shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुलतानी कोविडकिड्याचा भयंकर चावा..!!

कोविडचा किडा सकाळी ७ ते ४ पर्यंत झोपतो आणि दुपारी ४ पासून सकाळी ७ पर्यंत शहरात भटकतो ... शिवराम पाटील..!!


प्रतिनिधी : संजय वायकर (  दि . १६ )  :  कोविड किड्याने संपूर्ण मानव जमातीला हैराण केले.हे आम्ही मान्य करतो.पण कोविड पेक्षा जास्त मुख्यमंत्र्यांनी  परेशान केले.कोविड किड्याचा बागुलबुवा करून नको ते तालिबानी आदेश काढले.इतके कि सुलतान महंमद तुघलकने सुद्धा आत्महत्या केली असती.
       


कोविड किड्याचा कोणी अभ्यास केला राम जाणे! पण हा कैलेंडर आणि घड्याळाचा चांगला वापर करीत असावा.म्हणून सकाळी सात ते संध्याकाळी चार पर्यंत झोपतो.आणि चार ते सकाळी सात पर्यंत शहरात भटकतो.तो शहरात भटकतो तेंव्हा माणूस प्रजातीने शहरात फिरू नये.इतर कृमी किटक,पशू ,पक्षी,माकड,चोर ,नोकर यांनी फिरण्यास हरकत नाही. त्यांना हा कोविड किडा ओळखतो परंतु चावत नाही.जुनी ओळख असेल किंवा जुने नाते असेल.
     
कोविडकिड्याला बस,ट्रेन, रिक्षा ,स्कूटर मधील फरक समजत असावा. म्हणून हा काही दिवस बसमधे प्रवास करणाऱ्यांना चावत होता.आता नाही.आता तो लोकल ट्रेनमधून प्रवास करीत असावा. असे महाराष्ट्र सरकारला लक्षात आलेले असावे.किंवा सरकारने तसे त्याला आदेश दिले असावेत कि,ज्याच्या कडे आम्ही दिलेले आयकार्ड आहे, त्याला चावू नये.आयकार्ड नसलेल्या माणसाला चावू शकतो.हा किडा इतका बुद्धिमान असावा कि याला मेल एक्स्प्रेस आणि लोकल ट्रेनमधील फरक ताबडतोब समजतो.म्हणून सरकारने मेल एक्स्प्रेस चालू ठेवल्या आणि लोकल ट्रैन बंद ठेवल्या. पत्रकार बांधवांनी कोविड किड्याकडून एक पत्र आणले,कि आजपासून पत्रकारांना चावणार नाही. त्यांना लोकल ट्रेन ने प्रवास करू द्यावा.ते पत्र मुख्यमंत्र्यांना दाखवले. पण त्यावर विचार करायला मुख्यमंत्र्यांना फुरसत मिळत नाही.
    
या कोविड किड्याला  सरकारी नोकर आणि   फालतू नागरिक यामधील फरक ताबडतोब लक्षात येत असेल.म्हणून सरकारी नोकरांना मुक्त संचार करण्यास मोकळीक आहे.तसेच आमदार, खासदार, मंत्री यांनासुद्धा हा किडा चावत नाही.इतकेच नव्हे तर नेत्यांच्या सोबत लाखो लोक एकत्र आले तरी कोविडकिड्याला राग येत नाही. पण सरकार विरोधात पांच किंवा पांचपेक्षा जास्त नागरिक जमा झाले कि हा किडा चावतो.सरकार ची स्तुती करणारे आणि विरोध करणारे लोकांना हा किडा ताबडतोब ओळखून घेतो.इतका तो सेन्सेटिव्ह व एक्सपर्ट आहे.
    
कोविडकिडा एकदा फर्मान काढून थांबत नाही तर परिस्थिती पाहून तसे फर्मान बदलत असतो.ते त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते.सरकारच्या जी. आर. पेक्षा कोविड किड्याने काढलेले फर्मान, परिपत्रक, लखोटा यांची संख्या जास्त आहे.ते लक्षात ठेवायला आमच्या मेंदूत स्पेस उरली नाही.
    
आता हा वारकऱ्यांवर भयंकर नाराज आहे.वारकरी विठ्ठलाचे भक्त असले तरी किडा विठ्ठल देवालाही जुमानत नाही. विठ्ठलाचे  नियम,कायदे,आदेश सुद्धा या किड्याने भिरकावून दिलेत.केराच्या टोपलीत.
     
हा किडा दुजाभाव करतो,असे माझ्या लक्षात आले आहे.काही ठिकाणी परीक्षा घेऊ देतो.काही ठिकाणी घेऊ देत नाही. एसटी नोकरभरतीतही काही जिल्ह्यात परीक्षा होऊ दिली.जळगाव ला होऊ देत नाही.
  
हा कोविडकिडा कोर्टात दुपारी दोननंतर येतो.बरे!आला तर वकिलांना सोडून न्यायाधिशांना चावतो.इतका राग का?दोघांचे कोट काळे असूनही,कसे काय ओळखतो?आम्ही लवकर ओळखू शकत नाही.फिर्यादी आणि आरोपींना हा किडा चावत नाही. असा फरक का करीत असावा?नेमके याच्या डोक्यात काय चालते?कळू देत नाही.
    
महाराष्ट्र सरकार या कोविडकिड्याच्या आदेशाने चालते कि हा किडा सरकार च्या आदेशाने काम करतो,हे आधी जाणून घेतले पाहिजे.काहीतरी रहस्यमय कनेक्शन असले पाहिजे.
  
हा कोविडकिडा नरेंद्र मोदी, अमित शाहा,ममता बैनर्जी, अजितदादा पवार,पंकजा मुंडे,देवेंद्र फडणवीस, नाना पटोले,गुलाबराव पाटील  यांना घाबरत असावा. त्यांच्या सभेत हा चार हात लांब राहातो.अशी काय जादू असेल यांचेकडे?शोधून काढले पाहिजे.
   
