गणेश चतुर्थीच्या पावन मुहुर्तावर भारत व इंग्लंड यांच्यातील चालू कसोटी मालिकेतील पाचवा, अंतिम व निर्णायक सामना कोविड संक्रमणाच्या सावटात सुरू होणार आहे. भारताने हा सामना जिंकला अथवा अनिर्णित राखला तरीही करंडक भारताकडेच राहाणार असून या सामन्यातील पराभवाने नुकसान झाले तर इंग्लंडचेच होणार आहे. परंतु या मालिकेत इंग्लंडने भारताला वेळेवेळी दिलेली झुंज बघता इंग्लंडही सहजासहजी गुडघे टेकणार नाही.
भारत चार कसोट्यांनंतर २-१ असे आघाडीवर असले तरी हा सामना ज्या मॅनचेस्टर शहरातील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर होणार आहे त्या मैदानावरची भारताची गेल्या ८५ वर्षातील कामगिरी अतिशय निराशजनक कामगिरी असून येथे भारताला एकही कसोटी विजय मिळविता आलेला नाही. भारत येथे खेळलेल्या ९ पैकी ४ कसोट्यात पराभूत झाला असून ५ सामने कसेबसे अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला आहे.
शिवाय या दौऱ्यावर असल्यापासून कोरोना व्हायरसने भारतीय संघाचा मोठया प्रमाणात पिच्छा पुरविला आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी रिषभ पंत व इतर चार जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. तर चौथी कसोटी सुरू असताना संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोविड पॉझिटीव्ह सापडले. त्यामुळे त्यांच्या अति संपर्कात असलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरूण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधरन व फिजिओ डॉ. नितिन पटेल यांना आयसोलेट करण्यात आले होते. त्या सामन्याच्या उर्वरीत भागात फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड एवढेच एक मार्गदर्शक उपलब्ध होते.
मॅनचेस्टर कसोटीच्या आदल्या दिवशी सहाय्यक फिजियो डॉ. योगेश परमार हे देखील कोरोना बाधीत आढळल्याने व त्यांच्या संपर्कात रोहीत शर्मा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा व चेतेश्वर पुजारा हे जखमी खेळाडू आल्याचे उघड झाल्याने संपूर्ण संघाचे धाबे दणाणले. एवढेच नाही तर ही कसोटीच होणार का नाही ? या अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली.
परंतु भारतीय संघातील सर्वच रॅपीड व आरटीपीसीआर टेस्ट निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्व:स सोडला. त्यामुळे कसोटी सामन्यावर आलेले संकटाचे ढग दूर झाले असून हा सामना त्याच्या पूर्वनियोजित कार्यकमानुसारच होणार आहे. भारताकडे आता संघाचा डॉक्टर उपलब्ध नसून इंग्लंडकडे एका तज्ञ फिजियोची मागणी भारत करणार आहे.
या मालिकेत भारत भले २-१ असा आघाडीवर असला व मागचा सामना जिंकून उंच मनोधेर्याने सामन्यात उतरणार असला तरी लॉर्डस कसोटी जिंकल्या नंतर अशाच मानसिकतेने भारत हेडींग्ले कसोटीत उतरला आणि एक डाव व ७६ धावांनी नामुष्कीजन्य पराभव स्विकारला. इंग्लंडचा संघही पलटवार करण्यात सक्षम असल्याने भारताचे गाफील राहाणे अथवा फाजिल आत्मविश्वास बाळगणे अंगलट येऊ शकते.
भारताचे वेगवान गोलंदाज त्यांचे कार्य ईमाने इतबारे करत असले तरी फलंदाज त्यांच्या कर्तृत्वात कसर सोडत असल्याचे दिसत. संघाची निवड करताना खेळपट्टी, वातावरण, हवामान यांचे गांभिर्य ओळखून संघ निवड करणे गरजेचे असून भारताचा कर्णधार या गोष्टींचा सखोल विचार न करता त्याच्या सोयीने संघ निवडत आला आहे.
रवीचंद्रन आश्वीनसारखा अव्वल फिरकीपटू संघात नसणं अनेकदा घातक सिध्द होत असूनही त्याला डावलणे या सामन्यात नुकसानदायक सिध्द होऊ शकते. शिवाय अजिंक्य राहाणे सारखा वरिष्ठ खेळाडू सध्या विपरीत परिस्थितीत असून त्याचा आत्मविश्वास खच्ची होणार नाही याची दक्षता घेणेही संघ प्रबंधनाचे काम आहे.
भारत हा सामना जिंकून प्रथमच एका मालिकेत इंग्लंडमध्ये तीन कसोटी जिंकण्याचा पराक्रम करू शकेल. त्याचबरोबर मॅनचेस्टर येथे न मिळालेला विजय देखील मिळू शकतो. शिवाय सन २००७ नंतर इंग्लंडमध्ये प्रथमच मालिका विजय साध्य करू शकतो. त्यासाठी योग्य संघ निवड होणे गरजेचे आहे. तर फलंदाजांना उत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. तसेच इंग्लंडला हलक्यात न घेता आक्रमण करावे लागणार आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

