डॉ . दत्ता विघावे
पाच दिवसांपूर्वी भारतातील अग्रगण्य इंग्रजी दैनिक टाईम्स ऑफ इंडियांच्या एका निडर पत्रकाराने आगामी टि२० विश्वचषकानंतर भारताच्या सर्व प्रारूपांचा कर्णधार असलेला विराट कोहली सफेद चेंडूच्या खेळातील संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे आतल्या गोटातील वृत्त प्रकाशित केले आणि संपूर्ण क्रिकेट विश्वच ढवळून निघाले !
त्यानंतर बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, सेक्रेटरी जय शहा, कोषाध्यक्ष अरूण धुमल यांनी या गोष्टीचे सरळ शब्दात खंडन करून अशी कोणतीही गोष्ट घडणार नसून विराट कोहलीच तिनही प्रारूपात भारताचा कर्णधार पुढील काळातही राहणार असल्याचे निक्षूण सांगितले, आणि या आगीचा धुरळा खाली बसण्याच्या आधीच दस्तुरखुद्द विराट कोहलीने समाज माध्यमात एक पानभर मनोगत वजा पत्र लिहून सदर राजीनामा वृत्ताला दुजोरा दिला.
कोहलीच्या या तडकाफडकी नेतृत्व सोडण्याच्या प्रक्रियेनंतर मागील पाच दिवसांपासून सारवासारव करणाऱ्या बीसीसीआयची मात्र तारांबळ उडाली. तसेच बीसीसीआयलाच स्पष्ट करावे लागले की वर्क लोड मुळे कोहलीला टि-२० चे नेतृत्व सोडण्याचा घाट मागील सहा महिन्यांपासून वरिष्ठ स्तरावर घातला जात आहे.
तसे बघाल तर विराट कोहलीच्या नेतृत्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आकडेवारी इतर देशांच्या कर्णधारांच्या कामगिरी पेक्षा चांगली आहे. परंतु कोहली आयसीसीच्या स्पर्धात त्याच्या नेतृत्वात भारताला एकदाही विजेतेपद मिळवून देण्यात कमी पडला असून जगातली अग्रणी लिग स्पर्धा असलेल्या आयपीएलमध्ये आठ वेळा आरसीबीचे नेतृत्व केल्यानंतरही त्याची विजेतेपदाची पाटी कोरीच आहे.
तर त्याच्याशी तुलना होणारा त्याचाच सहकारी व भारताचा सफेद चेंडूच्या खेळाचा उपकर्णधार रोहीत शर्माने तितक्याच कालावधीत तो नेतृत्व करत असलेल्या मुंबई इंडियन्सला पाच वेळा आयपीएलचे विजेते बनविले असून यंदा तर त्याला विजेतेपदाची हॅट्रीक करण्याची संधी आहे.
टि२०च्या आंतरराष्ट्रीय सामन्यांची आकडेवारी तपासली तर कोहलीने ९५ सामन्यात नेतृत्व करताना ६५ विजय मिळविले तर रोहीतने कोहलीच्या गैरहजेरीत संघाची १९ सामन्यात धुरा हाताळताना १५ सामन्यात भारताला विजयी केले. आश्चर्याची बाब म्हणजे दोघांच्या यशाची टक्केवारी बघितली तर कोहलीची ६५ तर रोहीतची ७८ टक्के इतकी आहे. शिवाय फलंदाज म्हणून मागील दोन वर्षात कोहलीची बॅट अबोल होती तर रोहीतच्या बॅटचा जगभर बोलबाला होता. सत्तर आंतरराष्ट्रीय शतके नावे असलेल्या कोहलीने मागील पाच वर्षात केवळ १७ शतके ठोकली तर रोहितच्या शतकांची संख्या २२ होती.
विराटच्या फलंदाजीचे अपयश इतके मोठे आहे की सतत आयसीसी मानांकनात अव्वल स्थानी राहाणारा कोहली आजच्या घडील सहाव्या स्थानी आहे. तर रोहीत शर्मा कोहलीच्या एक घर पुढे म्हणजे पाचव्या स्थानावर आहे.
कोहली भारताचा प्रमुख फलंदाज असल्याने त्याचे अपयशी होणे म्हणजे भारताची फलंदाजी कोलमडणे असे समिकरण आहे. परंतु कर्णधारपद व फलंदाजी यांची सांगड घालण्यात कोहली कमी पडत असल्याने त्याच्यावर सध्या तरी टि२० चे नेतृत्व सोडण्याची वेळ आली आहे. भविष्यात तो एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेणेकरून त्याला त्याच्या फलंदाजीकडे बारकाईने लक्ष देता येईल. त्यामुळे त्याला सचिन तेंडुलकरचे अनेक प्रलंबित राहीलेले विक्रम मोडता येतील.
भारतीय संघाच्या अंतर्गत गोटातील वातावरण वरकरणी अलबेल दाखविले जात असले तरी संघात कुठेतरी धुसफूस असल्याचे आपण खास करून आयसीसी स्पर्धांच्या निर्णायक सामन्यावेळी बघितले आहेच. कोहली गट व मुंबई लॉबी अशी काहीशी जुगलबंदी दिसत असून कोहलीचा संघ निवडीतला मनमानीपणाच या सगळ्या गोष्टींचे मुळ असून वरिष्ठ खेळाडूंना दुखवणे हे देखील त्याचाच एक भाग आहे.
आगामी टि२० विश्वचषकानंतर कोहलीची टि२० कर्णधार पद सोडण्याची घोषणा एक चाल सुध्दा असू शकते. जेणे करून यामुळे संघातील नाराज गटाने खुलून खेळ करावा व भारताला जेतेपद मिळावे. त्यानंतर कोहलीचे आयसीसी विजेतेपदाचे खाते उघडेल व पुन्हा एकदा त्याच्या नेतृत्वावरच मोहोर लागेल. वास्तविक कोहली आपला दिलेला शब्द टाळणार नाही, पण वेळ धकल्यानंतर भलेभले आपल्या वचनाला मुकरले आहेत. याला इतिहास साक्षीला असून कोहली कडून असे घडणारच नाही असे कोण छाती ठोकपणे सांगू शकेल का ?
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

