबरोबर हमखास यशस्वी होणारा गोलंदाज अडगळीत पडला नसता.
सन २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघातील एकामागून एक असे अनेक खेळाडू जखमी होऊन संघाबाहेर पडत असताना टिम मॅनेजमेंटने नेट बॉलर म्हणून संघासोबत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरला गाबा कसोटीत खेळविले, परंतु अनुभव असलेल्या कुलदिपला एकाही सामन्यात संधी दिली नाही. यावरून ते त्याच्याशी सापत्न वागत असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी न मिळालेल्या कुलदिपला भारत वारीवर आलेल्या इंग्लंड संघाबरोबर भरपूर संधी मिळेल असे वाटत असताना त्याच्या ऐवजी नवख्या अक्षर पटेल व शाहबाज नदिमला प्राधान्य मिळाले. चेन्नईच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेल सह कुलदिपला संधी मिळेल असे वाटत होते. विशेष म्हणजे सामन्याच्या काही तास अगोदर अक्षर पटेल जखमी झाल्यामुळे कुलदिप शंभर टक्के खेळेल असे वाटत होते, परंतु त्याला डावलून शाहबाज नदिमला खेळवले. त्या सामन्यात नदिमचे पितळ उघडे पडले व भारताला नामुष्कीजन्य पराभव पत्करावा लागला. त्यानंतर संघ व्यवस्थापनावर चोहोबाजूने टिका झाल्याने चेन्नईतच झालेल्या दुसऱ्या कसोटीत त्याला संधी दिली. मात्र तो यशस्वी ठरणार नाही याची पुरी दक्षता टिम मॅनेजमेंटने घेत त्याला मोजकीच षटके गोलंदाजी दिली. त्या नंतर पुढच्या दोन कसोटया, पाच टि २० व ३ वनडेत त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत त्याला अंतिम संघात स्थान नाकारले.
येत्या २ जून पासून भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तेथे न्यूझिलंड विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना तसेच इंग्लंडविरूध्द पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र या दौऱ्यासाठी त्याला संघातून वगळण्यात आले आहे.
डाव्या हाताने लेगस्पीन गोलंदाजी म्हणजे चायनामन गोलंदाजी ही अतिशय दुर्मिळ कला आहे. या गोलंदाजीवर फलंदाज मोठे फटके खेळण्याच्या नादात चकतात व आपली विकेट गमावतात. या गोलंदाजीवर धावा जातात मात्र बळी हमखास मिळतात. त्यासाठी या प्रकारच्या गोलंदाजांना संघ व्यवस्थापनाने पाठबळ देणे गरजेचे आहे. त्याला सतत संधी मिळाली तर त्याचा आत्मविश्वास दुणावतो. उलट येथे टिम मॅनेजमेंट कुलदिपला हाताळण्यात कमी पडत आहे.
कुलदिपचे वय आता केवळ २६ वर्ष असून त्याला योग्य न्याय दिला तर तो संघासाठी खूप काही करू शकतो. त्याची फलंदाजी तुलनेने काहीशी कमजोर आहे. त्यामुळे त्याला डावलले जात असावे. कुलदिप महेंद्रसिंग धोनी संघात असेपर्यंत चांगल्या पैकी यशस्वी व्हायचा. धोनी संघाबाहेर गेल्यानंतर स्टंप्स मागून त्याला योग्य ते प्रोत्साहन देणारा यष्टीरक्षक नसल्याने त्याची मोठी कुचंबना झाली. अखेर त्याला संघाबाहेर जावे लागले.
तरी कोहली -शास्त्री -अरूण यांनी संघाचे हित बघून कुलदिपला योग्य प्रकारे हाताळावे त्यातच भारताचे सौभाग्य सामावले आहे. अन्यथा त्याचा आत्महत्येचा एक प्रयत्न फसला आहे तसा दुसरा प्रयत्न त्याने करू नये यासाठी त्याला योग्य प्रकारे सावरण्याची व संधीची गरज आहे.ती त्याला मिळावी हिच अपेक्षा ! सदिच्छा !! व अनंत कोटी शुभेच्छा !!!
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

