लंडनमधील दुसरे सुप्रसिद्ध मैदान म्हणजे द ओव्हल ! याच मैदानावर भारत व इंग्लंड या दोन संघात चौथा कसोटी सामना सुरू झाला. या सामन्यापूर्वी मालिका बरोबरीत आहे. लिडसच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी भारत लॉर्डसवर एक सनसनाटी विजय मिळवून विजयी मानसिकतेने हेडिंग्ले कसोटीत उतरला होता. परंतु कर्णधार कोहलीचा फाजिल आत्मविश्वास व मनमानी करणारी संघ निवड संघाला घेवून डुबली. त्या सामन्यात दोन्ही डावात भारताचा डाव आकस्मितपणे कोसळल्याने भारताला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला.
त्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे भारताची अपयशी ठरलेली फलंदाजी हे होय. वास्तविक या प्रमुख दुखण्यावर ईलाज करण्याऐवजी मजबूत गोलंदाजीत बदल केले. झालेल्या चुकांतून व आलेल्या वाईट अनुभवातून काहीच शिकणार नाही तो म्हणजे विराट कोहली !
भारताचा आजमितीचा सर्वोत्तम फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्विनला सलग चौथ्या सामन्यात संघाबाहेर बसून कोहलीने या महान खेळाडूची थट्टाच केली आहे.मागील चार डावात अपयशी ठरलेला सलामीवीर के.एल. राहुल, सातत्याचा अभाव असलेले चेतेश्वर पुजारा, उपकर्णधार अजिंक्य राहाणे, बेजबाबदार रिषभ पंत व आश्विनला पर्याय समजला जाणारा रवींद्र जडेजा सतत अपयशी ठरूनही त्यांनाच संधी देण्यात कर्णधार कोहलीला काही आर्थिक लाभ तर होत नाही ना ?
बीसीसीआय व निवड समितीकडे वारंवार मागणी करून दौऱ्यावर खास मागितलेले सुर्यकुमार यादव व पृथ्वी शॉला काय लोणचं घालायला इंग्लंडला बोलविले ? आश्विनला डावलण्या मागचं असली राजकारण काय आहे ? हे सामान्य क्रिकेट रसिकांना समजण्या पलिकडचे झाले आहे.आपला दिल्लीकर मित्र ईशांत शर्माला वगळून कोहलीने संघावर फार मोठा उपकारच केला म्हणावं लागेल. तर अनेक दिवसांपासून संघासोबत प्रवासी म्हणून फिरणाऱ्या जलदगती गोलंदाज उमेश यादवच्या पथ्यावर मोहम्मद शमीची दुखापत पडली. यादवची क्रिकेट कारकिर्द संपली असे वाटत असतानाच नियतीने त्याच्यासाठी संधी रूपी संघाचं दारच उघडून दिले आहे.या मालिकेत भारताकडून काहीसे फॉर्मात असलेले सलामीवीर रोहीत शर्मा व के. एल राहुल स्वस्तात परतले तर मागच्या कसोटीत फॉर्मात आल्या सारखा भास झालेला पुजाराही आल्या पावली परतले. रवींद्र जडेजा, अजिंक्य राहाणे व रिषभ पंतने संघाला संकटात टाकून ड्रेसिंग रूम गाठले. कर्णधार कोहलीही या दौऱ्यात फॉर्मात नाही. परंतु त्याने संघापेक्षा स्वतःची इज्जत जपणारी खेळी केली, पण अर्धशतकानंतर आपली जबाबदारी संपली अश्या रितीने संघाला वाऱ्यावर सोडून तोही परतला.
परंतु दुय्यम गणल्या जाणाऱ्या शार्दूल ठाकूरने गाबाची आठवण देणारी वादळी खेळी करत विक्रमी अर्धशतक ठोकून उमेश यादवसह आठव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करून भारताची ७ बाद १२७ वरून १९१ पर्यंत धावसंख्या पोहचून भारतासाठी ही मॅच जगवली. तर उमेश यादवने या मालिकेत भारताची डोकेदुखी ठरत असलेल्या इंग्लिश कर्णधार ज्यो रुटचा केवळ २५ धावांवर दंडा उखडून भारतासाठी नवी पहाट जागवली !
इंग्लंडचा डाव सुरू होताच मागच्या कसोटीत इंग्लंडला शतकी सलामी देणारे सलामीवीर रॉरी बर्न्स व हसिब हमिदला बुमराहाने चालते केल्याने भारत सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडला स्वस्तात गुंडाळण्याचे स्वप्न बाळगूनच मैदानात उतरेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

