परमार्थ सांडून प्रपंच करिसी।
तरी तू येमयातना भोगिसी।
अंती परम कष्टी होशी।
यातना भोगीता।।
समर्थ रामदासस्वामींनी दासबोधाच्या बाराव्या दशकाच्या पहिल्या विमळ लक्षण समासात वरील उपदेश केलेला आहे.
केवळ प्रपंच हा सर्वश्रेष्ठ नाही तर प्रपंचामध्ये सुख, समाधान, ऐश्वर्य, तणावमुक्ती हे जर पाहिजे असेल तर मानवाला परमार्थ हा करायलाच पाहिजे.
परमार्थ सोडून प्रपंच केलास तर तुला अत्यंत दुःख, यातना होऊन या यातनांमुळे तू कायमचा दुःखी कष्टी होशील.
परमार्थ म्हणजे निष्काम कर्मयोग. समाजहिताची भावना मनात ठेवून आपण केलेल्या कामाचा समाजाला उपयोग व्हावा. एवढेच नव्हे तर समाजाने त्याचा उपभोग घ्यावा यासाठी सातत्याने झटणे याला समर्थ परमार्थ म्हणतात. हा परमार्थ स्वयंकेंद्रित नसून तो विश्वव्यापी आहे. आता आपण असे पाहू या एखाद्या व्यक्तीने सुंदर घर बांधलेले आहे आणि त्या घराभोवती काटेरी कुंपण केलेले आहे. ज्यायोगे त्याच्या घरात कोणीही येऊ शकत नाही. स्वतःच्या सुरक्षिततेसाठी केलेल्या या कुंपणात तो स्वतः बंदिवान होऊन राहतो आहे. आणि मग एकांतवासामध्ये दुःख करत बसलाय. आमच्या एका मित्राने घराभोवती भरपूर झाडे लावली पण त्यात एकही फळाचे फुलाचे अथवा औषधी झाड नव्हते. सगळी नपुंसक झाडे. त्याचे म्हणणे असे की झाडाला फुले-फळे आली तर मुले त्रास देतात. ज्यावर पक्षी घरटे बांधू शकत नाही, ज्याची फळे मिळण्याची सुतराम शक्यता नाही अशा झाडांवर पशुपक्षी कसे येणार? आणि नैसर्गिक आनंद कसा मिळणार ? म्हणजे या कर्मातून परोपकार कुठे झाला. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात विदेशी वृक्षांची लागवड झाली. आता ही झाडे एवढी मोठी झालेली आहेत की त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहेत. ही झाडे भरपूर ऑक्सिजन सोडत नाहीत तसेच त्यांच्या मुळाशी दुसऱ्या वनस्पतींना जगूनही देत नाहीत. परिणामी आपल्या देशातील अनेक वनस्पती या नामशेष होऊ लागल्यात. हे आक्रमण यमयातनेचे चिन्ह नाही का? झाडे लावणे हे जरी पुण्यकर्म असले तरी ती कोणती झाडे लावावीत याचा विवेक विचार असायलाच हवा. पण झाडे लावायची म्हणून लावायची यामध्ये कुठलाही परमार्थिक विचार केला नाही. त्याचा परिणाम आज आपण भोगतो आहोत.पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी उपयुक्त असे वड, उंबर,पिंपळाचे झाडदेखील अनेक गावांमध्ये आज दिसत नाही. आणि ज्या झाडांचा काहीही उपयोग नाही अशा झाडांची जंगले वाढलेली आहेत. आम्ही आमच्यावरच हा अन्याय केलेला आहे की नाही. याचा परिणाम केवळ पर्यावरणाचे असंतुलन म्हणजेच यमयातना. शहरीकरण, रस्तारूदीसाठी अफाट प्रमाणात वने तोडली आणि गावाच्या बाजूचे पाणवठे बंद झाले. रानातील प्राणवायू देणाऱ्या, जमिनीमध्ये पाण्याचा संचय करणाऱ्या वनस्पतींची विल्हेवाट लावल्यामुळे आज शुद्ध हवेसाठी आपण तडफडतो आहोत. विकतचे पाणी घेऊन पित आहोत. म्हणजे अविचाराने केलेल्या कृतीचे फळ निसर्ग कशाप्रकारे देतो याचे प्रबोधन समर्थ आपल्या उपदेशातून करतात. गावची वनराई तोडताना वनराईतील वन्यजीव, पक्षी यांची अवस्था काय होईल, भूगर्भाची रचना कशी बदलेल याचे कोणतेही भान आपण ठेवले नाही आणि आज जागतिक तापमानाच्या संकटाला तोंड देत दुष्काळ, अतीवृष्टी, महामारी, वादळे अशा प्रकारच्या यमयातना भोगीत जगणे आपल्या नशिबी आले आहे. यासाठी परमार्थिक भावनेतून वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण गरजेचे आहे.
वृक्ष आणि जीवसृष्टी यांचं घनिष्ट नातं आहे. यातून सुधारणावादी मानवाने बोध घेऊन वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन आणि त्यातून पर्यावरणाचे रक्षण करणे ही राष्ट्रभक्ती आहे हे समजून आचरण करणे ही काळाची गरज आहे.
लेखक : चंद्रकांत शहासने, पुणे
संतवांड़मयाचे विज्ञाननिष्ठनिरुपणकार
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५
*कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्यावतीने पर्यावरण जनजागृती उपक्रमांतर्गत..*
*पर्यावरण दिन ५ जून २०२१पासून वन हुतात्मादिन ११ सप्टेंबर २०२१पर्यंत असे ९९ दिवसांचे पर्यावरण जनजागृती अभियान*