हा कोविडकिडा असे वागण्याचे काहीतरी कारण असेलच.कदाचित हा किडा मानसिक संतुलन गमावलेला असू शकतो.म्हणून यावर इतर कोणतेही व्हैक्सीन लस शोधणे तर चालू ठेवा पण एकदा याची सायको टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.कारण आपण मानवजात त्याच्यावर फिजीकली बंदी घालू शकतो पण मेंटली घालता येत नाही. हे डोक्यापार गेलेले दुखणे आहे. म्हणून यावर कोणी डोकेबाज माणूस इलाज करू शकतो.साधासुदा डॉक्टर,वैज्ञानिक, शास्रज्ञाला शक्य  होणार नाही.
     
आम्ही सामान्यजन या कोविड किड्यामुळे जगण्याचे नैसर्गिक आधिकार गमावून बसलो.राज्यघटनेतील वैधानिक आधिकार विसरून गेलो.पण हा किडा आमचा पिछा सोडायला तयार नाही. या किड्याच्या या अशा वागण्याने अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यांनी ईश्वराला सांगितले पाहिजे कि,हा किडा मानवप्रजातीचा खूप छळ करीत आहे. याला ताबडतोब ईश्वरदरबारी बोलवून घ्यावे.किमान जे पृथ्वीतलावर मुठीत जीव धरून आहेत,त्यांना तरी जगू द्यावे.
    
असा काही निरोप आला तर आपण एकमेकांना कळवावे. हि विनंती करतो.
     
थांबा.थांबा.प्लीज. वाचकांना येथे थोडेसे थांबवतो. माफ करा.पुन्हा चर्चा करू.पण विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेली ताजी माहिती आमच्या हाती लागलेली आहे.ती तुम्हाला खात्री करून घ्यावी लागेल.ती अशी कि,
    
कोविडकिड्याचे दोन स्टेन निर्माण झालेले आहेत.एक रहमानी कोविडकिडा व दुसरा सुलतानी कोविडकिडा.दिर्घ अभ्यासानंतर असे लक्षात आले कि सुलतानी किडा फक्त सत्तेवरील लोकांना चावतो.तसा त्याने महाराष्ट्रात अनेकांना चावा घेतलेला आहे. तो चावल्यानंतर त्या लोकांना रहमानी किडा चावत नाही.तसा त्या दोन्ही किड्यांमधे करार झालेला आहे.त्या कराराचे ते काटेकोर पालन करतात.महाआघाडीतील घटपक्षांपेक्षा जास्त.
   
तसेच रहमानी किडा फक्त सामान्य लोकांना चावतो.सत्तेवरील लोकांना चावत नाही.तो कोणा कोणाला ,कुठे कुठे, कसा कसा चावणार आहे,त्याचे नियोजन करून सिड्युल बनवलेले मुख्यमंत्र्यांना दिल्याचे संकेत देत आहे. त्यामुळे त्याच्या सिड्युल नुसार ,वर्किंग टाईमटेबल नुसार तो चावण्याचे काम करतो.याची  सामान्य नागरिकांनी नोंद घ्यावी. ज्यांना सुलतानी किडा चावलेला आहे,त्याला मात्र रहेमानी किडा चावत नाही. सैल्यूट मारून पुढील मोहिमेवर निघून जातो.म्हणून त्याच्या कामकाजाच्या वेळेत सामान्य लोकांनी बाहेर निघू नये,असा सक्त आदेश महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे.त्या आदेशाचे कोणीही उल्लंघन करू नये.केल्यास रहमानी किडा चावला नाही तरी सुलतानी किडा चावलेली माणसे  तुम्हाला चावू शकतात.सुलतानी किडा चावल्यामुळे सरकार भयंकर पिसाळते.असे त्या तज्ञांचे म्हणणे आहे.
     
इतिहासतज्ञ ,मानसशास्त्रज्ञ,राजनितीतज्ञ यांनी एकत्र बसून पुढील अनुमान काढले.उदाहरण दिले कि,असाच सुलतानी किडा १९७५मधे इंदिरा गांधी ,संजय गांधी व काही साथीदारांना चावला होता.त्यावर कोणीही इलाज करू शकले नाही. पण रहेमानी किडा चावलेले जयप्रकाश नारायण यांना इलाज सुचला.जोपर्यंत यांना खुर्चीवरून खाली खेचत नाहीत तोपर्यंत सुलतानी किड्याची बाधा जाणार नाही.जयप्रकाश नारायण यांनी स्वतः त्या दिशेने इलाज सुरू केला.नंतर मोरारजी देसाई वगैरे मंडळींना पटला.त्यांनी सहकार्य केले.शेवटी दोन वर्षांनी इलाज झाला. खुर्ची रिकामी केली. तेंव्हाच सुलतानी किड्याची बाधा उतरली.नंतर अशी बाधा झाल्याचे  स्वयं इंदिरा गांधींनी जाहीरपणे कबूल केले होते.बाधा झालेल्या काळात प्रजेला  जो त्रास दिला त्याबद्दल प्रजेची माफी मागितली होती.प्रजेनेही मोठ्या मनाने माफ केले होते. कारण चूक इंदिरा गांधींची नव्हती. त्यांना सुलतानी किडा चावल्यामुळे त्यांच्या हातून चुकीचे कृत्य घडत होते.
   
आताही महाराष्ट्रात असाच सुलतानी किडा चावल्यामुळे मुख्यमंत्री असे वागत आहेत का?याचा अभ्यास चालू आहे.

....शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
जळगाव जिल्हा जागृत जनमंच.
close