shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (४)..आपुली आपण करा सोडवण**संसार बंधन तोडा वेगे ..!


संत ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला संदेश सद्यस्थितीत पर्यावरण रक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असाच आहे. माऊली ज्ञानेश्वर सांगतात की,
रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी
हृदय मंदिरी म्हणा कारे..
आपण थोडावेळ  विचार करू या की आपल्याला जर आपली प्रगती करायची असेल तर त्यासाठी आपणच प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. 

आपल्याला हे माहिती आहे की पर्यावरणाचा विनाश होतो आहे त्याचे एक कारण आहे जंगलांची अतोनात होत असलेली तोड. म्हणजेच वृक्षतोड. हे आपण कितपत थांबवू शकतो? यावर आपलं किती नियंत्रण आहे? हे अत्यंत दीर्घ मुदतीचे आणि राजसत्तेचे मुद्दे आहेत. 

मग सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? जग प्रगतीकडे झेपावते आहे आणि प्रगतीसाठी पृथ्वीवरील वनक्षेत्रे कमी होत आहेत.  आपल्याला तर पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. जंगले शासनाच्या ताब्यात आहेत. त्यासाठी शासनाचे अधिनियम आहेत. जमीन महसूल अधिनियम, झाडे तोडण्याबाबत अधिनियम असे विविध कायदे आहेत. त्यामध्ये दुर्मिळ वनस्पती रक्षणासाठी विशेष तरतुदी आहेत. खैर,आंबा,फणस,खारफुटी, चंदन, चिंच, तिवस, हलडू, आईन, किंजळ, हिरडा, जांभूळ अशा बारा वनस्पती तोडण्यासाठी प्रतिबंध आहेत. 

पण हे शासनाचे झाले. सामान्य माणसाने काय करावे? तर आपल्या घराभोवती ऑक्सिजनची निर्मिती आपणच करावी. आपली  सोडवणूक आपण करून घ्यावी. संसार बंधन म्हणजे काय तर प्रगतीच्या नावाखाली चाललेला सृष्टीचा विनाश आणि त्यातून मानवाला ऐषारामासाठी पुरवली जाणारी यंत्रणा.या बंधनात आपण गुरफटून गेलोय. मात्र या सर्व मायावी यंत्रणेतून सृष्टीचा विनाश होतोय आणि मानव जात रोगट होत चाललेली आहे. यासाठी आपल्याला आपली सोडवणूक करायला शिकावं लागेल. तेही तातडीने. संसार बंधन तोडा वेगे.
कोणावरही भरवसां न ठेवता आपली प्राणवायूची तहान आपणच भागवायची, आपण आपल्या आसपास झाडे लावायची, त्याचे संवर्धन, संरक्षण करायचे नि हा मानवजन्म, मानवदेह, निरोगी ठेवायचा. आपल्या स्वतःसाठी आपणच काहीतरी करायला पाहिजे.

म्हणजे आपण झाडे लावायला पाहिजेत.
आपली सोय आपणचं करायला हवी .
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं  आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती  उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जूनपासून वन हुतात्मादिन ११सप्टेंबरपर्यंत२०२१  असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान
close