पनवेल संघर्ष समितीने जपला सांस्कृतिक वारसा !!
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट, व्हाटसअप - ९७६८४२५७५७
पनवेल : बंद असलेल्या नाट्यगृहांत राजकीय नेत्यांचे कार्यक्रम गर्दी जमवून होत आहेत, पण तिथे नाट्यप्रयोग करण्यास बंदी आहे. त्यामुळे नाट्यकर्मींवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी खंत सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक व नाट्यनिर्माते अशोक समेळ यांनी व्यक्त केली.
गुरुवारी पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात 'ते आभाळ भीष्माचं होतं' या त्यांच्या आगामी महाकादंबरीतील दोन भागांच्या अभिवाचन कार्यक्रमात अशोक समेळ बोलत होते. पनवेल संघर्ष समितीतर्फे पत्रकार कांतीलाल कडू यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोरोनाचे नियम पाळून शिस्तबद्ध रीतीने हा कार्यक्रम झाला.
समेळ म्हणाले की, 'अश्वत्थामा' ही महाकादंबरी लिहिण्यासाठी खडतर अभ्यास करावा लागला. फिरावे लागले. सातपुड्याच्या डोंगररांगांत जाऊन राहावे लागले. डिंपल पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या या महाकादंबरीला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. लवकरच तिची सातवी आवृत्ती येत आहे. महाभारताचा शेवट करणाऱ्या या व्यक्तिरेखेवर लिहिल्यानंतरही मन खूप अस्वस्थ होते. त्यानंतर सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेऊन शांत बसलेलो असताना मला अचानक महाभारताची सुरुवात करणाऱ्या पितामह भीष्माचार्य यांच्यावर लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यासाठी महाभारताचे जवळपास १८ हजार पानांचे १८ खंड मनात रिचवावे लागले. व्यासंग वाढवावा लागला. हे लेखन म्हणजेही तपश्चर्याच होती, असे समेळ म्हणाले. इच्छामरणी असलेल्या भीष्माने पांडवांच्या हातून मरण कसे पत्करले, याची अद्भूत कथा ऐकवून समेळ यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या दमदार अभिवाचनाने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कविवर्य अशोक बागवे यांनी अशोक समेळ यांची मोठी बहारदार प्रकट मुलाखत घेतली. अभिनेता, नाट्यनिर्माता, नाटककार, लेखक, मालिका लेखक अशा आपल्या विविध पैलूंचा धांडोळा घेताना समेळ म्हणाले की, व्यावसायिक नाटकात भूमिका करण्याची पहिली संधी प्रभाकर पणशीकर यांनी मला अनपेक्षितपणे दिली. त्यानंतर झपाटल्याप्रमाणे मी काम करत राहिलो. आपल्याकडील गुजराती रंगभूमीही संपन्न आहे. त्यासाठीही भरपूर काम केले. वेबसाईट्सवर माझी गुजराती नाटके आजही सुरू आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
आज कोरोनामुळे महाराष्ट्रात नाट्यप्रयोगांवर बंदी आहे. त्यामुळे नाट्यकर्मींवर उपासमारीची पाळी आली आहे. कोरोनाचे नियम पाळून महाराष्ट्रात नाट्यप्रयोग करायला परवानगी देण्याची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्राचे खूप मोठे सांस्कृतिक नुकसान होईल, असेही समेळ म्हणाले.
पनवेल संघर्ष समिती अशोक समेळ यांच्या 'ते आभाळ भीष्माचं होतं' या आगामी महाकादंबरीच्या शंभर प्रती विकत घेईल, असे यावेळी कांतीलाल कडू यांनी जाहीर केले.
संघर्ष समितीचे पदाधिकारी हरेश पाटील दांपत्याचा यावेळी सत्कार करण्यात आला. संघर्ष समितीच्या महिला तालुकाध्यक्षपदी निर्मला चौधरी, कळंबोली शहर अध्यक्ष प्रतिम सुनील कोळी, कोप्रोली गाव अध्यक्ष निलेश पाटील आणि लक्ष्मी वसाहत विभागीय अध्यक्ष नागेश जाधव आदींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
प्रारंभी व्यासपीठावर अशोक समेळ, प्रा. अशोक बागवे, ज्येष्ठ पत्रकार मंगेश विश्वासराव, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. भक्तीकुमार दवे, पनवेलचे नायब तहसीलदार संजीव मांडे, मंडल अधिकारी कचरे, दूरदर्शनचे माजी संचालक गोरखनाथ कडू, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार केशव कासार आणि कांतीलाल कडू उपस्थित होते.

