पिंपरी चिंचवड:-पूजापाठ करण्यासाठी निघालेल्या तरुणाचे तीन अज्ञातांनी भोसरी येथील पीसीएमटी बस स्टॉपवरून अपहरण केले. तरुणाकडील एक हजार रुपये काढून घेत आणखी दहा हजार रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले. ऑनलाईन पाठवलेले पैसे स्वीकारून आरोपींनी अपहरण केलेल्या तरुणाला कुदळवाडी येथील उड्डाणपुलाखाली सोडले. हा प्रकार रविवारी (दि. 5) रात्री अकरा ते सोमवारी (दि. 6) मध्यरात्री एक वाजताच्या कालावधीत घडला.
याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पूजापाठ करण्याचे काम करतात. रविवारी रात्री अकरा वाजता पूजेला जाण्यासाठी ते भोसरीमधील पीसीएमटी बस स्टॉप येथे गाडी शोधण्यासाठी आले होते. त्यांच्याजवळ एक कार आली. एकाने फिर्यादी यांना पाठीमागून धक्का देऊन कारमध्ये ढकलले. कारमध्ये जबरदस्तीने बसवून मारहाण करून त्यांच्या खिशातून एक हजार रुपये काढून घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांचे डोळे बांधून निगडी भागात घेऊन गेले. गळ्याला चाकू लावून मारण्याची भीती घालून फोन पे वरून ऑनलाईन दहा हजार रुपये पाठवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे आरोपींनी काढून घेतले आणि त्यांना कुदळवाडी येथील पुलाच्या खाली सोडून दिले. पोलिसात तक्रार दिल्यास फिर्यादी यांच्या आई-वडिलांना मारण्याची धमकी आरोपींनी दिली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भवारी तपास करीत आहेत.

