हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख):
दि.१३,केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात डाँ.प्रीतम मुंडे यांना डावलल्यामुळे मराठवाड्यात अनेक मुंडे समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.हिंगोली येथील भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा कट्टर मुंडे समर्थक सचिन रामचंद्र दराडे यांनी आपल्या सक्रीय सदस्यत्व पदाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड.शिवाजीराव जाधव यांच्याकडे पाठविला असून पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना नेहमीच भाजप कडून डावलले जात असल्याचा आरोप दराडे यांनी केला आहे.
सचिन दराडे हे अनेक वर्षांपासून हिंगोली व सेनगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे संघटन बांधणीचे काम करीत आहेत.२०११ मध्ये त्यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे सेनगाव तालुकाध्यक्ष पद होते तर २०१४ मध्ये त्यांची हिंगोली जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली होती,२०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य म्हणून काम पाहत होते.सचिन दराडे हे पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यांच्यावर नेहमीच अन्याय होत होता.राजीनाम्याचे लोण हिंगोलीत ही पोहचले असून दराडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये डावलले जात असल्याचा आरोप केला आहे.


