shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

" विश्व कसोटी क्रिकेट अजिंक्यपद अंतिम सामना " आयसीसी व इंग्लिश क्रिकेट बोर्डाच्या सौजन्याने पहिल्या दिवशीच्या खेळावर पावसाचे पाणी..!!

तब्बल १४४ वर्षाच्या महाप्रतिक्षेनंतर कसोटी क्रिकेटचा पहिला विश्वविजेता ठरविण्याचा योग आला असता जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवणारी जगातील सर्वोच्च क्रिकेट संस्था इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सील ( आयसीसी ) व हा महत्वाचा सामना आयोजित करणाऱ्या इंग्लिश क्रिकेट बोर्ड ( ईसीबी ) यांच्या गलथान कारभार व गचाळ नियोजनामुळे या सामन्याच्या पहिल्या दिवशी क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेट ऐवजी दिवसभर पावसाचाच खेळ चालू होता. यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या भावनांवर अक्षरशः नांगर फिरविला गेला. त्याचबरोबर या अतिविशिष्ठ सामन्यासाठी अपार परिश्रम घेणाऱ्या खेळाडूंच्या मानसिकतेलाही आघात झाला असणार.
                   
       
मागील दोन वर्षांपासून सुरू असलेली ही स्पर्धा सुरूवाती पासून गचाळ नियोजनाची शिकार ठरली आहे. कोणतीही स्पर्धा घेण्याचा एक विशिष्ठ कालावधी असतो. तसेच त्या स्पर्धेत खेळणारे संघ आपसात खेळतात मग अंतिम सामन्यासाठी योग्य मुल्यांकनाद्वारे दोन संघ निवडले जातात. या स्पर्धेत काही संघ २, ३,  ४ तर काही संघ पाच सामन्यांची मालिका खेळले, आणि प्रत्येक मालिकेसाठी गुण होते १२० इतकेच ! 
                          
काही संघ मायदेशात जास्त मालिका खेळले तर काहींना परदेशात जास्त मालिका खेळाव्या लागल्या. त्यामुळे काही संघांवर अन्याय झाला तर काही संघाना मोठा फायदा झाला. कोणत्याही संघांची खेळलेल्या सामन्यांची संख्या सारखी नव्हती. उदाहरणच बघायचे तर अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेल्या भारत व न्यूझिलंड या दोन संघांचेच बघू या.
                            
भारताने सहा मालिका खेळल्या. त्यापैकी ५ जिंकल्या व एक हारली. या दरम्यान ते १७ सामने खेळले, त्यातील १२ मध्ये विजय, ४ पराभव मिळाले व एक सामना अनिर्णित राहीला. या  स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत ५२० गुणांसह अव्वल स्थानी होता.
                             
दुसरीकडे न्यूझिलंडच्या कामगिरीकडे बघितले तर ते ५ मालिका खेळले. त्यापैकी ३ जिंकल्या, १ गमावली व एक अनिर्णित राहिली. या दरम्यान न्यूझिलंड ११ सामने खेळले, त्यात ७ जिंकले व चार हारले. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या न्यूझिलंडचे गुण होते ४२० !
                            
भारत व न्यूझिलंडने खेळलेल्या मालिका, सामने व गुण यांच्यातील तफावत लगेच लक्षात येते. हा गोंधळ केवळ या दोन संघांपुरताच नव्हता तर इतर संघांनाही याचा फटका बसला आहे.
                             
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक टप्प्यात ही स्पर्धा मालिका प्रकारात खेळली गेली. मग विश्वविजेता ठरविताना केवळ सामना घेणे म्हणजे दोन्ही संघांवर अन्याय करणारा नियम आयसीसीने बनविला. वास्तविक अंतिम विजेता ठरविताना कमीत कमी तिन सामन्यांची मालिका असणे गरजेचे आहे. जेणे करून दोन्ही संघाना समान न्याय मिळेल व प्रेक्षकांना चांगल्या खेळाचा आस्वाद घेता येईल.
                             
सध्या सुरू असलेल्या सामन्याविषयी बोलायचे झाल्यास येथे आयसीसी व ईसीबी यांनी फार मोठा घोळ घातला आहे. जून महिन्यात साऊथॅम्प्टन येथे पाऊस असतो हे या दोन्ही संस्थांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. तरी सुद्धा येथे हा अंतिम सामना आयोजित करण्याची चुक आयसीसीकडून झाली.
                               
वास्तविक हा सामना लॉर्डसवर घेण्याचे मुळ नियोजन होते. परंतु लंडनमधील कोविड-१९ च्या बिकट परिस्थितीमुळे लॉर्डसवरून सामना रोझ बाऊलवर स्थलांतरीत करण्यात आला. परंतु २ ते ६ जून दरम्यान इंग्लंड व न्यूझिलंड यांच्यात पहिला कसोटी सामना येथे निर्विघ्नपणे पार पडला. तसेच सध्या लॉर्डसवर एक कौंटी सामना सुरू आहे. मग आयसीसीने हा सामना साऊथॅम्प्टनला हलविण्याची घाई का केली ? तेव्हा कोरोनाची भिती होती. मग आता तेथील कोरोना गेला कुठे ?
                                
साऊथॅम्पटन येथे गेले दिड महीन्यापूर्वीच तेथील हवामान खात्याने पावसाचे भाकीत केले असताना ईसीबीने आयसीसीला सामन्याचे स्थळ बदलविण्याचे का सांगितले नाही ? या पूर्ण आठवड्यात साऊथॅम्पटनला पाऊस होणार असल्याने हा सामना पूर्ण होण्याचे कुठलेही लक्षण दिसत नाही. तेंव्हा आयसीसीने हा सामना सुरू न करता त्याला सुरक्षित ठिकाणी हलवावे अथवा साऊथॅम्पटनलाच पाऊस उघडल्यानंतर हवामान खात्याच्या सल्ल्यानुसार घ्यावा. यामुळे कसोटी क्रिकेटला खराखुरा विश्वविजेता मिळेल व क्रिकेटचे पावित्र्य राखले जाईल. तसेच प्रेक्षकही कसोटी क्रिकेटचा निर्भेळ आनंद लुटतील. संयुक्त विजेता हा न शोभणारा प्रकार कोणालाही आवडणार नाही.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close