प्रमोद चौधरी । जळगाव जिल्हा प्रतिनिधी:
एरंडोल आतापर्यंत गारांचा पाऊस पडतो हे आपण प्रत्यक्ष अनुभवत होतो परंतु एरंडोल येथील साने गुरुजी कॉलनीत रहिवाशांना वेगळाच अनुभव आल्याचा प्रत्यय आला आहे.दरम्यान दि. ७ जुन रोजी संध्याकाळी ६:३० ते ७:०० वाजे दरम्यान जवळपास अर्धातास तुरळक पाऊस झाला व यावेळी पावसासोबत अचानक दगड आकाशातून पडतांना साने गुरुजी कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांनी पाहिले.
यावेळी कॉलनीतील रहिवाशी गणेश माळी, सिताराम पाटील,विवेक पाटील,हिम्मत पाटील,ललिता महाजन, यांनी आपले अनुभव सांगताना सांगितले की आधी आम्हाला वाटले गारा पडत आहेत.परंतु बाहेर पाहिल्यावर कळले की चक्क दगड पडत होते.
आधी वाटले कोणी फेकत असतील परंतु व्यवस्थित निरीक्षण केल्यावर लक्षात आले की ही दगड आकाशातून पडत होती.सदर दगड साधारण एक ते दिड इंचाचे असुन यात वाळू सोबत असतात तसे गुळगुळीत दगड आहेत.यात काही दगड लाल तर वेगवेगळ्या रंगांचे देखील आहेत.यावेळी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडत होता.दगड उचलण्यासाठी डोक्यावर अक्षरशः लोखंडी टोपली घेतली व दगड उचलले असल्याचे गणेश माळी व सिताराम पाटील यांनी सांगितले तसेच सदर दगड ही खाली जमिनीवर पडत होती तेंव्हा ओली होती असे देखील सांगितले.एक दगड ललिता महाजन यांच्या पायाला देखील लागला असल्याचे त्यांनी सांगितले.
सिताराम पाटील यांच्या पत्नी यांनी सदर दगड देवाचे दगड असल्याचे लोकांनी सांगितल्याने ते दगड घरातील देव्हाऱ्यात ठेवले असल्याचे सांगितले. सदर दगडांचा पाऊस ५० ते ६० फुटांच्या अंतरावर एकच ठिकाणी झाला असुन साने गुरुजी कॉलनीत ८ ते १० घरांवरच तो पडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.सदर घटने बद्दल कॉलनीतील रहिवाशी आश्चर्य व्यक्त करत असले तरी मनात भिती होती की बरं झाले दगड छोटे – छोटे होते.मोठे असते तर कदाचित मोठे नुकसान झाले असते.
दरम्यान शहरातील साने गुरुजी कॉलनीत झालेल्या या प्रकारामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे तसेच निरनिराळे तर्क वितर्क वितर्क लढवले जात आहेत.

