पिंपरी चिंचवड:- राज्य स्तरावर ‘डायल 112 ही हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात देखील ही हेल्पलाईन कार्यान्वित झाली आहे. पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना याबाबत प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे. चारचाकी आणि दुचाकी वाहनेही यासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना ‘डायल 112 या एकाच हेल्पलाईनवर आता पोलीस, अग्निशमन आणि रुग्णवाहिका या तीन सेवांची मदत मिळणार आहे.
आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत घेण्यासाठी 100 क्रमांक डायल केला जातो. अग्निशमन विभागाच्या मदतीसाठी 101 आणि रुग्णवाहिकेच्या मदतीसाठी 102 हा क्रमांक डायल केला जातो. वेगवेगळ्या मदतीसाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन सध्या सुरु आहेत. मात्र या तिन्ही हेल्पलाईन एकाच क्रमांकावर आणण्यासाठी शासनाने हा उपक्रम राबवला आहे.
‘डायल 112’ ही हेल्पलाईन शासनाने राज्यस्तरावर सुरु केली आहे. या हेल्पलाईनचे प्रायमरी कॉन्टॅक्ट सेंटर महापे, नवी मुंबई येथे आहे. तर सेकंडरी कॉन्टॅक्ट सेंटर नागपूर येथे आहे. नागरिकांनी 112 या हेल्पलाईनवर फोन केल्यास संबंधित कॉलरला पोलीस, अग्निशमन, रुग्णवाहिका यापैकी कोणती मदत पाहिजे आहे, याबाबत विचारले जाते.
पोलीस मदत पाहिजे असल्यास तात्काळ कॉलर व्यक्तीचे लोकेशन बघितले जाते. त्यानुसार ती व्यक्ती ज्या ठिकाणी आहे, त्या परिसरातील पोलीस नियंत्रण कक्षात क्षणात माहिती दिली जाते. सर्व पोलीस नियंत्रण कक्षांमध्ये 112 या हेल्पलाईनसाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात आले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षातील 112 हेल्पलाईनच्या संगणकावर कॉलरची माहिती दिली जाते. त्यानंतर नियंत्रण कक्षातून कॉलर व्यक्तीच्या जवळपास जे हेल्पलाईन वाहन उपलब्ध आहे, त्या (रीस्पॉडंट) वाहनातील यंत्रणेवर माहिती दिली जाते. रीस्पॉडंट पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन कॉलरला मदत करतात.

