आयपीएल -१३चे दुसरे पर्व युएईत सुरू झाले आणि बघता अकरा सामने होऊन गेले. आश्चर्याची बाब म्हणजे पाच वेळा आयपीएल जिंकणारा व मागील दोन वेळचा सलग विजेता असलेला मुंबई इंडियन्सचा संघ चक्क सातव्या स्थानावर असलेला आपल्याला गुणतालिकेत दिसतो. हे सामान्य क्रिकेट रसिकांसाठी जरा विचित्र वाटत असले तरी हि सत्य घटना आहे. मुंबईने १० सामन्यात चार विजयांसह आठ गुण मिळविले आहेत. इतक्याच सामन्यात मुंबई इतकेच गुण मिळवून कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज यांच्यात प्ले ऑफ मध्ये पोहोचण्याची चढाओढ सुरू आहे. चेन्नई, दिल्ली, बेंगलोर हे संघ गुणतालिकेत पहिल्या तीन क्रमांकावर विराजमान आहेत हे आपणास ठाऊक आहेच !
मात्र या धामधुमीत एक संघ मात्र चर्चेतून काहीसा बाजूला गेल्या सारखा वाटतो. तो म्हणजे सन रायझर्स हैद्राबाद ! पूर्वाश्रमीचा डेक्कन चार्जर्स हैद्राबाद संघ बरखास्त झाल्यानंतर सनरायझर्सचा आयपीएलच्या पटलावर उदय झाला. सन २०१६ च्या सत्रात या संघाने डेव्हीड वॉर्नरचे आक्रमक नेतृत्व व त्याच्या ९४७ धावांच्या एकहाती लढाईने त्या सत्रात तुफान फॉर्मात असलेल्या विराट कोहलीच्या आरसीबीला अंतिम सामन्यात धुळ चारून आयपीएल करंडक पटकविला होता.
त्यानंतर सन २०१९ ला डेव्हिड वॉर्नर " सँड पेपर " वादात शिक्षा भोगत असल्याने केन विल्यमसनने सनरायझर्सचे नेतृत्व केले. त्या सत्रातही हैद्राबादने आपली उत्कृष्ठ कामगिरी कायम ठेवत अंतिम फेरी गाठली मात्र तेथे मुंबई इंडियन्सने त्यांना करंडकापासून दूरच ठेवत विजेतेपद मिळविले. सन २०२० ला प्ले ऑफ पर्यंत त्यांनी आपला प्रवास केला. या सर्व कालखंडात त्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाज, शानदार फिरकीपटू व वेगवान गोलंदाजांचा सुसज्ज फौजफाटा होता.
मात्र या वर्षी कोरोना, खेळाडूंच्या दुखापती, काही खेळाडूंचे संघ सोडून जाणे, आहे त्या खेळाडूंचा फॉर्म हरविणे, संघात काहीशी बेदिली होणे, स्पर्धे दरम्यानच नियमित कर्णधार डेव्हीड वॉर्नरला पदच्युत करणे, संघ निवडीत गोंधळ, परिस्थिती - खेळपट्टी यांचा अभ्यास न करता संघ निवडणे, फलंदाजांच्या क्रमवारीत नियमितता नसणे, अनुभवी खेळाडूंकडून योग्य योगदान न येणे सनरायझर्सच्या पिछेहाटीचे कारण बनले. आजमितीला हा संघ गुणतालिकेत अगदी तळाच्या म्हणजे आठव्या स्थानावर आहे.
भारतात या चालू आयपीएल सत्राचे पहिले पर्व झाले तेंव्हा सनरायझर्सने आठ पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळविला होता. शिवाय युएईत गेल्यानंतर त्यांचा खराब खेळ व पराभवाचा लपंडाव सुरूच होता. पंजाब किंग्ज संघाबरोबर त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचा नजराना पेश करत पंजाबला केवळ १२५ धावांत गुंडाळले तरी हे मामुली आव्हान सनरायझर्सच्या फलंदाजांना जेसन होल्डरच्या धुवाँधार ४८ धावांच्या खेळीनंतरही साध्य करता आले नव्हते. तेथेही पाच धावा त्यांना विजयासाठी कमी पडल्या होत्या.
त्या पराभवानंतर हैद्राबाद संघाच्या व्यवस्थापन समितीने काही कठोर निर्णय घेत सातत्याने अपयशी ठरत चाललेल्या माजी कर्णधार डेव्हीड वॉर्नर, अनुभवी फलंदाज मनिष पांडे, केदार जाधव यांची सुट्टी करत भविष्यात ज्यांच्या भवरवशावर खेळायचे अशा जेसन रॉय, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा यांना संधी दिली व हा त्यांचा प्रयोग सुपर डुपर यशस्वी ठरला.
राजस्थान रॉयल्स विरूध्द मिळविलेल्या आपल्या दुसऱ्या विजयात हैद्राबादने मागील काही सामन्यात झालेल्या चुका दुरूस्त करत शानदार बॅटींग, जानदार बॉलीग व दमदार फिल्डींग करत आपल्या बदललेल्या सकारात्मक मानसिकतेचा उत्कृष्ठ नमुनाच सादर केला. या विजयात सलामीवीर वृध्दीमान साहाची साहसी फलंदाजी, जेसन रॉयच्या तडाखेबाज साठ धावा, डाव कोलमडतोय असे वाटत असताना कर्णधार केन विल्यमसनने नांगर टाकून केलेली नाबाद अर्धशतकी विजयी खेळी तसेच नवोदित अभय शर्माचा समयसूचक खेळ हैद्राबादला विजयी पथावर घेऊन आला.
या विजयाने हैद्राबाद विजेतेपदाच्या शर्यतीत येण्याची शक्यता नसली तरी या विजयातून त्यांना मिळालेला आत्मविश्वास उर्वरीत चार सामन्यात त्यांच्या खेळात निखार आणू शकतो व त्यांनी मिळविलेले विजय प्ले ऑफ मध्ये जाण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या काही संघाच्या मार्गात दह्यातल्या विरजनाचे काम मात्र करू शकतो.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

