भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील शेवटचा सामना लॅंकेशायर काऊंटीच्या मॅनचेस्टर येथी ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर सुरू होण्यापूर्वीच संपला. भारतीय संघातील सपोर्टींग स्टाफमधील पाच सदस्य कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने कोविड-१९ चे रिपोर्ट निगेटिव्ह आले तरी खेळाडू मानसिकदृष्टया खेळण्यास सक्षम नसल्याने सामना खेळविण्यास अडचणी आल्या व सामना सुरू होण्याचा योगच आला नाही.
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांच्या पुस्तक प्रकाशनानंतर रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्या संपर्कातील गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधरन, फिजिओ डॉ. नितिन पटेल यांना ओव्हल कसोटीच्या चौथ्या दिवशी विलगीकरण कक्षात हलविले व त्यानंतर पाच दिवसांनी संघाचे सहाय्यक फिजिओ डॉ. योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण संघच हवालदिल झाला. मॅनचेस्टर कसोटीच्या आदल्या रात्री भारतीय गोटात भितीचे वातावरण पसरले होते.
प्रत्यक्ष सामन्यात खेळण्यापूर्वी भारतीय खेळाडू भयभीत झाले होते व कोरोना आपल्या पर्यंत पोहोचल्याने त्यांनी खेळण्याची उर्मिच गमावली होती. परंतु भारतीय खेळाडूंची मानसिकता न ओळखता इंग्लिश क्रिकेट बोर्डाने ( ईसीबी ) भारतीय संघाने सामना सोडून दिल्याचे जाहीर केले. परंतु बीसीसीआयशी झालेल्या ऑनलाईन चर्चेनंतर ईसीबीने सामना रद्द करण्याचे ठरविले. तसेच पुढील वर्षी भारत इंग्लंडचा वनडे व टि२० सामन्यांचा दौरा करणार असल्याने त्या दौऱ्यात हा रद्द करत असलेला एकमेव कसोटी सामना खेळविण्याचे निश्चित झाले.
मात्र या दरम्यान इंग्लिश प्रसार माध्यमे व सोशल मिडीयावर भारतीय संघाची बदनामी करणारे वृत्त प्रसिद्ध करण्यात चढाओढ लागली होती. वास्तविक या सामन्याच्या निकालासंबंधात निर्णय देण्याचा अधिकार क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीला आहे. कोविड-१९ संदर्भात आता झाली अशी परिस्थिती उद्भल्यास सदर सामना रद्द करून आहे त्या परिस्थितीत मालिकेचा निर्णय देण्याची तरतूर आयसीसीच्या आचारसंहितेत असल्याने इतर कोणत्याही आजी माजी इंग्लिश खेळाडू व प्रसिद्ध माध्यमांनी आपल्या अकलेचे तारे तोडण्याऐवजी हा निर्णय आयसीसीवरच सोपविणे संयुक्तीक ठरले असते.
काही ठिकाणी ऐकायला मिळाले की, काही इंग्लिश खेळाडूंनी हा सामना रद्द झाल्याचा राग भारतीय खेळाडूंवर ठेऊन आयपीएल मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक आयपीएलमध्ये न खेळण्याचा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न असून त्यामुळे आयपीएलचे नव्हे तर त्यांचेच नुकसान होणार आहे. यातून मिळणार पैसा बुडणार व आगामी टि-२० वर्ल्ड कपसाठी यातून मिळणारा अनुभवही डुबणार !
हा एक कसोटी सामना न होण्याने ईसीबीचे ४०७ कोटी रूपयांचे नुकसान झाले. त्यापैकी ३०६ कोटी प्रसारण हक्काचे तर १०१ कोटी प्रेक्षक तिकीट माध्यमातून येणारे होते. हे सर्व होणारे नुकसान लक्षात घेऊन बीसीसीआय सन २०२२ च्या दौऱ्यात इंग्लंडला भरपाई करून देण्यासाठी एक अतिरिक्त कसोटी सामना खेळण्यास राजी असताना इंग्रजांच्या अतिरिक्त फौजांची वायफळ आदळ आपट सुरू आहे. हे सर्व योग्य रितीने घडत असताना ईसीबीचाही आसमानी किडा वळवळला व त्यांनी आयसीसीकडे या रद्द झालेल्या सामन्या विषयी आपली बाजू मांडली. शेवटी आयसीसी आपल्या घटनेच्या चौकटीत राहूनच निर्णय घेणार आहे.
या सर्व धामधुमीत येत्या १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये आयपीएल -२०२१ चं खंडित असलेलं दुसरं पर्व सुरू होणार असल्याने त्याची तयारीही युध्द पातळीवर सुरू आहे. आयपीएलचे ६० पैकी ३१ सामने भारतात झाले असून आता उर्वरीत २९ सामन्यांसाठी जद्दो जेहाद होणार असून मागील पर्वात कोरोना मुळे जो अडथळा निर्माण झाला तसा कुठलाच प्रकार घडू नये म्हणून त्या संबंधातील सर्वच यंत्रणा सतर्क असतील यात कोणतेच दुमत नसावे.
मॅनचेस्टर कसोटी रद्द झाल्यानंतर आरटीपीसीआर चाचण्या निगेटीव्ह असलेल्या खेळाडूंना संबंधित फ्रँचाईसी त्यांच्या स्वतःच्या चार्टर्ड फ्लाईटने युएईत घेऊन जायला सुरुवात झाली असून तेथेही प्रत्येक खेळाडू व संघाशी संबधीत घटकांना सहा दिवसांचा कॉरंटाईन सक्तीचा असणार आहे. या आयपीएल सत्रात सर्वच सहभागी घटकांना बायो बबलमध्ये राहाणे अनिवार्य असणार आहे. तसेच या संपूर्ण दुसऱ्या पर्वात एकंदर ३८ हजार कोरोनाच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
आयपीएल संपल्यानंतर लगेच त्याच ठिकाणी टि२० विश्वकरंडक स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याने कोरोना संदर्भात सर्व नियम सक्तीने पाळले जाणार यात कुठलेच दुमत नसणार !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

