रुग्णाची भिती दूर करणे करोनावरील प्रभावी औषध
प्रतिनिधी :रफिक शेख
पारनेर: ( दि .३ ) : मला करोनावरील औषध सापडले आहे.रुग्णांच्या मनातील करोनाची भिती दूर करणे,त्यांच्या डोक्यातून,मनातून करोना हद्दपार करणे हे करोनावरील प्रभावी औषध असल्याचे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस,नीलेश लंके प्रतिष्ठान व गिरीराज रुग्णालय (बारामती), विघ्नहर्ता रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ह्रदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.उपमुख्यमंत्री पवार यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमातून साजरा व्हावा,मतदारसंघातील गोरगरीब,वंचित घटकांना उपक्रमांचा लाभ मिळावा या भावनेतून मोफत ह्रदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार लंके म्हणाले.शिबिरात एकूण ४३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी आवश्यकता असणाऱ्या ३२ रुग्णांवर बारामती येथील गिरीराज रुग्णालयात मोफत ह्रदयरोग शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
ह्रदयरोग तपासणी शिबिराचे उदघाटन आमदार लंके,डॉ भोईटे यांच्या हस्ते झाले.
पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर, हृदयरोग तज्ञ डॉ.रमेश भोईटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे,आत्मा समितीचे अध्यक्ष राहुल झावरे, किसनराव रासकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, डॉ.अमृता वाकचौरे,डॉ.वंदना मोहिते, डॉ.बाळासाहेब कावरे उपस्थित होते.
आमदार लंके म्हणाले की,गेले दीड वर्ष मी करोना रुग्णांच्या सानिध्यात आहे.भाळवणी व कर्जुले हर्या येथील कोविड उपचार केंद्रात उपचार घेतलेल्या वीस हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी करोनावर मात केली आहे.या उपचार केंद्रात एकही मृत्यू झालेला नाही.प्रसंगी डॉक्टरांसोबत मी करोना रुग्णांची प्राणवायूची,तपमानाची तपासणी केली आहे.करोना रुग्णांना धीर देणे,त्यांच्या मनातील भिती दूर करणे हे करोनावरील प्रभावी औषध असल्याचे मी गेल्या दीड वर्षांच्या अनुभवातून ठामपणे सांगू शकतो असे आमदार लंके म्हणाले.
ह्रदयरोग तज्ञ डॉ.रमेश भोईटे म्हणाले की,कोणत्याही आजारात रुग्णाची आजाराविषयीची भिती दूर करण्यात डॉक्टरांना यश आले,या आजारावर आपण मात करू शकतो हा आत्मविश्वास रुग्णांमध्ये निर्माण झाल्यास कोणत्याही औषधाविना रुग्ण ६० टक्के बरा होतो.नेमके हेच काम आमदार नीलेश लंके यांनी कोविड उपचार केंद्रात केले.करोना संसर्ग काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा करणारा एकही आमदार राज्यात अथवा देशात नाही.बारामती येथील गिरीराज रुग्णालयात पारनेर-नगर मतदार संघातील रुग्णांवर मोफत ह्रदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येतील अशी ग्वाही डॉ.भोईटे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर,डॉ.वंदना मोहिते यांची भाषणे झाली.डॉ.बाळासाहेब कावरे यांनी प्रास्ताविक केले तर वकील राहुल झावरे यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
बारामती प्रतिपंढरपूर,शरद पवार आमचे विठ्ठल
करोना संसर्गात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे यांनी कोविड उपचार केंद्रांसाठी पाहिजे ती मदत केली.अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. बारामती आमचे प्रतिपंढरपूर आहे.शरद पवार आमचे विठ्ठल आहेत.त्यांच्या आशिर्वादाने बारामतीमधील विकासाची गंगा पारनेरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही.
नीलेश लंके,आमदार,पारनेर-नगर मतदारसंघ.

