पहिल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेतेपदाचा घास थोडक्यात निसटलेल्या भारताने दुसऱ्या सत्रातील याच स्पर्धेची सुरुवात पुन्हा एकदा आशादायक केली. भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला बुधवारी नॉटिंगहॅम येथे सुरूवात झाली. सामन्याच्या सुरुवातीलाच नाणेफेकीचा कौल भारताच्या विरोधात गेला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्याची इच्छा असलेल्या कोहलीला इंग्लिश कर्णधाराचा गोलंदाजी करण्याचा निर्देश मानावा लागला.
मात्र भारताच्या गोलंदाजांनी या गोष्टीचे कुठलेही दुःख न बाळगता आपल्या आक्रमणात धार आणली. सामन्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडचे धावांचे खाते उघडण्यापूर्वीच रॉरी बर्न्स बुमराहाचा बळी ठरला. मात्र त्यानंतर सिबली व क्राऊली इंग्लंडला सुस्थिती मिळवून देतात असे दिसत असतानाच सिराज काऊलीचा कर्दनकाळ ठरला. त्यानंतर कर्णधार ज्यो रूटने एक बाजू लावून धरली खरी परंतु उपहारानंतर सिबलीही त्याची साथ सोडून गेला. पुन्हा एकदा रूटने जॉनी बॅरिअस्टोला मदतीला घेतले व डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र चहापानापूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर बॅरिअस्टोही परतला. चहापानाला ४ बाद १३८ अशी बऱ्यापैकी स्थिती असलेल्या इंग्लंडला चहापानानंतरचे सत्र बिलकुल रास आले नाही.
फक्त कर्णधार ज्यो रूटच काय तो इंग्लंडकडून लढला. त्याची ६४ धावांची खेळी आपला तिसराच कसोटी खेळणाऱ्या शार्दूल ठाकूरने एका घातक चेंडूवर संपविली व इंग्लंडला जोरदार झटका दिला. त्याच षटकात ठाकूरने अष्टपैलू खेळाडू ओली रॉबिन्सनला आल्या पावली शुन्यावरच माघारी धाडले. त्यांनंतर जसप्रित बुमराहाने इंग्लंडचे शेपूट वळवळणार नाही याची दखल घेत धारदार मारा केला.
भारताच्या चारही जलदगती गोलंदाजांनी प्रभावी व शिस्तबद्ध मारा करताना इंग्लडला दोनशे धावांचा भोजाही करू दिला नाही. भारताकडून बुमराहा ४, मोहम्मद शमी ३, शार्दूल ठाकूर २ व मोहम्मद सिराजने एक गडी बाद करत इंग्लंडचा डाव १८३ धावांवर रोखला.
याच वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंड भारतात फिरकी घेणाऱ्या खेळपट्टयांवर याच प्रकारे झटपट बाद झाल्याने ३ -१ अशी मालिका पराभूत झाले होते. त्यावेळी इंग्लंडच्या माजी खेळाडूंनी व प्रसार माध्यमांनी भारतीय खेळपट्टयांवर टिकेची राळ उठवली होती. परंतु यावेळी भारताच्या जलदगती गोलंदाजी इंग्लंडच्या ढिसाळ फलंदाजीचे पितळ त्यांच्याच सोयीच्या खेळपट्टीवर उघडे पाडत आपले वर्चस्व सिद्ध केले.
प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर रोहीत शर्मा व लोकेश राहुलने सावध व सुंदर सुरूवात करत प्रत्येकी नऊ धावा आपल्या नावासमोर जोडल्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज इंग्रज आक्रमणाचा कशा प्रकारे सामना करतात यावर भारताचे या सामन्यातील भविष्य अवलंबून आहे.
भारताने न्यूझिलंड विरूध्द खेळलेल्या पहिल्या डब्ल्यूटीसी फायनल मधील आपल्या संघात तीन बदल केले. जखमी सलामीवीर शुभमन गिलच्या जागेवर लोकेश राहुल संघात आला तर जखमी वेगवान गोलंदाज ईशांत शर्माची जागा मोहम्मद सिराजने घेतली. आश्चर्याची बाब म्हणजे त्या सामन्यातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज रवीचंद्रन आश्वीनला संघाबाहेर बसवून शार्दूल ठाकूरला संघात घेतले. खरे तर रवींद्र जडेजा त्या सामन्यात खेळाच्या सर्वच क्षेत्रात अपयशी ठरला असूनही तसेच आश्वीन त्याच्या पेक्षा सरस गोलंदाज असताना त्याला बाहेर ठेवण्यात आले, तर जडेजा आश्वीन पेक्षा चांगला फलंदाज असल्याचे सांगून संघात घेतला. परंतु आश्वीनच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तर लक्षात येते की त्याचे कसोटीत पाच शतकं आहेत तर जडेजाचे केवळ एक ! आश्वीन कपिलदेव नंतरचा कसोटीत ४०० बळी व २५०० पेक्षा जास्त धावा करणारा एकमेव खेळाडू आहे.
संघातील खेळाडूंना चांगल्या कामगिरीनंतरही संघात स्थान न देण्याच्या कोहलीच्या ह्याच हेकेखोरपणामळे काही खेळाडू महत्वाच्या सामन्यात कोहलीला साथ देत नाहीत. हे आपण आयसीसीच्या निर्णायक सामन्यात बघितले आहेच. या सामन्यात आतापर्यंत तरी कोहलीच्या मर्जीनुसार घडत आहे. परंतु या सामन्याचा निकाल जर विपरीत लागला तर कोहलीवर डाव उलटायला वेळ लागणार नाही. तेंव्हा कोहलीने स्वतःच्या मनमानीपेक्षा संघहित डोळ्या समोर ठेवणे त्याच्यात फायद्याचे ठरेल !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

