shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पर्यावरण जनजागरण (४१)...! पारखी झाली माणसं..!!



आज माणूस माणसाला ओळखत नाही अशी अवस्था झालेली आहे. चंगळवाद, स्वार्थ, अहंकार यांच्या विळख्यात सामाजिक संतुलनच हरवले आहे. याबाबतीत एक दिव्यांग कवी चंद्रकांत देशमुखे यांनी आपली व्यथा कवितेतून पुढीलप्रकारे सादर केलेली आहे.

पारखी झाली माणसं|

जग छोटं झालं तसं
बारकी झाली माणसं... 
परस्परांच्या प्रेमाला पण
पारखी झाली माणसं|

पाळणागृहात बालक गेले
वृद्धाश्रमात पालक
पैसे मिळवणारेच ठरतात
संसाराचे मालक|
ज्यांनी दाखविलं जग तीच
पोरकी झाली माणसं...
परस्परांच्या प्रेमाला पण
पारखी झाली माणसं|

काल हाती हात त्याला
आज देती शिव्या|
काल मारी लाथ, त्याच्या
आज गाती ओव्या... 
तात्पुरत्या स्वार्थापायी
बेरकी झाली माणसं... 
परस्परांच्या प्रेमाला पण
पारखी झाली माणसं|

एकमेकांच्या देशात धाडतात
अतिरेक्यांच्या टोळ्या|
पिसाटलेली माणसंच झाडतात
माणसांवरती गोळ्या... 
कोठेही जा जगात
एकसारखी झाली माणसं|
परस्परांच्या प्रेमाला पण
पारखी झाली माणसं|

काॅम्प्युटर-इंटरनेटनं
नवं ज्ञान येतं घरी...
माणसा-माणसांत वाढू लागली
खोल रूंद दरी..
उंटाची चाल पाहून
तिरकी झाली माणसं..
परस्परांच्या प्रेमाला पण
पारखी झाली माणसं|

अंधकवी कै.चंद्रकांत देशमुखे-बाबजी काका

वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे. 

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..
पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान.
close